-->
यंदा पाऊस समाधानकारक?

यंदा पाऊस समाधानकारक?

बुधवार दि. 29 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
यंदा पाऊस समाधानकारक?
आपल्याकडे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वेध लागतात ते हवामानाविषयक अंदाजाचे. पहिला अंदाज एप्रिल महिना सुरु होण्याच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केला जातो. जस जसा मान्सून जवळ येतो तसा या अंदाजात आणखी स्पष्टता येते. यंदाच्या पहिला अंदाज तरी समाधानकारक असल्याने शेतकरी वर्गात दिलासा मिळाला आहे. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, आपल्याकडील शेती पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळयाच्या एक दोन महिने आधी जाहीर होणार्‍या पावसाच्या अंदाजावर सर्वसामान्यांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष लागलेले असते. पावसावर पीकपाणी अवलंबून असल्याने तसेच त्यानंतर चांगला पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या हातात पैसा खुळखुळल्याने ग्राहोपयोगी कंपन्यांना चांगले दिवस येता. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्कायमेट या हवामानविषयक संस्थेने यंदाच्या पावसाचे अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार, स्कायमेटने वर्तवलेला पहिला अंदाज शेतकरी आणि राज्यकर्त्यांना दिलासा देणारा आहे. यंदा सामान्यपेक्षा मान्सूनचे प्रमाण कमी राहणार असले तरी, 95 टक्क्यांपर्यंत मान्सूनचा पाऊस होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे.
मागच्यावर्षी पेक्षा पावसाचे हे प्रमाण कमी आहे. मात्र त्यामुळे दुष्काळ पडण्याचा धोका नाही. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात संपूर्ण देशात 887 मिमी पाऊस कोसळेल असा त्यांचा अंदाज आहे. 2014 मध्ये केंद्रात सत्तांतर झाले तेव्हापासून नेहमीच पावसाने नरेंद्र मोदी सरकारची चिंता वाढवली आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना नरेंद्र मोदींना पहिल्यावर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागला होता. 2014 मध्ये  पाचवर्षातील नीचांकी पावसाची नोंद झाली होती. देशात सर्वसाधारणपणे 12 टक्के पावसाची तूट राहिली होती. त्यानंतर 2015 मध्ये पुन्हा मान्सूनच्या पावसाने दगा दिला. अल निनोच्या घटकाच्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावर्षी 86 टक्के पाऊस झाला होता. मागच्यावर्षी 2016 मध्ये 97 टक्के समाधानकारक पाऊस झाला. कमी पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच बसत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही किंमत मोजावी लागते. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडो असा सर्वांचीच प्रार्थना आहे. खरे तर गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे कधी नव्हे ती राज्यातील अनेक धरणे तुडुंब भरली होती. त्याचा शेतकर्‍यांना तसेच शहरातील लोकांनाही पुरेसा पाणी मिळण्यास उपयोग झाला. आता यंदा देखील पाऊस कमी असला तरीही तीन वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळासारखी स्थीती नसेल यातच समाधान मानले पाहिजे.

0 Response to "यंदा पाऊस समाधानकारक?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel