-->
ऊस उत्पादन वाढणार

ऊस उत्पादन वाढणार

शनिवार दि. 27 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
ऊस उत्पादन वाढणार
राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ऊस लागवड किमान 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काही भागात पाण्याअभावी उसाची उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या हंगामात मुबलक ऊस उपलब्ध राहील असे वाटत नाही, असे निरीक्षण साखर संघाने नोंदविले आहे. साखर आयुक्तांच्या सांगण्यानुसार, राज्यात 2015-16 मधील हंगामात शेतकर्‍यांनी 9 लाख 87 हजार हेक्टरवर ऊस होता. मात्र, सलग दोन वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागल्यामुळे गेल्या हंगामात उत्पादन घसरले. त्यामुळे गेल्या हंगामात म्हणजे 2016-17 मध्ये अवघ्या 6 लाख 33 हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध झाला. मात्र, येत्या 2017-18 मधील हंगामासाठी ऊसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यांसाठी यंदा 9 लाख हेक्टरपेक्षा जादा ऊस उपलब्ध होईल. नेमके किती उत्पादन होणार तसेच साखर किती तयार होणार याविषयी आताच कोणताही अंदाज बांधता येणार नाही. साखर उद्योगाच्या सांगण्यानुसार, पुढील हंगामासाठी राज्यात जादा ऊस शिल्लक राहणार असल्यामुळे शासनाने आतापासूनच पूर्वतयारी करण्याची गरज आहे. साखर कारखान्यांचे पुनर्गठन, आजारी साखर कारखान्यांना पुन्हा चालू करणे, इथेनॉल तसेच सहवीजनिर्मितीला प्रोत्साहन हे निर्णय आत्तापासूनच घेण्याची आवश्यकता आहे. ऊस लागवडीत उत्तरप्रदेशानंतर देशात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राचे सरासरी ऊस क्षेत्र 9.78 लाख हेक्टर आहे. मात्र, उत्पादन घटल्यामुळे गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांना 361 लाख टन ऊस कमी पडला. त्यामुळे काही साखर कारखान्यांना आपले उत्पादन सुरु करता आले नव्हते. राज्य शासनाला देखील हंगाम केव्हा सुरू करायचा विषयी कमालीची संभ्रमावस्था होती. राज्याचा हंगाम सुरू करण्याविषयी जाहीर करण्यात आलेली तारीख देखील नंतर बदलण्यात आली होती. अशा प्रकारचा घोळ पुढील हंगामात होणार नाही यासाठी राज्य शासनाने आतापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात गेल्या हंगामात 88 सहकारी व 62 खासगी अशा एकूण 150 साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यांचा उतारा 11.24 टक्के होता. दोन वर्षापूर्वीच्या हंगामात 177 कारखान्यांनी (यात 99 सहकारी व 78 खासगी) 733.79 लाख टन उसाचे गाळप केले  होते. त्यामुळे साखरेचे उत्पादन देखील 82.82 लाख टनापर्यंत गेले व उतारा 11.29 टक्के होता. गाळप करणार्‍या साखर कारखान्यांची संख्या गेल्या दोन-तीन वर्षात रोडावत चालली होती. आता मात्र उस उत्पादन वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने ही संख्या आता वाढेल. गेल्या हंगामात 27 कारखाने बंद राहिल्यामुळे एकूण फक्त दीडशे साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केली. त्यातून एकूण 372.45 लाख टन उसाचे गाळप करून 41.86 लाख टन साखर तयार झाली आहे. उसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज लावला जात असला तरी राज्याच्या अनेक भागात उसाला वेळेत पाणी मिळालेले नाही. त्यामुळे पिके धोक्यात असून ऊस जादा उपलब्ध होईलच असे ठामपणाने सांगता येत नाही. काही भागात शेतकर्‍यांचा ऊस जळतो आहे. पाऊस वेळेत न झाल्यास स्थिती आणखी कठीण होईल. त्यामुळे पावसाकडेही आता अनेकांचे डोळे लागले आहेत. सध्या साखर उद्योगाबाबत समाधानकार चित्र वाटत असले तरीही येत्या जूनमध्ये पाऊस कसा पडतो, त्यावर बरेचसे अवलंबून राहील.

0 Response to "ऊस उत्पादन वाढणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel