-->
लाडांना तिकीटाचा प्रसाद; राणे भाजपातही वेटिंगवरच

लाडांना तिकीटाचा प्रसाद; राणे भाजपातही वेटिंगवरच

बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
लाडांना तिकीटाचा प्रसाद;
राणे भाजपातही वेटिंगवरच
पुढील आठवड्यात विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणार्‍या निवडणुकीत कॉग्रेसमधून नुकतेच भाजपाच्या गोटात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांना आपल्यालाही ही जागा दिली जाईल व आपण एकदा का आमदार झालो की लगेचच मंत्री होऊ असा आत्मविश्‍वास होता. परंतु त्यांचे हे स्वप्न भंगले आहे. अर्थात त्यांच्या या स्वप्नाचा चकाचूर करण्यासाठी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी यांनी आपापल्या राजकीय डावपेचानुसार फिल्डिंग लावली होती. राणेंना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची ही फिल्डिंग यशस्वी झाली आहे. कॉग्रेसने आपल्यावर अन्याय केला अशी समजूत करुन घेऊन आता भाजपा न्याय देईल अशी आशा बाळगत राणे यांनी हा भाजपाचा नवा घरोबा केला. परंतु राणेंना पक्षात घेण्यास भाजपामध्ये अनेकांचा विरोध सुरुवातीपासूनच होता. त्यामुळेच त्यांना प्रवेशासाठी तब्बल पाच महिने भाजपाच्या दारात बसावे लागले होते. त्याचवेळी राणेंनी समजायला पाहिजे होते की, कॉग्रसे परवडली पण भाजपा नको. परंतु त्यावेळी मंत्रीपद राणेंना भुलवत होते. आता सात महिने म्हणजे विधानपरिषदेच्या पुढील निवडणुकीपर्यंत तरी आमदारकीसाठी वाट पहावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा प्रत्यक्ष लाभ होईल त्यावेळी जेमतेम एक वर्षावर निवडणूक आलेली असेल. त्यातही दोन महिने आचारसंहिता असेल. म्हणजे जेमतेम दहा महिन्यांचे मंत्रिपद असेल. जर परत हे सरकार सत्तेत आले नाही तर सर्वच गेले. अशा प्रकारे राणेंचा भाजपाच्या मार्गाने गेल्यावर फारसे काही हातात लागणार नाही अशीच चिन्हे दिसत आहेत. कॉग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले नसले तरीही मंत्रिमंडळात दोन क्रमांकाचे स्थान दिले, दिल्लीतील नेत्यांवर आरोप करुनही त्यांना सन्मानाने पुन्हा पक्षात घेतले, एका मुलाला आमदार व दुसर्‍याला खासदार केले, विधानसभेला पराभव होऊनही त्यांना परिषदेवर पाठविले. असे लाड भाजपा करील का ही शंकाच आहे. यावेळी एकाच जागेसाठी निवडणूक होणार असल्याने राणेंना अन्य पक्षातून विजयासाठी आवश्यक मते जमविता येतील का अशी शंका भाजपाच्या नेत्यांना वाटत होती. अशा वेळी प्रसाद लाड यांच्यासारखा पैशाने भरभक्कम असलेला व मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असलेल्याला तिकिट देणे पसंत केले आहे. अर्थातच यासाठी भाजपाने ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्यावर अन्याय केला अशी चर्चा झाली. अर्थात गेल्या वेळी दरेकरांना तिकीट दिले त्यावेळीही हीच चर्चा झाली होती. परंतु भाजपाही पार्टी विथ द डिफरन्स राहिलेली नाही तर कॉग्रेससारख्या राजकारणात ते रुळले आहेत, असेच म्हणावे लागते. राजकारणात दीर्घकाळ टिकायचे तर आपल्या समर्थकांना राजकीय बळ द्यावे लागते. राज्यातील आजवरच्या अनेक नेत्यांनी हेच केले. आज प्रसाद लाड यांना विधान परिषदेची भाजपाची उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोच कित्ता गिरविला आहे. त्यात भंडांरींसारख्या जेष्ठ नेत्यावर अन्याय हे होणारच. मात्र आर्थिक बळाचा वापर करुन सत्तेसाठी आलेले लांडांसारख्या नेत्यांचे मात्र पक्षात लाड होतात. प्रसाद लाड खरेतर अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्ये होते. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेले आणि चांगलेच स्थिरावले. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विधान परिषदेची संधी दिली. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील कट्टर समर्थक परिणय फुके यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशीच प्रतिष्ठा पणाला लावली आणि फुके विजयी झाले होते. प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह यांना विधान परिषदेवर पाठविताना मुंबई महापालिकेचे राजकारण डोळ्यांसमोर होते. मात्र, आज लाड यांना मिळालेली उमेदवारी ही मुख्यमंत्री समर्थकांना भविष्यात मिळणार असलेल्या संधीची सुरुवात मानली जात आहे. लाड यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: शब्द टाकल्याची माहिती आहे. याशिवाय ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याशी असलेली मैत्री लाड यांच्या मदतीला आली. पक्षसंघटनेत वर्षानुवर्षे निष्ठेने काम करीत आलेल्या माणसांना आमदार, खासदारकीसाठी ताटकळावे लागते हा अनुभव घेणारे माधव भंडारी हे पहिलेच नाहीत. कॉग्रेसमध्ये पूर्वी हे सर्रास चालत असे, मात्र आता भाजपातही हे सुरु झाले आहे. त्यामुळे पक्षात केवळ निष्ठा कामाला येत नाही तर तुमची आर्थिक ताकदही महत्वाची ठरते. संघटनेच्या दडपणात भाजपात कोणी जाहीर बोलत नाही एवढेच. अगदी आजचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनाही एकेकाळी अशा रुबाबाला नागपुरात बळी ठरावे लागले होते. ते पालकमंत्री असताना त्यांना भाजपाच्या कार्यालयात बाहेर ताटकळत बसविले जात असे. पक्षसंघटनेतील माणसांना संधी देण्याचा विषय आला की मग साहजिकच या सल्लागारांना आपल्या पंक्तीत घेण्यास पक्षाचेच सत्ताकर्ते अनुत्सुक असतात. माधव भंडारी यांना डावलल्याने हा विषय पुन्हा समोर आला आहे. भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पक्षसंघटनेतील पदाधिकारी यांच्यातील सुप्त संघर्षाची किनारही त्यांना डावलण्यामागे आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "लाडांना तिकीटाचा प्रसाद; राणे भाजपातही वेटिंगवरच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel