-->
सत्तेचा माज!

सत्तेचा माज!

शनिवार दि. 13 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
सत्तेचा माज!
भारतीय जनता पक्ष हा स्वत:ला शिस्तप्रिय व कॉग्रेसहून वेगळा असल्याचा दावा करीत आला आहे. कॉग्रेसच्या कारभाराला कंटाळल्याने जनतेने एक बदल म्हणून भाजपा-शिवसेनेला सत्तेत आणले. खरे तर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष होता. मात्र सत्तेत बसण्यासाठी शिवसेनेने भाजपाशी जुळवून घेतले. आता शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागत आहे. त्यांना अशा वागण्यामुळे जनता आपल्याबरोबर राहिल असा विश्‍वास वाटतो. मात्र जनता शिवसेनेच्या या डावाला पूर्ण ओळखून आहे. भाजपातील अनेक नेत्यांच्या अंगात सत्ता पार भिनली आहे. त्यातील एक गृहस्थ- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. या साहेबांनी तूर शेतकर्‍यांबद्दल जे उद्दगार काढले ते पाहता सत्तेचा माज भाजपात कसा भिनला आहे, हे स्पष्टपणे दिसते. दानवेसाहेबांच्या या बेताल आणि बेफाम वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपाने व दानवेंनी आपला शेतकर्‍यांना बोलण्याचा हेतू नव्हता असे कितीही आता स्पष्ट केले असले तरी त्यावर आता कुणी विश्‍वास ठेवणार नाही. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या पोटी जन्माला आलेल्या दानवे यांच्यासारख्या नेत्याला तुरीच्या विक्रीसाठी शेतकर्‍यांची चाललेली परवड सत्तांधतेच्या चष्म्यातून दिसत नसावी. अल्पभूधारक प्रामुख्याने असलेले तूरउत्पादक शेतकरी हा विदर्भ, मराठवाडा आणि सोलापूरसारख्या दुष्काळी भागातला आहे. तूरीला जर योग्य भाव मिळाला नाही तर आपले कसे होणार याची या शेतकर्‍याला चिता आहे. या शेतकर्‍यांना मदत करणे तर दूरच; परंतु त्याचा अपमान करण्याचे धारिष्ट रावसाहेबांनी केले आहे. देशात तुरीचे उदंड पीक येत असताना परदेशातून लाखो क्विंटल तुरीची आयात केंद्र सरकारने केली नसती, तर तुरीचे भाव एवढे कोसळले असते काय? याचे उत्तर दानवे देणार नाहीत. खासदार दानवे यांचा केंद्रीय मंत्री ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास ते शेतकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करतात म्हणूनच झालेला आहे. ज्या शेतकरीवर्गाने भोकरदनच्या शेतीतून आमदार, खासदार, केंद्रीय मंत्रिपदापर्यंत नेले तो शेतकरी दानवेंना पुन्हा पूर्णवेळ शेती करण्यासाठी अन्य जबाबदार्‍यांतून मोकळा करू शकतो, याचे भान त्यांना ठेवलेले बरे. लोकशाहीमध्ये सत्तेची गुर्मी चढली, तर मतदार नेत्यांना रस्त्यावर आणून सोडतात. दानवे यांना भाजपाने खास ते शेतकर्‍यांचे नेते असल्यानेच या पदावर बसविले आहे. मात्र अशा प्रकारे सत्तेचा माज चढल्यावरही भाजपा या नेत्यांकडे जबाबदारीची पदे ठेवणार असले तर जनता या नेत्यांना घरी बसवेल यात काही शंका नाही.

0 Response to "सत्तेचा माज!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel