-->
घटस्फोटाची समस्या

घटस्फोटाची समस्या

मंगळवार दि. 16 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
घटस्फोटाची समस्या
सध्या आपल्या देशात मुस्लिमांच्या तीन वेळा तलाख बोलून आपल्या पत्नीस घटस्फोट देण्याचा प्रश्‍न गाजतोय. अर्थातच मुस्लिम महिलांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. कारण, या घटस्फोटात मुस्लिम महिलांनाच त्राास भोगावा लागतो. पुरुष मात्र घटस्फोट देऊन नामानिराळा होतो. जर मुले असली तर त्यांची जबाबदारी ही अर्थातच स्त्रीवर येते. मुस्लिमांची ही तलाख पद्धत सध्याच्या काळात अमानवीय असल्याने ती बंद झाली पाहिजे, याबाबत कुणाचेही दुमत असण्याची शक्यता नाही. सुधारणावादी मुस्लिमांचाही या पद्धतीस विरोध आहे. मात्र, सध्या केवळ मुस्लिमांचाच घटस्फोट चर्चेत आहे. आता हिंदू, ख्रिश्‍चन, बौद्ध, शिख यांच्यातही घटस्फोटाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अर्थातच त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भाजपचे नेते गप्प बसलेले दिसतात. घटस्फोटाचे प्रमाण किंवा विभक्त होणे, ही आता बहुतांशी धर्मियांमध्ये एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न केवळ मुस्लिमांचाच नसून, ही सर्वधर्मियांची एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्‍नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास आपल्याकडील कुटुंब व्यवस्था नजीकच्या काळात धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2011 सालच्या जनगणनेनुसार, मुस्लिमांमध्ये प्रत्येक एक हजार विवाहित महिलांपैकी पाच महिलांचा घटस्फोट होतो. ख्रिश्‍चनांमध्ये हा दर मुस्लिमांसारखाच आहे. हिंदूंमध्ये हा दर अर्ध्यावर आहे. तर बौद्धांमध्ये हा दर सर्वधर्मियांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. लग्न झाल्यावर काही ना काही कारणाने जर पती-पत्नीमध्ये विसंवाद निर्माण झाल्यास ते विभक्तपणे राहाण्यास सुरुवात करतात. बहुतेकवेळा ही घटस्फोटाची पहिली पायरी असते. या विभक्त राहाण्याचे प्रमाण सर्व धर्मियांत ख्रिश्‍चनांमध्ये व बौद्धांमध्ये सर्वाधिक म्हणजे सरासरी 12 टक्क्यांच्या जवळपास आहे. हे प्रमाण हिंदूंमध्ये 6.9 टक्के तर मुस्लिमांमध्ये 6.7 टक्के आहे. म्हणजे, विभक्तपणे राहाण्याचे प्रमाण हे मुस्लिमांपेक्षा हिंदुंमध्ये जास्त आहे. गेल्या काही वर्षात पती-पत्नीने विभक्त होणे, तसेच घटस्फोट घेण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, ही बाब सर्वात चिंतेची म्हटली पाहिजे. शिख धर्मियांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 100 टक्क्यांनी वाढले आहे. त्याखालोखाल जैन धर्मियांतील वाढ ही 50 टक्के, ख्रिश्‍चन धर्मियांतील वाढ ही 46 टक्के आहे. त्याखालोखाल मुस्लिमांचा क्रमांक लागतो. मुस्लिमांमध्ये विभक्त होण्याचे व घटस्फोटाचे प्रमाण 39 टक्क्यांनी वाढले आहे. तर हिंदुंमध्ये हे प्रमाण 40 टक्के आहे. घटस्फोटाचे हे प्रमाण एक चिंतेचा विषय ठरणार आहे. शिख समुदायातील घटस्फोटाच्या वाढीचे हे प्रमाण विदेशात स्थायिक झालेल्यांचे सर्वाधिक आहे. पंजाबमध्ये हरित क्रांती झाल्यावर गरीबी गेली हे वास्तव आहे. मात्र, येथील कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पंजाबात अंमली पदार्थांचा वाढलेला संचार ही जशी एक मोठी समस्या आहे, त्याच धर्तीवर घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालल्याने येथील कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. माणसाच्या हातात धनसंपत्ती आली की सर्व प्रश्‍न सुटले असे नव्हे तर, यातून अनेक नव्या समस्या निर्माण होतात, हे पंजाबातील आताचे प्रश्‍न पाहिल्यास पटू शकते. विभक्त होणे व घटस्फोटाच्या प्रकरणातील वाढ ही हिंदूंमध्ये मुस्लिमांपेक्षा जवळपास पाच टक्क्यांनी जास्त आहे. याचा अर्थ काय समजायचा. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे; परंतु आपली एक गोड समजूत असते की, मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त असावे. परंतु, ही समजूत खोटी आहे. ख्रिश्‍चनांमध्ये तर याच्या वाढीचे प्रमाण हे हिंदुंपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे. घटस्फोटाच्या या वाढत्या प्रमाणाशी शिक्षणाचा काडीचाही संबंध नाही. त्याचा कदाचित आर्थिक गटाशी संबंध असू शकतो. मुंबई-पुणे-दिल्लीसारख्या महानगरात तर गेल्या काही वर्षांत लग्नानंतर एका वर्षात घटस्फोट होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. स्त्री आता स्वतंत्र झाली आहे, तिच्या पायावर ती उभी आहे. अशा वेळी तिचे जर नवर्‍याशी पटले नाही, तर ती पूर्वीच्या काळाप्रमाणे आता कोणतीही तडजोड करावयास तयार नाही. ती लागलीच घस्फोट घेण्याच्या विचारापर्यंत पोहोचते. पुरुषांचेही असेच आहे. आपल्या पत्नीशी समजून घेण्याचा आता काळ संपला आहे, तिचे जर पटले नाही तर तो घटस्फोट घेण्याचा क्षणात विचार करतो. गेल्या काही वर्षात हे विचार बदलल्याने समाजात हे बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी घटस्फोट समाजात स्वीकारला जात नव्हता, आता तसे राहिलेले नाही. घटस्फोट होणे ही बाब समाजाने लग्न ठरल्यासारखी स्वीकारली आहे. आपल्याकडे 91 पासून आर्थिक सुधारणा सुरु झाल्यावर अनेक सामाजिक बदल झाले. त्यातील हा एक मोठा बदल आहे. यातून कुटुंब व्यवस्था धोक्यात येणार आहे, हे नक्की. घटस्फोटीत पालकांच्या मुलांचे प्रश्‍न ही एक भावी काळातील मोठी समस्या आपल्या सतावणार आहे. आपल्याकडे गेल्या चार दशकात संयुक्त कुटुंब पद्धती टप्प्या-टप्प्यात संपुष्टात आली. विभक्त कुटुंब पद्धती ही त्यावेळी समाजाला आपलीशी वाटली. याचे काही फायदे-तोटे होते; परंतु आता त्याहीपुढे जाऊन आपल्याकडील वाढत्या घटस्फोटामुळे कुटुंब व्यवस्थाच धोक्यात येणार आहे. पती-पत्नीने परस्परांना समजून घेऊन संसार करण्याचे दिवस संपल्यात जमा होत आहेत. युरोपातील स्वतंत्र राहणे किंवा लिव्ह इन रिलेशनशीप ही पद्धती आपल्याकडे शहरात सुरु झाली आहे. या कुटुंब व्यवस्थेतील स्थित्यंतराचा हा काळ एकाच कोणत्या धर्मियांत नाही तर, सर्व धर्मियांत हे खूळ आले आहे. यातून होणारे आपल्या समाजातील बदल विचार करण्याच्या पलीकडचे आहेत. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे त्यातील पहिले पाऊल आहे.

0 Response to "घटस्फोटाची समस्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel