-->
ईशान्येची माणसे जोडणारा सेतू

ईशान्येची माणसे जोडणारा सेतू

सोमवार दि. 29 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
ईशान्येची माणसे जोडणारा सेतू
ईशान्य भारतातील दोन महत्त्वाची राज्ये आसाम व अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतर कमी करणारा व त्यामुळे येथील माणसे जोडणार्‍या पुलाचे नुकतेच उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अतिशय मागास असलेल्या तसेच निसर्गसंपन्न दर्‍याखोर्‍यांचा प्रदेश म्हणजे ईशान्य भारत आहे. येथील मागासलेपण हे प्रामुख्याने येथील विकासाच्या मर्यादित संधी असल्यामुळे आजवर येथील जनता उपभोगत आहे. येथील दर्‍याखोर्‍यांतून जाणारे रस्ते तसाच रेल्वेचाही अपवाद, तुरळक प्रमाणात असलेली विमान सेवा व त्याच्या जोडीला फुटीरतावादी शक्ती येथे पोसल्या गेल्यामुळे येथील विकास हा जवळपास नव्हताच. येथून खरे तर रेल्वे गेली असती, तर येथील विकासाची दारे झपाट्याने उघडली गेली असती. परंतु, स्वातंत्र्यानंतर सात दशके लोटली, तरी येथील जनतेने रेल्वेच्या इंजिनचा धूर काही पाहिलेला नाही. येथील जनता ही फारच सोशिक आहे. कदाचित येथील दर्‍याखोर्‍यांमुळेच त्यांच्यात ही सोशिकता जोपासली गेली असावी. हा भाग भारतात असला, तरी नैसर्गिकदृष्ट्याच आपल्या देशापासून अलिप्त असल्यासारखा दिसत असे. चीन येथून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे यात आणखीनच भर पडली होती. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राज्यकर्त्यांनीही या भागाकडे पाहिजे तसे लक्ष पुरविले नव्हते. आता मात्र साडेनऊ कि.मी. लांबीचा हा पूल सुरु झाल्याने येथील विकासाला एक नवीन चालना मिळणार, हे नक्की. या पुलामुळे आसाम व अरुणाचल प्रदेशमधील अंतर 165 कि.मी.ने कमी होणार आहे. एवढे अंतर कमी होणार असल्यामुळे या पुलाचे महत्त्व अधोरेखित होते. या पुलामुळे धोला ते सादिया हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ पाच तासांनी कमी होणार आहे. यामुळे दररोज तब्बल दहा लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चीनच्या सीमेवर आपल्या सैन्याची कुमक पोहोचविणे झपाट्याने शक्य होणार आहे. चीनचे आक्रमण व विस्तारवादी धोरण लक्षात घेता आपल्याला या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य व त्यांची कुमक पोहोचविण्याची तरतूद करावी लागणार आहे. या पुलामुळे ते सोपे झाले आहे. 1962 सालच्या युद्धात अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर पोहोचण्यासाठी फार विलंब झाला होता, त्यात आपले मोठे नुकसान झाले होते. आता ब्रम्हपुत्रा नदीवरील या पुलामुळे अरुणाचल प्रदेशात आपले सैन्य पोहोचविणे सोपे जाणार तर आहेच; शिवाय, लष्कराचे रनगाडे या पुलावरुन जाऊ शकणार असल्यामुळे लष्कराला या पुलाचा सर्वाधिक उपयोग होईल. देशातील सर्वात लांब असलेला हा पूल लष्करासाठी जसा फायदेशीर ठरणार आहे, तसेच येथील जनतेची मने जोडणारा एक मोठा दुवा ठरेल, यात काही शंका नाही. आसाममधील सादीया जिल्हा हा दळण-वळणाअभावी पूर्णपणे संपर्कहीन होता. लोहित, ब्रह्मपुत्रा आणि दिबंग नद्यांच्या पात्रांनी हा जिल्हा वेढला गेला आहे. आता पूल झाल्यामुळे या भागातील दळण-वळण सोपे झाले आहे. सादिया हे गायक भूपेन हजारिका यांचे जन्मगाव असल्यामुळे या पुलाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या आठवणी या निमित्ताने सरकारने जागृत ठेवल्या आहेत. 1950 साली येथे झालेल्या भीषण भूकंपानंतर ब्रह्मपुत्रेने आपले पात्र बदलले होते, त्यानंतर येथील गावे संपर्कहीन झाली होती, ती आजवर. आता मात्र या पुलामुळे ही गावे विकासाच्या नकाशावर आली आहेत. तसे पाहता, ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा चौथा पूल. यामुळे आसाम व अरुणाचल प्रदेश ही राज्ये हाकेच्या अंतरावर आली आहेत. चीनच्या सीमेवर जाण्यासाठी आता तीन ते चार तासांची बचत होणार आहे. या पुलाची उभारणी 182 खांबांवर करण्यात आली आहे. तसेच भूकंप झाला तरी हा पूल त्यातून वाचावा यासाठी हायड्रॉलिक रिंग्जसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा पूल भूकंप झाला तरी त्यातून वाचू शकेल. लष्कराची अवजड वाहने व 60 टनी रनगाडे नेण्याची क्षमता या पुलात आहे, ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. हा पूल होण्याअगोदर धोला ते सादिया हे अंतर बोटीतून पार करावे लागे. 250 कि.मी. अंतर कापण्यासाठी दहा तासांचा वळसा घालावा लागे. आसामची राजधानी दिसपूरहून हा पूल 540 कि.मी., तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरहून 300 कि.मी. अंतरावर आहे. दिब्रुगढ विमानतळ तसेच तीनसुखीया रेल्वे स्थानकावर पोहोचण्यास या पुलाची मोठी मदत होणार आहे. या नदीतून जाण्यासाठी पूर्वी बोटींचा वापर केला जाई. त्यासाठी असलेले 150 बोटचालक हे बेकार होणार आहेत. मात्र, सरकारने त्यांचे पुनर्वसनाचे आव्हान पेलले आहे. अर्थात, हे पुनर्वसन कसे करणार, हे अद्याप काही जाहीर केले नाही. अर्थात, सरकारला त्यांचे पुनर्वसन हे करावेच लागणार आहे. अशा या महत्त्वाच्या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा पूल यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने 2011 साली बांधण्यास सुरुवात केली होती. या पुलाची उभारणी ही 2015 साली पूर्ण होणे अपेक्षित होती. परंतु, पुलाच्या उभारणीस झालेला विलंब पाहता याचा खर्चही वाढत गेला. अखेरीस हा पूल भाजप सरकारने पूर्ण केला. यातील राजकारणाचा भाग सोडून दिला तरीही काँग्रेसच्या सरकारने आखलेली ही पुलाची संकल्पना भाजपने आता पूर्ण केली आहे, असे म्हणावे लागेल. पूल उभारण्याचा झपाटा लावणारे मंत्री असलेले केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रीपदाच्या काळात हा पूल तयार झाला, हा आणखी एक योगायोग म्हटला पाहिजे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील 57 पुलांची उभारणी करण्यात गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता त्यांनी अपघातग्रस्त सावित्री नदीवरील पूलदेखील विक्रमी काळात उभा करुन दाखविला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील हा शतकभर जुना असलेला पूल गेल्या वर्षी 2 ऑगस्ट रोजी रात्री पुरामध्ये वाहून गेला होता. त्यानंतर काळोख्या रात्री न दिसल्यामुळे या पुलावरुन जाणार्‍या दोन एसटी बस वाहून गेल्याने मोठा अपघात झाला होता. या पुलाच्या कामास सुरुवात झाल्यापासून सहा महिन्यांत याची उभारणी करुन देण्याचा संकल्प गडकरी यांनी केला होता. हा संकल्पदेखील त्यांनी पूर्ण केला आहे. येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात या पुलाचे उद्घाटन होत आहे. पूल मग तो कोणताही असो, अगदी सावित्री नदीवरील असो किंवा ब्रह्मपुत्रेच्या नदीवरील माणसे जोडणारा हे सेतूच असतो. त्याच्या अंतरावरुन त्याचे महत्त्व काही कमी-जास्त होत नाही, मात्र ब्रह्मपुत्रेवरील पूल हा बहुद्देशीयच ठरणार आहे, यात काही शंका नाही.
------------------------------------------------------

0 Response to "ईशान्येची माणसे जोडणारा सेतू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel