-->
अण्णांची उपोषणपूर्ती

अण्णांची उपोषणपूर्ती

सोमवार दि. 02 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अण्णांची उपोषणपूर्ती
समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले दिल्लीतील उपोषण अखेर आठ दिवसांनी मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळपाणी प्यावयास देऊन अखेर या उपोषणाची समाप्ती अण्णांनी केली. अण्णांच्या यावेळच्या उपोषणाची पार रया गेली होती, असेच गेल्या सात दिवसात दिसले. महत्वाचे म्हणजे, माध्यमांनी प्रमुख्याने चॅनेल्सनी या उपोषणाची पारशी दखल घेतली नव्हती. याच चॅनेल्सनी पूर्वी कॉग्रेस सत्तेत असताना अण्णांना डोक्यावर चढवून घेतले होते. भाजपाने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अण्णांच्या त्यावेळच्या आंदोलनासाठी मोठी कुमुक पुरविली होती, हे सत्य काही छुपे राहिले नाही. अण्णांचे हे उपोषण म्हणजे जणू काही मोठी क्रांती होऊ घातल्याचे त्यावेळी चित्र उभे करण्यात आले होते. परंतु यावेळी मात्र या आंदोलनातील हवा निघाल्याची स्थिती दिसत होती. अण्णांच्या मागे फारसे कोणी नेते नव्हते. भाजपाने तर त्यांच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. अण्णांची अशी गोड समजूत होती की, नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या विश्‍वासातील एखादा नेता आपल्याला येऊन भेटेल, परंतु ती अपेक्षा देखील फोल ठरली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उपोषण सोडावयाचे होते तर दिल्लीत उपोषण करण्यापेक्षा मुंबईत करणे योग्य ठरले असते. अण्णांच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, दरवेळी त्यांच्या सोबत असलेले नेते पुढच्या आंदोलनात नसतात. फार तर एखाद्या किंवा दुसर्‍या वेळी तेच तेच चेहरे दिसतात, अन्यथा अण्णांच्या आंदोलनात दरवेळी बहुतांशी चेहरे नवीन असतात. म्हणजे, अण्णांच्या आंदोलनातील फोलपणा त्यांना जाणवतो व ते माघार घेतात, असे म्हणता येईल. यावेळी अण्णांनी उपोषण सोडू नये, अण्णा उपोषण सोडण्याची घाई करीत आहेत, असे सांगत अण्णांच्या पाठीराख्यांमध्ये फूट पडली असल्याचे बोलले गेले. अण्णांच्या अत्यंत विश्‍वासातल्या काही जमांनी याचा इन्कार केला आहे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे, यावेळी चॅनेल्सनी अण्णांचे दर्शन दाखविताना हातचे राखल्यामुळे अण्णांच्या आंदोलनातला जोरच निघून गेला असल्याचे प्रकर्षाने जाणवले. असाच फ्लॉप शो अण्णांच्या मुंबईतील उपोषणाच्या वेळी झाला होता, त्याची आठवण आता येते. यावेळी अण्णांच्या उपोषणातून काय मिळाले, याचा नेमका अभ्यास करावा लागेल. कारण कृषी अवजारंवरील जी.एस.टी. 12 टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणण्याचा घेतलेला निर्णय हाच काही ठोसपणाने दिसत आहे. अन्य कोणतीही मागणी मान्य झालेली नाही. प्रत्येक मागणीला समिती नेमून किंवा अभ्यास करण्याचे आश्‍वासन देऊन भाजपाने यशस्वीरित्या हरताळ फासला आहे. अर्थात दरवेळी उपोषणात शंभर टक्के मागण्या मान्य करुन घेऊनच ते मागे घेऊ असा अट्टाहास धरणे चुकीचे असते. दोन पावले मागे घेण्यातही आंदोलन यशस्वी करण्याची पेरणी केलेली असते. लोकपाल नियुक्ती कालमर्यादेत करणार, निवडणूक सुधारणांबाबत सरकार पाऊल उचलणार ही दोन आश्‍वासने ही केव्हाही देता येतात. त्यासाठी अण्णांना आठ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता नव्हती. ही सरकारी उत्तरे नोकरशाहीच्या थाटातली आहेत. या आश्‍वासनांची पूर्तता कधीच होत नसते, हे अण्णांना देखील समजत नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. गेल्या सात दिवसात अण्णांचे वजन सात किलोने कमी झाले होते. त्यांच्या रक्तदाबातही फरक दिसू लागला होता. त्यामुळे अण्णांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करुन मुख्यमंंत्र्यांना खास दिल्लीला पाठविण्यात आले व रामलिला मैदानावर जाऊन अण्णांच्या मागण्या तत्वत: मान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. लोकायुक्त नियुक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य् असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेथे जाहीर केले. एकूणच अण्णांची आश्‍वासनांवर बोळवण करण्यात आली आहे, हे कोणीही सांगू शकेल. एकूणच पाहता आश्‍वासने आजवर अण्मांना अनेकदा दिली गेली आहेत. पण प्रत्येकवेळी अण्णा नवीन विटी नवा दांडू अशा अविर्भावात आपले आंदोलन करतात. परंतु त्याची पूर्तता होते किंवानाही त्याच कोणी विचारही करीताना दिसत नाही. आता देखील अण्णांनी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यात आश्‍वासने पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अर्थात सहा महिन्यांनी चित्र वेगळे असेल कारण निवडणुका तोंडावर आलेल्य असतील, त्यावेळी अण्णांच्या मागण्यांची पूर्तता करताना कदाचित आचारसंहितांचा अडसर येईलही. त्यामुळे अण्णांच्या मागण्याचा विचार आता नव्याने येणारेच सरकार करील. असो. एकूणच अण्णांच्या आंदोलनात यावेळी जनतेचा रेटा नव्हता की उत्साहही नव्हता. याचा अर्थ काय काढायचा? अण्णांच्या आंदोलनातील हवा आता संपली आहे का? जनतेचे प्रश्‍न आता मिटले आहेत असे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती ठरेल. मग अण्णा आपले प्रश्‍न सोडवू शकतील असे लोकांना वाटत नाही की काय? यावेळी अण्णांनी भ्रष्टाचारापेक्षा शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला महत्व दिले होते. शेतकरी जर विधीमंडळाला दोनशे किमी चालत येऊन घेराव घालू शकतात तर अण्णांच्या बरोबरीने का नाहीत, हा देखील प्रश्‍न उपस्थित होतो. अण्णांचे मूळ आंदोलन हे भ्रष्टाचाराच्या विरोधात होते. अण्णांना सध्या सुरु असलेला भ्रष्टाचार दिसत नाही का? किंव त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्याला बगल देण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रश्‍न हाती घेतले? त्यामुळे आता अण्णांना पुढील काळात आंदोलन करताना या व अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे, हे मात्र नक्की.
-------------------------------------------------------------     

0 Response to "अण्णांची उपोषणपूर्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel