-->
बाहुबलीच्या निमित्ताने...

बाहुबलीच्या निमित्ताने...

रविवार दि. 07 मे 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
बाहुबलीच्या निमित्ताने...
गेली दोन वर्षे सातत्याने चर्चेत राहिलेल्या एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली : द कन्क्लुजन या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे वितरण घेतले आहेत. जगभराचा विचार करता या चित्रपटाचा गल्ला आत्ताच 800 कोटी रुपयांच्यावर गेला आहे. त्यामुळे हजार कोटी रुपयांचा टप्पा हा चित्रपट सहज पार करेल, यात काहीच शंका नाही. त्यामुळे याचे पुढील आठवड्यातील लक्ष्य हे दोन हजार कोटी रुपयांचे असेल. पहिला बाहुबली प्रदर्शित झाला होता त्यावेळीही त्या चित्रपटाने घसघशीत कमाई करत इतिहास रचला होता. संपूर्णत: भारतीय पौराणिक कथा, देशी तंत्रज्ञान वापरून उभे केलेले सेट्स, प्रचंड प्रमाणावर व्हीएफएक्स तंत्राचा वापर करून प्रेक्षकांसमोर आलेल्या या चित्रपटाने बॉलीवूडमधील दिग्गजांना आपली दखल घ्यायला लावली होती. त्यामुळे दोन वर्षांनी या चित्रपटाचा प्रदर्शित होत असताना एकीकडे हा इतिहास पुन्हा रचला जाईल, अशी आशा एकीकडे तर दुसरीकडे या चित्रपटाची उगाच हवा निर्माण केली जाते आहे, अशा दोन मतप्रवाहांमध्ये बाहुबली-दोन अडकला होता. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याने एक सुसाट हवाच आपली निर्माण केली. करण जोहरने ऐतिहासिक आठवडा असा उल्लेख करत बाहुबली-दोनच्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 41 कोटी रुपये, दुसर्‍या दिवशी 40.5 कोटी रुपये आणि रविवारचा तिससरा दिवस गृहीत धरता तीन दिवसांत 128 कोटींचा पल्ला गाठला. याशिवाय, या चित्रपटाच्या तेलुगू, मल्याळम आवृत्तीला दक्षिण भारतासह अमेरिकेतही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 121 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरातून 217 कोटींची कमाई केली. त्यामुळे बॉलीवूडचा शंभर-दोनशे कोटी क्लबमध्ये पहिल्याच दिवशी मुसंडी मारण्याचा अनोखा विक्रम चित्रपटाने साधला. दुसर्‍या दिवशी जगभरातून 382 कोटी रुपये तर तिसर्‍या दिवशी पाचशे कोटी रुपयांचा आकडा पार केला. त्यातच पहिला आठवडा संपत असताना सुप्रसिध्द दक्षिणी अभिनेता रजनिकांत यांनी या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले, याचा परिणाम असा झाला की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम स्थापन करेल हे नक्की झाले. बाहुबली- दोन या चित्रपटाला केवळ देशातच नव्हे तर सातासमुद्रापार मोठे यश मिळाले आहे. उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करत पहिल्या तीन चित्रपटांमध्ये येण्याचा मान या चित्रपटाला मिळाला आहे. परदेशात रेनट्रॅक पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया दोन्ही ठिकाणी चित्रपटाला प्रचंड यश मिळाले आहे. बॉलीवूडमध्ये तर आमिर खानच्या दंगल आणि सलमानच्या सुलतानने केलेले विक्रम बाहुबली-दोन नेे आधीच मोडीत काढले असून अवघ्या तीन दिवसांत पाचशे कोटींचा आकडा पार केला. बाहुबलीला याबाबत आता भारतीय चित्रपटांशी स्पर्धा नाही तर हॉलिवूडमधील चित्रपटांशीच स्पर्धा आहे, असे बोलले जाते ते खरेच आहे. बाहुबलीचे नेमके यश कशात आहे? असा प्रश्‍न आपल्याला पडतो. या चित्रपटातील भव्यदिव्यता व त्यांचे केलेले यशस्वी मार्केटिंग यालाच द्यावे लागेल. या चित्रपटातील राजवाड्यांसह अनेक सेट हे भव्य आहेत व त्यात कोठेही कृत्रीमपणा आढळत नाही. यातील प्रत्येक बाब जीवंत जाणवते. पहिल्या भागात देखील असेच होते. त्या भागात सुरुवातीलाच दाखविलेला सहा हजार फूटी धबधबा हा खरे तर केवळ सहा फुटीच आहे, असे जेव्हा सांंगितले जाते त्यावेळी कुणाचा विश्‍वासच बसत नाही. आता या दुसर्‍या भागातही राजवाडे, प्राणी व त्यांच्यावर बेतलेले कथानक या बाबी एवढ्या जीवंत आहेत की, बघणार्‍या प्रत्येकाला यात हरवल्यासारखे वाटते. अशी भव्य दिव्यता केवळ स्वप्नातच दिसू शकते. त्यामुळे प्रेक्षकांना यात नाविण्यपूर्ण बघावयास मिळते. यात हत्ती, घोडे, बैल,रानडुकर हे प्राणी आपल्याला दिसतात. मात्र यातील एकही प्राणी जिवंत नाही तर तो अ‍ॅनिमेटेड करुन यात चित्रीत करण्यात आला आहे. मात्र यात त्या प्राण्यात खरा खुरा सजीवपणा दिसतो, हे फार मोठे कौशल्य आहे. लाईफ ऑफ पाय या चित्रपटात देखील अशाच अ‍ॅनिमेटेड प्राण्यांनी प्रेक्षकांना भूलवून टाकले होते. बाहुबलीत देखील अनेक बाबी अ‍ॅनिमेटेड आहेत, मात्र त्याचा अशा प्रकारे उपयोग करण्यात आला आहे की, प्रेक्षकांना हे प्राणी अ‍ॅनिमेटेड आहेत हे पटतच नाही. चित्रपटाच्या यशात हा एक मोठा भाग आहे. त्याचबरोबर बाहुबलीचा पहिला भाग यशस्वी झाल्यावर दुसर्‍या भागाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात ताणली गेली होती, अर्थातच हे सर्व मार्केटिंगचे यश आहे. कारण कट्टापाने बाहुबलीला का मारले? हा प्रश्‍न अनेकवेळा उपस्थित करुन प्रेक्षकांना याचे उत्तर शोधण्यासाठी दुसरा भाग पाहणे त्यांनी भाग पाडले. बाहुबलीच्या या मार्केटिंगचे यश फार मोठे आहे. आपल्याकडे प्रेक्षक, प्रामुख्याने दक्षिणेतील प्रेक्षक हा सिनेमाच्या संदर्भात अतिशय संवेदनाक्षम आहेे. त्यातील यशस्वी झालेल्या हिरोला तो एवढा डोक्यावर चढवितो की, त्याला देव्हार्‍यातही बसवितो. रजनीकांतचे आज तसेच झाले आहे. चित्रपट हा त्याचा जीव की प्राण आहे. बाहुबलीने या प्रेक्षकांची संवेदनक्षमता व त्याची अपेक्षा बरोबर ओळखून या चित्रपटात मसाला भरला आहे. समुद्रातून जाणारे जहाज हे अचानक विमान बनते व हवेतून उडू लागते हे दक्षिणी चित्रपटात शोभणारे दृश्य आहे, मात्र आता जगातील भारतीयांनी हे स्वीकारले आहे. ज्या बाबी सर्वसामान्य माणूस करु शकत नाही, त्या चित्रपटात दाखविणे व प्रेक्षकांना मनोरंजनाची एक पर्वणी उपलब्ध करुन देणे यात भारतीय चित्रपटांची हातोटी आहे. बाहुबलीच्या दिग्दर्शकाने या सर्व मसाल्याचा उत्तम मेळ घालून प्रेक्षकांना मनोरंजनाच्या एका उच्चाकांवर नेऊन ठेवील अशी कलाकृती केली आहे.
---------------------------------------------------

0 Response to "बाहुबलीच्या निमित्ताने..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel