-->
पुरोगामी चळवळीचा  बुलंद आवाज हरपला

पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज हरपला

शनिवार दि. 10 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पुरोगामी चळवळीचा 
बुलंद आवाज हरपला
पतीने आयुष्यभर जोपासलेले पुरोगामी विचार गेल्या अर्ध्या शतकाहून सातत्याने पुढे नेणार्‍या मेहरुन्निसा दलवाई यांचे पुण्यात निधन झाले आणि एक पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज हरपला. सध्याच्या गढूळ झालेल्या वातावरणात त्यांच्यासारख्या मुस्लिम समाजातील स्त्रियांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासारख्या समाजसुधारकांची आवश्यकता होती. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे कट्टर पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या त्या पत्नी. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या त्या अध्यक्षा होत्या व मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यातही त्या अनेक वर्षे सक्रिय होत्या. मी भरून पावले आहे हे तयंचे आत्मचरित्र 1995 मध्ये प्रकाशित झाले होतेे. मुस्लिम समाजातील समाजसुधारणा चळवळी, मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्‍नांबद्दलच्या चळवळी आणि आंदोलने यांत मेहरून्निसा यांचा सक्रिय सहभाग असे. हमीद दलवाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर मेहरुन्निसा दलवाई यांनीही मुस्लिम समाजातील सुधारणेच्या कार्यात वाहून घेतले होते. हमीद दलवाई हे पुरोगामी चळवळतील मोठे नाव. मुस्लिमांमधील तीन तलाकचा मुद्दा आता गाजत आहे. अनेक जण त्यावर आपली राजकिय पोळी भाजत आहेत. आताच्या सत्ताधारी तर त्याला चांगलीच हवा देत आहेत. मात्र, अनेक वर्षांपुर्वी हमीद दलवाई यांनी तीन तलाकचा मुद्दा लावून धरला होता. 1986-87 साली त्यांनी शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेरुन्निसा यांनी यांनी मोठी जनजागृती केली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात तलाकमुक्ती मोर्चा काढला होता. मुस्लिमांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले होते. समाजसुधारणेच्या उद्देशाने हमीद दलवाई यांनी 1970मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्‍न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार पसरविण्याचेे प्रयत्न अशा अनेक प्रश्‍नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते. हमीद दलवाई यांनी 1966 मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढाला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी ही या मोर्च्याचा हेतू होता. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर भावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. हमीद दलवाई यांचे कार्य फार मोठे. नामवंत इतिहासकार रामचंद्र गुहा यांचं मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून भारतातील विविध क्षेत्रांतील एकवीस व्यक्तींचा त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये समावेश केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ज्योतिराव फुले, गोपाळकृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, ताराबाई शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पाच दिग्गजांसोबत हमीद दलवाईंचाही समावेश केला आहे. यावरुन हमीद दलवाई यांच्या कार्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. अशा या महान व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या मेहरुन्निसा दलवाई यांच्यावर हमीद दलवाई यांच्या विचारांचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. त्या केवळ हमीद दलवाई यांच्या पत्नीच राहिल्या नाहीत तर त्यांच्या विचारांच्या पाईक झाल्या. मुस्लिम महिलांना सतावणार्‍या तीन तलाकच्या मुद्द्यावर हमीद दलवाईंनी मोर्चा काढला होता. दलवाई दाम्पत्य आयुष्यभर आपल्या विचारांशी बांधिल राहिले. या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. एक रुबिना आणि दुसरी इला. या मुलींवरही निधर्मी, पुरोगामी संस्कार तयंनी केले. या दोन्ही मुलींनी आंतरधर्मीय विवाह करीत आपल्या कुटुंबाचे पुरोगामित्व जपले. हमीद दलवाई यांनी समाजसुधारणेचा पायंडा घालून देण्यासाठी मुस्लिम असूनही मरणोत्तर आपल्या देहाचे दहन करावे, अशी त्यांनी आपली अंतिम इच्छा सांगितली होती. मेहरून्निसा दलवाई यांनी त्याही पुढे एक पाऊल पुढे जात आपल्या देहदानाचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानुसार, हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. मुस्लिम समाजातून लोक देहदानासाठी पुढे आले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते. लोकांना देहदान करण्याचा सल्ला देत असताना त्यांनी आपल्या देहदानाची घोषणा केली होती व एक नवा पायंडा पाडला. यातून त्यांच्याविषयी लोकांमध्ये आणखी विश्‍वास निर्माण झाला. मुस्लिम समाजात सुधारणा होण्याची आववश्यकता आहे, त्यासाठी मुस्लिमांमध्ये शिक्षणाची आवश्यकता आहे असे ते नेहमी सांगत. मुस्लिमांमध्ये शिक्षण झाले की, त्यांच्या पुढचे पाऊल हे सुधारणेचे पडेल. तसेच मुस्लिमांमधील सुधारणा या त्या समाजातूनच व्हायला पाहिजेत. त्यासाठी अन्य धर्मियांनी त्यांच्यावर कोणताही दबाव आणू नये, असे त्यांचे नेहमी म्हणणे असे. केवळ मुस्लिमातीलच नव्हे तर कोणत्याही धर्मियांतील सुधारणा या त्या धर्मियांनीच केल्या पाहिजेत, यावर त्यांचा ठाम विश्‍वास होता. म्हणून मेहरुन्निसा दलवाई या नेहमीच मुस्लिमांतील सुधारणा करण्यासाठी आयुष्यभर झटल्या. सध्या मुस्लिम समाजातील सुधारणा हा मुद्दा एैरणीवर आला असताना त्यांच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या महिलेचे निधन होणे ही केवळ मुस्लिम चळवळीचेच नव्हे तर देशातील पुरोगामी चळवळीचे एक मोठे नुकसान झाले आहे.
----------------------------------------------------------  

1 Response to "पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज हरपला"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel