-->
कॉग्रेससाठी आशेचा किरण

कॉग्रेससाठी आशेचा किरण

शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
कॉग्रेससाठी आशेचा किरण
तीन वर्षापूर्वी केंद्रात व वेळोवेळी राज्यातील सत्ता गेल्यावर कॉग्रेसची पराभूताची मानसिकता काही संपुष्टात येत नव्हती. अनेक राज्यात तसेच विविध स्थानिक पातळीवरील निवडणुकीत कॉग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कॉग्रेस काही पराभूताच्या मानसिकतेतून बाहेर येऊच शकत नव्हती. बरे एवढे काळ सत्ता उपभोगल्यावर विरोधात बसण्याची कॉग्रेसची मानसिकता सुंपुष्टात आल्यासारखी स्थिती होती. कॉग्रेसच्या नेत्यांनाही असेच नेहमी वाटे की आपल्याला कायमच सत्तेच्या वर्तुळात राहण्याची संधी मिळणार आहे. परंतु जनतेने कॉग्रेसला आलेली सत्तेची सूज उतरविण्याचे ठरविले आणि भाजपाला म्हणजे नरेंद्र मोदी यांना सत्तास्थानी बसविले. कॉग्रेसमधील सत्तेच्या काळात झालेला भ्रष्टाचार व एकूणच सरकारच्या कामात आलेली शिथीलता पाहता कॉग्रसेला काही काळ का होईना सत्तेच्या बाहेर ठेवणे जनतेला आवश्यक वाटले आणि कॉग्रेस सत्ताभ्रष्ट्र झाली. भाजपाने तर कॉग्रेसमुक्त भारत करण्याची शपथच घेतली. अर्थात कॉग्रेस वा कोणताही पक्ष अधोगतीला लागला तरी संपत नाही. प्रत्येक पक्षात चढ-उतार हे असतातच. बरे कॉग्रेस पक्षाला तर इतिहास आहे. त्यामुळे भाजपाने केवळ कॉग्रेसच नव्हे तर अन्य कोणत्याही पक्षाला संपविण्याच्या घोषणा केल्या तरी तो त्यांचा अतिआत्मविश्‍वास ठरणार आहे. मात्र सत्ता गेल्यापासून कॉग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या गाळाला लागले. भाजपाची सत्ता येणार अशी चिन्हे दिसू लागल्यावरच अनेकांना कॉग्रेसच्या या बुडत्या बोटीतून उड्या टाकून भाजपाच्या बोडीत उड्या मारल्या होत्या. अशावेळी कॉग्रेस आता संपणार अशीच अनेकांची अटकळ बांधली जात होती. कॉग्रेसला सर्वत्र पराभवाचे चटके सहन करावे लागत असताना एक आशेचा किरण दाखिणारी घटना घडली आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा पराभव कॉग्रसेचे नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांनी केल्याने कॉग्रेसमध्ये आनंद उसळणे समजू शकतो. अनेक ठिकाणी जिकडे सध्या कॉग्रेस अस्थित्वात आहे तिकडे या विजयाचा मोठा उत्साह साजरा करण्यात आला. स्मृती उराणी यांच्या विजयामुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ काँग्रेसपेक्षा एकने वाढले, त्याचा आनंद भाजपच्या गोटात पसरला असतानाच काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या नाट्यमय विजयाने भाजपच्या आनंदावर विरजण पडले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची जी काँग्रेसमु भारताची घोडदौड सुरू होती, तिला खीळ बसली. अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने व अमित शहा यांनी जंगजंग पछाडले होते. मात्र गुजरातसारख्या होम ग्राऊंडवर अमित शहा यांचा पराभव झाल्याने त्यांना ही बाब आणखी बोचली आहे. अमित शहा यांच्या चाणक्य नीतीला आता धक्का बसला आहे. भाजपचे जे नेते कूटनीती, डावपेच सध्या अंमलात आणतात त्याला सौजन्यपूर्ण भाषेत चाणक्य नीती असे म्हटले जाते. अहमद पटेल पडावेत यासाठी भाजपाने दाम, दंड, भेद अशी चाणक्यनीती या निवडणुकीत हुशारीने वापरण्यात आली. अगदी शंकरसिंह वाघेला या गुजरातमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याला काँग्रेसमधून राजीनामा देऊन त्यांच्यासोबत काँग्रेसचे 7 आमदार, अहमद पटेल यांचा पराभव होण्यासाठी भाजपच्या थिंक टँकला मदत करत होते. मते फुटू नयेत म्हणून काँग्रेसचे 44 आमदार कर्नाटकात ज्या रिसॉर्टवर नेले त्या रिसॉर्टच्या मालकाच्या घरावर धाडी टाकून सत्तेची ताकद दाखवण्यात आली. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आहेत. त्यांचा पराभव झाला म्हणजे सोनिया गांधी यांचा व्यक्तिगत पराभव झाला हे गृहितक मांडून भाजपने आपली रणनीती आखली. 18 राज्ये हातात आहेत, त्यासोबत लोकसभेत बहुमत, राज्यसभेत काँग्रेसपेक्षा संख्याबळ जास्त, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती संघ परिवाराचे असा सगळा अनुकूल माहोल असताना काँग्रेसच्या थिंक टँकमधील, सोनिया-राहुल यांच्या वर्तुळातील नेत्यांची जेवढी राजकीय कोंडी करता येईल तेवढे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. या निवडणुकीत भाजप, काँग्रेससह राष्ट्रवादी, जनता दल (यू) आदी राजकीय पक्षांचे जे वर्तन होते, ते सर्वाधिक संतापजनक होते. या आधी भाजपने गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश येथील राज्ये गिळंकृत करून आपली नैतिकता कोणत्या दर्जाची आहे हे दाखवून दिले. जो संघ परिवार नैतिकवादी राजकारणाच्या गप्पा मारत असतो त्या परिवारातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना भाजपच्या गेल्या तीन वर्षांतल्या मोदी-शहा यांच्या अतिआक्रमक, विधिनिषेधशून्य राजकीय डावपेचांचा उबग आल्याची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचारापासून, वशिलेबाजी, घराणेशाही, कुटिल राजकारण करणारा पक्ष असे सगळ्याच प्रकारचे बदनामीचे शिक्के आहेत. मात्र, केवळ तीनच वर्षांत भाजपने व त्यांच्या मित्र पक्षांनी काँग्रेसलाही आता मागे टाकले आहे. भाजपाची आता कॉग्रेस झाली आहे असे आता जनता उघडपणे बोलू लागली आहे. सोनिया गांधी यांची जिरवणे, अहमद पटेल यांना हरवणे व एकूणच काँग्रेस पक्ष संपवून टाकणे हे जर एखाद्या पक्षाच्या राजकारणाचे अंतिम उद्दिष्ट असेल तर ते देशाच्या एकूण भवितव्यासाठी चिंताजनक आहे. कारण देशासमोरील अग्रक्रम काँग्रेसमुक्ती हा नाही. ज्या विकासाचे गुलाबी चित्र दाखवून भाजपा सत्तेत आली आहे तो विकास करुन दाखविणे महत्वाचा आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत विरोधी पक्ष असणे हे देखील आवश्यकच आहे. कारण विरोधकांशिवाय आपली लोकशाही बलशाली होऊ शकत नाही. त्यामुळे कॉग्रेसला संपविण्याची भाषा भारतीय सत्ताधारी करतात हीच लोकशाहीसाठी मारक प्रक्रिया ठरावी. कॉग्रेससाठी हा निकाल मोठा आशेचा किरण ठरला आहे. मात्र यातून आता धडा घेऊन देशातील कॉग्रेसजनांनी एकत्र येऊन भाजपाचा या आक्रमक पवित्र्यास तोंड दिले पाहिजे.
--------------------------------------------------------------

0 Response to "कॉग्रेससाठी आशेचा किरण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel