-->
टेलिकॉम: ग्राहक हाच राजा!

टेलिकॉम: ग्राहक हाच राजा!

रविवार दि. 26 मार्च 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
टेलिकॉम: ग्राहक हाच राजा!
आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून आता तीन दशके लोटली आहेत. या काळात आपल्याकडील आर्थिक क्षेत्रात प्रामुख्याने कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक महत्वाच्या घडामोडी झाल्या. या बदलातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे टेलिकॉम उद्योग. एकेकाळी घरातील टेलिफोन कनेक्शन मिळण्यासाठी तब्बल पाच ते दहा वर्षाचा कालावधी लागत असे. आता हा काळ संपुष्टात आला व जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत. घरातील टेलिफोन कनेक्शन ही संकल्पना अजून अस्तित्वात असली तरी काळाच्या ओघात संपुष्टात यांच्या मार्गावर आहे. आर्थक उदारीकरणानंतर पहिल्यांचा उदारीकरणाच्या अजेंडावर आला त्यात टेलिकॉम उद्योग अग्रभागी होता. आता त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम पाहत आहोत. नुकतेच बहुराष्ट्रीय कंपनी व्होडाफोन व बिर्ला समूहाची कंपनी आयडीया यांनी या दोन कंपन्या विलीन करण्याची घोषणा केली. या निर्णामुळे पुन्हा एकदा टेलिकॉम उद्योग पार ढवळून निघाला आहे. रिलायन्सने जिओ ही आपली सेवा बाजारात आणली व गेली सहा महिने ही सेवा मोफत पुरविली, त्याचवेळी टेलिकॉम उद्योगात आता पुन्हा एकदा हलचल निर्माण होणार हे स्पष्ट झाले होते. भारतात सध्या भारती एंटरप्राईजेसची भारती एअरटेल ही सर्वाधिक ग्राहकसंख्येसह क्रमांक एकवर आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर व्होडाफोन आहे. त्या पाठोपाठ आयडिया सेल्युलरचा क्रम लागतो. या दोन मोठया कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे प्रथम एकच्या भारती एअरटेलचे स्थान मागे पडले असून समभागांच्या रूपात झालेले हे विलिनीकरण 23.2 अब्ज डॉलरचे असल्याचे मानले जाते. व्होडाफोनच्या एकत्रिकरणामुळे आयडिया सेल्युलर ही ग्राहकसंख्या तसेच महसुली उत्पन्नाबाबत देशातील अव्वल कंपनी म्हणून पुढे आली आहे. एकत्रिकरणानंतर 39.51 कोटी ग्राहक आयडियाचे असतील. बाजारहिस्सा 35.06 टक्के होणार आहे. हे प्रमाण सध्याच्या भारती एअरटेलच्या तुलनेत अधिक होईल. विलिनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांवरील कर्जभार एकूण 1.07 लाख कोटी रुपयांचा असेल. व्होडाफोन इंडिया सध्या सरकारच्या कर तगाद्याचा सामना करत आहे. पुढील दोन वर्षांत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार असून तूर्त नव्या व्यवसायाचे अध्यक्षपद बिर्ला यांच्याकडेच राहणार आहे. नव्या कंपनीत व्होडाफोनचा सुरुवातीला 45.1 टक्के तर आयडियाचा 26 टक्के हिस्सा असेल. तूर्त दोन्ही कंपन्या स्वतंत्र म्हणून कार्यरत राहतील. मात्र काळाच्या ओघात या कंपन्यांचे विलीनीकरण करावे लागणार आहे. अनिल अंबांनी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्स व एअरसेलच्या विलिनीकरणाला मंजुरी नुकतीच मिळाली आहे. अनिल धीरुभाई अंबानी समुहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सने सप्टेंबर 2016 मध्ये एअरसेल खरेदी करण्याचे ठरविलले होते. या दोहोंची एकत्रित मालमत्ता आता 65,000 कोटी रुपयांची होणार आहे. यामुळे देशात तिसरी मोठी दूरसंचार कंपनी म्हणून याचे अस्तित्व असेल. व्होडाफोन-आयडीया या कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे नव्याने बाजारात आलेल्या जिओच्या अनेक आशा आकांक्षांना खीळ बसणार आहे. कारण ेक नवा तगडा स्पर्धक त्यांना या नवीन कंपनीच्या रुपाने लाभला आहे. रिलायन्सकडे या उद्योगात स्थिरावण्यासाठी मोठा राखीव निधी असला तरीही आता तयंना एका जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, हे नक्की. टेलिकॉम उद्योगात 2005 साली एकूण 12 कंपन्या कार्यरत होत्या व त्यावेळी ग्राहकांची संख्या नऊ कोटी एवढी होती. तर आता केवळ सातच कंपन्या या उद्योगात शिल्लक राहिल्या असून ग्राहकांची एकूण संख्या आता 115 कोटींवर पोहोचली आहे. सुरुवातीच्या काळात कार्यरत असलेल्या मोबाईल कंपन्यांपैकी एकही कंपनी आता अस्तित्वात नाह. एक तर विलीन तरी झाल्या आहेत किंवा त्यांना कुणीतरी ताब्यात घेतले आहे. आता कंपन्यांचे ग्राहक वाढले व कंपन्यांची संख्या कमी होत गेली अशी स्थीती आहे. मात्र अजूनही कुणा एका कंपनीची मक्तेदारी असल्याचे चित्र नाही. प्रत्येक कंपनीला एका जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहक हाच राजा ठरला आहे. आज ग्राहकाला विविध कंपन्यांनी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिल्याने त्याच्या गरजेनुसार तो कोणत्या कंपनीचा ग्राहक व्हायचे ते ठरवू शकतो. सरकारी मक्तेदारीपासून टेलिकॉम कंपन्यांचा आपल्याकडे सुरु झालेला हा प्रवास आता खासगीकरणानंतर अशा प्रकारे झाला आहे. जर आपण खासगी कंपन्यांना या क्षेत्रात प्रवेश दिला नसता तर एवढा मोबाईलचा प्रचार व प्रसार झाला नसता हे वास्तव विसरता कामा नये. धीरुभाई अंबांनीनी ज्यावेळी मोबाईल क्षेत्रात पाऊल टाकले त्यावेळी करलो दुनिया मुठ्ठीमे चा नारा दिला होता. त्याकाळी रिलायन्सच्या आक्रमक प्रचारामुळे मोबाईलचे दर मोठ्या प्रमाणात घसरण्यास सुरुवात झाली. खरेतर त्यानंतरच सर्वसामान्यांच्या हातात मोबाईल दिसू लागले. रिलायन्स समूहाची ही कंपनी काळाच्या ओघात अनिल अंबांनींकडे गेली आणि बाजारात फार काही मोठा व्यवसाय करु शकली नाही. परंतु त्यांनी मोबाईलच्या बाजारपेठेत हलचल माजविली होती. आता देखील मुकेश अंबांनी यांच्या कंपनीने जिओच्या रुपाने प्रवेश केल्यावर टेलिकॉम बाजारपेठेचे रुपडे पालटण्यास सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या सध्याच्या वातावरणात टिकायचे असेल तर ग्राहकांना चांगली सेवा दिली पाहिजे व माफक दरातही ती दिली गेली पाहिजे, हे सध्याच्या बाजारभिमूख अर्थव्यवस्थेने दाखवून दिले आहे. खरे तर व्होडाफोन ही बहुराष्ट्रीय कंपनी. या कंपनीने संपूर्ण युरोपसह शंभरहून जास्त देशात आपले पाय पसरले आहेत. परंतु अशा या महाकाय कंपनीला देखील भारतात स्पर्धा करणे अवघड जाईल असे वाटू लागले. यातून आपल्या बाजारपेठेतील स्पर्धेची कल्पना येते. भांडवलशाहीतील स्पर्धेचा असा फायदा देखील होतो हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या ग्राहक हा राजा आहे हेच खरे!
------------------------------------------------------------

0 Response to "टेलिकॉम: ग्राहक हाच राजा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel