-->
मुक्ताकाकूंची मुक्ताफळे

मुक्ताकाकूंची मुक्ताफळे

मंगळवार दि. 02 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मुक्ताकाकूंची मुक्ताफळे
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी चित्पावन ब्राम्हण संघाच्या कार्यक्रमात आरक्षणाच्या संदर्भात जी वक्तव्ये केली आहेत ते पाहता मुक्ताकाकूंची मानसिकता ही अजूनही मनु युगातलीच आहे असे म्हणता येईल. टिळक घराण्यातील व्यक्तींने अशा प्रकारची मुक्ताफळे उधळणे याचे आश्‍चर्य वाटते. लोकमान्य टिळक हे तेलातांबोळ्यांचे पुढारी म्हणून ओळखले जात. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी समाजातील तळागाळातील जनतेचा विचार केला व त्यांच्या उध्दाराचा विचार केला. मात्र आज त्यांचा वारसा सांगणार्‍या व पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून मिरविणार्‍या मुक्ताताई ब्राह्मणांनी आरक्षणामुळे विदेशात जाते पसंत केले असे वक्तव्य करुन आरक्षणांचा आपला विरोध स्पष्टपणे ब्राह्मणांच्या संघटनेच्या व्यसपीठावरुन व्यक्त केला. मुक्ताकाकूंनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, आज त्या प्रथम नागरिक झाल्या आहेत त्या देखील महिलांसाठी असलेल्या आरक्षणामुळेच. मात्र आपले आरक्षण लपवायचे आणि समाजातील तलागाळातील वर्ग असलेल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध करायचा अशी कुट निती त्या करीत आहेत. मुक्ताकाकूंना आपल्या मुक्ताफळातील चूक ध्यानी आली आणि त्यांनी लागलेच आपला विरोध नाही, व आपल्या पक्षाचाही आरक्षणाला विरोध नाही, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असे जाहीर केले. मात्र त्यांच्या मुक्ताफळांचा चुकीचा अर्थ म्हणजे नेमका काय ते काही त्यांनी सांगितले नाही. मुक्ताकाकू ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार होऊन आलेल्या आहेत त्यांचा आरक्षणाला जाहीर विरोध आहेच. त्यामुळे मुक्ताकाकूंच्या तोंडातून संघच आपली मते मांडत आहे, असाच त्याच अर्थ आहे. जर आरक्षणाला विरोध आहे तर याच ब्राह्मणांनी आम्हालाही आरक्षण द्यावे अशी मागणी अलिकडेच का केली होती, असाही प्रश्‍नच आहे. आजवर जे कोणी विदेशात गेले ते आरक्षणाला कंटाळून नव्हे तर स्वत:च्या उध्दारासाठी गेले आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्या भौतिक सुखासाठीच अनेकांनी आपला देश सोडला आहे. यात केवळ ब्राह्मणच नाहीत सर्वच जातीतील लोक आहेत. अगदी मागासवर्गीयतीलही मोठ्या संख्येने लोक विदेशात गेले आहेत. जो चांगला शिकतो व त्याच्या शिक्षणाच्या लायकीचा जॉब आपल्या देशात मिळत नाही तो विदेशात जातो, त्यात आरक्षणाचा काडीचाही संबंध नाही. केवळ ब्राह्मण गेले आहेत असेही नव्हे, हे लक्षात घ्यावे. 70च्या दशकात अनेक कष्ट करणारे लोक आपल्या देशातून आखातात गेले. ते कष्ट उपसण्यासाठी व तेथे त्यांच्या कष्टाला जादा मानधन मिळत असल्यामुळे गेले. परंतु आता त्यांच्या नोकर्‍याही धोक्यात आल्या आहेत. कारण आपल्याहून स्वस्त मजूर आखातात अन्य दशातून मिळू लागले. त्यामुळे कष्ट उपसण्यासाठी आखातात जाण्याचे दिवस आता संपले आहेत. मात्र अमेरिका व युरोपातील विकसीत जगात उच्च शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होण्याचा कल हा 91 सालानंतर झपाट्याने वाढला. आपल्याकडे आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यावर मध्यमवर्गीयांना अमेरिकेचे आकर्षण वाढले. आपल्याकडे असलेला भ्रष्टाचार, अस्वच्छता, अपारदर्शकता याचा अभाव असल्यामुळे विकसीत देशात शिक्षणासाठी गेलेला तरुण तेथेच स्थायिक होतो. तो काही आरक्षणासाठी गेलेला नाही. तो आता महत्वाकांक्षी झालेला आहे, त्याला आपल्या देशातील भवितव्य उज्वल दिसत नसल्यामुळे, त्याच्या शिक्षणाचा योग्य वापर होत नसल्याने तो तेथेच स्थायिक होतो. इकडच्या आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, अमेरिकेतही कृष्णवर्णीयांसाठी आरक्षण आहे, जर्मनीत प्रथम जर्मन तरुणांना रोजगार दिला जातो व त्यानंतर अन्य देशातील तरुणांचा रोजगारासाठी विचार केला जातो. त्यामुळे विकसीत देशात आरक्षणच नाही, ही गोड समजूत आहे. बरे विदेशात शिकून पुन्हा भारतात परतणारे भारतीय नाही आहेत का? अगदी सॅम पित्रोडा पासून ते विक्रम लिमयेंपर्यंत अशी अनेक उदाहरणे देता येतील. तेथील अनेक उच्च पदावर असताना त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची चांगली उदाहरणे तरुण पिढींपुढे ठेवण्याऐवजी, आरक्षणामुळे ब्राह्मण विदेशात जातात असे सांगून समाजात विषवल्ली पेरण्याचे राजकारण पुण्याच्या महापौरांनी करु नये. राज्याचे मुख्यमंत्री ब्राम्हणच, पुण्याचे पालकमंत्रीही ब्राम्हणच, पुण्याच्या महापौरही ब्राह्मणच, देशातील व राज्यातील अनेक मंत्री ब्राम्हणच आहेत, मग हे का देश सोडुन गेले नाहीत? हे कसं झालं,जरा सांगाल का? मुक्ताताई हे सगळं आरक्षणामुळेच झालं, आरक्षणामुळे देश सोडुन जावं लागत नाही, तर उलट देशाच्या सत्तेत बसता येते. आता यावरून हेच सिध्द होत आहे देशात विकासाच्या भुलथापा देऊन जनतेची काहीप्रमाणात मने जिंकली. विकासाच्या बोललेल्या अंजेड्यापासुन दुर जात इथे तर चक्क जातीची बीजे लावण्याचे काम भाजप सरकार करतांना दिसत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहीतांना तळागाळातील शेवटचा,व्यक्ती समान पातळीवर यावा त्यालाही माणुस म्हणून जगता यावे, या उदात्त हेतुने मानवतेच्या दृष्टीकोनातुन प्रत्येक गोष्ट कसोटीला लावुन तपासुन पाहिली, संविधान लिहीतांना त्यांनी जात नव्हे तर व्यक्ती व व्यक्तीचा विकास नजरे समोर ठेवला, शोषित, पिडीत, वंचित घटक नजरेसमोर ठेवला, देशाचे हित नजरेसमोर ठेवले. आरक्षणामुळे या वंचित समाजातील काही लोक तरी आज वरच्या थराला आला आहे. शिक्षणासाठी दरवाजे त्यांना खुले झाले. त्यातून नोकर्‍या मिळाल्या. यातून आयुष्य स्थिरावले. अशा प्रकारे वंचित समाजाला आपल्या घटनेने न्याय मिळवून दिला आहे. हा घटनेचा सन्मान आहे. हीच राज्यघटना आता भाजपाला नकोशी झाली आहे. त्यामुळेच आरक्षणाला विरोध सुरु झाला आहे. मुक्ताकाकूंची ही मुक्तफळे याचाच भाग आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "मुक्ताकाकूंची मुक्ताफळे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel