-->
भिवंडीकरांना गाजर

भिवंडीकरांना गाजर

मंगळवार दि. 11 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
भिवंडीकरांना गाजर
भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्याचे नियोजित असल्याचे गाजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीकरांना दिले आहे. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रोचा अभ्यास दिल्ली मेट्रो कॉपोर्रेशनमार्फत सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माणकोलीनाका येथील उड्डाणपुलांच्या चार मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते, त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अर्धवट बांधकाम झालेल्या पुलांचे सोपास्कर उरकल्याचीही जोरदार चर्चा शहरात होती. मुंबईच्या कुशीत असलेले भिवंडी हे शहर झपाट्याने गेल्या दोन दशकात विकसीत झाले खरे मात्र भिवंडी हे नियोजनापासून अलिप्तच राहिले. केवळ तेथे लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. लोकसंख्या वाढल्याने तेथील गावांचे रुपांतर शहरात झाले, महानगरपालिका अस्तित्वात आली. परंतु नियोजनाचया नावाने हे शेहर शून्यच राहिले. भिवंडीच्या विकासाचा आराखडा पूर्वीच्या सरकारने आखला होता. मात्र तो कागदावरच राहिला. आता भाजपाचा दावा आहे की, आम्ही सत्तेवर आल्यानंतर भिवंडीच्या विकासाला जोरदार गती दिली आणि काही महिन्यातच बदल दिसू लागला. या ठिकाणी 985 कोटींचे विविध विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता या भागातील 60 गावांमध्ये देशातील एक उत्तम लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी, इतर आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. संपूर्ण देशाच्या लॉजिस्टिकचे भिवंडी हे मुख्य केंद्र बनेल, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून गावठाणांचा आदर्श विकास करणे, ग्रामस्थांना उत्तम मोबदला देऊन त्यासाठीची जमीन घेणे या गोष्टी तातडीने सुरू करण्याचे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांना दिले. यासाठी कुठल्याही प्रकारे निधी कामू पडू दिला जाणार नाही, असेही आश्‍वासन देण्यास ते विसरले नाहीत. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी आम्ही मेट्रोला प्राधान्य ग्यावे लागणार आहे. भिवंडी हे एक मोठे औद्योगिक केंद्र म्हणून विकसीत झालेले आहे. तेथे सुरुवातीपासून हातमाग व यंत्रमाग होते. यातील हातमाग आता संपुष्टात आले असले तरी यंत्रमाग मोठ्या संख्येने आहेत. एकेकाळी दंगलीमुळे गाजलेले भिवंडी हे आता एक प्रमुख लहान व मध्यम उद्योगांचे एक आघाडीचे केंद्र झाले आहे. यातून जसा स्थानिकांना रोजगार मिळाला आहे त्यापेक्षा बाहेरच्या राज्यातील लोकांनाही तेथे मोठा रोजगार मिळाला आहे. हिंदु-मुस्लिम एैक्याचे आता हे शहर एक प्रतिक ठरले आहे. मुंबईपासून लागून असल्यामुळे येते गेल्या दशकात लॉजिस्टिकचे मोठे केंद्र विकसीत झाले. सुरुवातीला कर वाचविण्यासाठी हा उद्योग येथेे स्थापन झाला आणि आता हा उद्योग तेथे असलेल्या मुबलक जागांमुळे झपाट्याने वाढला. गेल्या दोन दशकात अनेक मोठी शहरे विकसीत झाली त्यात भिवंडीचा क्रमांक आघाडीवर लागतो. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हे शहर बकाल झाले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपा पुन्हा एकदा लोकांना आशेचे एक गाजर दाखवित आहे. मात्र या आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे निधी कुठे आहे, त्याचा उल्लेख मात्र सरकार करीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही आश्‍वासने पोकळच राहाणार आहेत.

0 Response to "भिवंडीकरांना गाजर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel