-->
राणेंचा सत्ता संघर्ष

राणेंचा सत्ता संघर्ष

शुक्रवार दि. 12 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
राणेंचा सत्ता संघर्ष
कोकणातील कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी आयोजित केलेल्या शेतकर्‍यांच्या संघर्षयात्रेवर जोरदार टीका केली आहे. अर्थात, राणेंची ही टीका अपेक्षितच होती. कारण, सध्या राणे कॉँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर सडकून टीका करीत आहेत. मात्र, त्यांनी अजून केंद्रीय नेतृत्वावर टीका केलेली नाही. असे असले तरीही कॉँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नाराज झालेले राणे गेले दीड महिना भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजपच्या दरवाजाची बेल वाजविली आहे. मात्र, हा दरवाजा उघडायला मुख्यमंत्री फडणवीस काही तयार नाहीत. खिडकीच्या दरवाजातील फटीतून पक्षाध्यक्ष अमित शहा राणेंना आतमध्ये येण्यासाठी खुणावत आहेत. परंतु, फडणवीसांनी अजून तरी दरवाजा न उघडण्याचा निश्‍चय केला आहे. त्यामुळे राणे आता काँग्रेसमध्ये केवळ उपचार म्हणून राहिले आहेत. एकदा का भाजपचा दरवाजा उघडला गेला की, राणे भाजपवासी होणार आहेत. राणेंनी संघर्ष यात्रेवर टीका केल्यावर अनेक वृत्तपत्रांनी ङ्गकाँग्रेसला राणेंचा घरचा आहेरफ अशी टीका केली होती. परंतु, काँग्रेसला हा घरचा आहेर म्हणता येणार नाही. कारण, सध्या काँग्रेसमध्ये राणे खरोखरीच आहेत का, असा सवाल उपस्थित होतो. तसे पाहता, आता राणेंची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यांच्यामागे त्यांचे या जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजे त्यांचे पुत्र नितेश राणे हेच आहेत. रत्नागिरीत राणेंची व काँग्रेसची ताकद नगण्यच आहे. अशा स्थितीत राणे मात्र आपल्यामागे आमदारांची मोठी संख्या असल्याचा आव आणत आहेत. त्यामुळे राणेंनी आपली सध्याची वास्तवातील ताकद नेमकी किती आहे, त्याचा विचार करावा. कारण, भाजप राणेंना आतमध्ये घेताना त्याचा विचार करणार आहे. तसेच सध्या सिंधुदुर्गातील जे भाजपचे नेते आहेत, त्यांचा तर राणेंच्या प्रवेशाला कडाडून विरोध आहे. आज राणे शिवसेनेतील 17 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असे सांगतात, त्या आमदारांना राणेंमार्फत भाजपशी संपर्क साधण्याची काहीच गरज नाही. मुख्यमंत्र्यांचा त्यासाठी संपर्क पुरेसा आहे. एकूणच, शेतकर्‍यांच्या संघर्ष यात्रेला विरोध करणार्‍या नारायण राणेंचा सध्या स्वतःच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या संघर्षासाठी लढा सुरु आहे, असेच म्हणावे लागेल. शिवसेनेत 35 वर्षे नगरसेवकपदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले राणे हे खरोखरीच त्यांच्या हिंमतीवर, कार्यावर आपली राजकीय कारकीर्द गाजवू शकले. शिवसेनेच्या राडा संस्कृतीत त्यांचे नेतृत्व तयार झाले. त्यातूनच ते घडले, वाढले व अनेक पदे त्यांनी उपभोगली. त्याबद्दल ते नेहमी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे ऋण व्यक्त करीत असतात. शिक्षण कमी असूनही नारायणरावांनी अभ्यासू वृत्तीमुळे प्रशासनावर पकड बसविली. त्यांचा रोखठोक स्वभाव व प्रशासनावर वर्चस्व ठेवून जनतेची कामे करण्याचा त्यांचा स्वभाव शिवसेनेच्या नेतृत्वालाही मान्य होता. मात्र, शिवसेनेच्या दुसर्‍या पिढीशी त्यांचे काही जमणे शक्य नव्हते व नारायण राणे आपल्या स्वभावात बदल करणारे नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस हा देशव्यापी महासागर. त्यामुळे त्यांची संस्कृतीच काही वेगळी. तेथे श्रद्धा व सबुरी ठेवणाराच विजयी होतो, हा इतिहास आहे. मात्र, शिवसेनेत 35 वर्षे घालविलेल्या राणेंची तेथेही घुसमट होणे स्वाभाविकच आहे. तरीदेखील त्यांना काँग्रेसने राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्रीपद तब्बल नऊ वर्षे दिले. मुख्यमंत्रीपद देण्याचे कबूल करुनही दिले नाही, ही वस्तुस्थिती आपण एकवेळ मान्यही करु. कदाचित, काँग्रसच्या नेतृत्वाला राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षातून होणारा विरोध नेतृत्व डावलूही शकत नव्हते. राणे त्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मात्र, काँग्रसने त्यांचा योग्य मान राखला. मुलाला खासदार करण्याचा त्यांचा हट्ट पुरविला. दुसर्‍या मुलाला आमदार केले. खुद्द राणेंचा विधानसभेत पराभव होऊनही त्यांना दीड वर्षात विधानपरिषदेवर पाठविले. आणखी त्यांना कॉँग्रेसने काय दिले पाहिजे होते, असा सवाल उपस्थित होतो. आता त्यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटी घेतल्या असल्या तरी काँग्रेसमध्ये असे झटपट निर्णय होत नसतात, हे राणेंना त्या पक्षात एक तपाहून जास्त काळ राहूनही समजत नसावे, याचे आश्‍चर्य वाटते. खरे तर, त्याहीपेक्षा सत्ता आता नाही त्याचे दुख जास्त असावे. त्यामुळेच त्यांनी भाजपची वाट धरली असावी. आता भाजपने त्यांची ङ्गइकडे आड तिकडे विहीरफ अशी स्थिती केली आहे. प्रत्यक्षात भाजपात गेल्यावर त्यांना काँग्रेस पक्षच बरा, असे वाटू लागेल. मात्र, सध्या तरी त्यांचा सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष सुरु आहे, त्यामुळे शेतकर्‍यांच्या संघर्षाकडे लक्ष नाही.

0 Response to "राणेंचा सत्ता संघर्ष"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel