-->
ऑपरेशन क्लीन-भाग दुसरा

ऑपरेशन क्लीन-भाग दुसरा

सोमवार दि. 17 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
ऑपरेशन क्लीन-भाग दुसरा
नोटाबंदीने नेमका सरकारच्या तिजोरीत किती पैसा जमा झाला याचे गणित अजून कोणीही मांडायला तयार नाही. मात्र आता आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत. या सर्वांची आयकर विभाग कसून चौकशी करणार आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर बाजारात आलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने ऑपरेशन क्लीन मनी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात नोटाबंदीदरम्यान संशयितरित्या आर्थिक व्यवहार करणार्‍या 18 लाख लोकांना नोटीस पाठवली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यापासून म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत केलेल्या कारवाईत 9 हजार 934 कोटींची अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. एकूण 60 हजार लोकांची ओळख पटली असून यामध्ये 1300 हाय रिस्क लोकांचा समावेश आहे. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणार्‍यांवर नजर ठेवण्यात आली होती. महागडी संपत्ती खरेदी करण्याची सहा हजार प्रकरणे उजेडात आली आहेत. तर परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची तसेच परदेशात पैसे पाठवण्याच्या 6600 प्रकरणांचा अत्यंत बारीकीने तपास केला जात आहे. जर त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही तर सर्वांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. आयकर विभागाने याचवर्षी 31 जानेवारी रोजी ऑपरेशन क्लीन मनी लाँच केलं होतं. याअंतर्गत 17.92 लाख लोकांना ऑनलाइन नोटीस पाठण्यात आली होती. यामध्ये फक्त 9.46 लाख लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं दिली होती. आता दुसर्‍या टप्प्यात किती लोक सापडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यात जर पार काही सापडले नाही तर सरकारचा नोटाबंदीचा निर्णय अगदीच फ्लॉप गेला होता असे म्हटले पाहिजे.
-----------------------------------------------------------

0 Response to "ऑपरेशन क्लीन-भाग दुसरा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel