-->
हतबल कॉग्रेस

हतबल कॉग्रेस

सोमवार दि. 24 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
हतबल कॉग्रेस
लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत तीनपैकी दोन महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये भाजपने मारलेली मुसंडी धक्कादायक म्हटली पाहिजेे. चंद्रपुरातही भाजपाची लाट असून कमळ फुलले आहे. परभणीत मात्र काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. तिन्ही महापालिकेत मतदारांनी शिवसेनेला स्पष्ट नाकारले आहे. लातूर महापालिका निवडणुकीत परंपरागत असलेली काँग्रेसची देशमुखी गढी भाजपने उद्धवस्त केली. संपूर्ण राज्याचे आणि देशभरातील काँग्रेसचे लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. महापालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला 31 जागीच यश मिळवता आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे 2012 मधील निवडणुकीत भाजपला एकही जागा नव्हती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, एक हाती सत्ता काबिज केली आहे. लातूर हा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा गड मानला जात होता. गेल्या महापालिकेत शुन्य जागा असलेल्या भाजपने संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली 41 जागा मिळवल्या. विलासराव देशमुखांच्या पश्‍चात त्यांचे चिरंजीव अमित देशमुखांना लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम ठेवता आली नाही. त्यामुळे आता नगरपालिका, जिल्हा परिषद आणि आता लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. अमित देशमुखांचा लोकांशी फटकून वागण्याचा स्वभाव, संपर्क न ठेवणे या बाबी काँग्रेसच्या मुळावर उठल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीत हादरा बसल्यानंतर पालिका ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले पण मतदारांनी त्यांना साफ नाकारल्याचे निकालाने स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावर काँग्रेस नेतृत्वाने पाळलेले मौन तसेच कार्यकर्त्यांशी तुटत गेलेला संपर्क, उपलब्धतेचा अभाव, नवाबी थाटाची वर्तणूक, आणि लोकांना गृहित धरण्याचा आत्मविश्‍वास हे कॉग्रेसच्या पराभवाची मुख्य कारणे आहेत. तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक सत्तेत काहीच अस्तित्व नसतानाही देशात आणि राज्यात सुरू असलेली वाटचाल, पाण्यासारखी गंभीर समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपात भाजपला दिलेले लोकांत मिसळणारे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले विकासाचे आश्‍वासन यामुळे लातूर महापालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातही भाजपने कमळ फुलवले. भाजपने 66 जागांपैकी तब्बल 36 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली आहे. काँग्रेसला केवळ 12 जागांवरच समाधान मानावे लागले. चंद्रपूर हे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर यांचे घरचे मैदान असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. चंद्रपूर महापालिकाही कॉग्रेसच्याच ताब्यात होती. काँग्रेसचे वजनदार नेते असलेले नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील पालिका जिंकण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गटा-तटामुळे काँग्रेसला बहुतांश ठिकाणी दगाफटका होतो. हा धोका ओळखून या वेळी काँग्रेसने पुगलिया आणि वडेट्टीवर यांच्यातील अंतर्गत वाद शमवला होता. तेव्हा चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मुनगंटीवार यांनी एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिध्द केले. या मतदार संघात सुरू असलेला विकासकामांचा धडाक्याची जाहीरातबाजी आणि भविष्यातील विकासाचे नियोजन पाहून जनतेने भाजपच्या पारड्यात सत्ता टाकली आहे. कॉग्रेसच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे, परभणीकरांनी काँग्रेसला हात दिला. परभणीतील शहरी मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. परभणी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. लोकसभा, विधानसभा आपल्या वर्चस्वाखाली ठेवणार्‍या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत कधीच यश आले नाही. या ठिकाणी एकही आमदार नसताना काँग्रेसने राष्ट्रवादीच्या हातून सत्ता खेचून आणली आहे. शिवसेनेने आपला 7 नगरसेवकांचा आकडा कायम राखला आहे. तर या सगळ्या लाटेत भाजपच्या जागा वाढल्या आहेत. या तीनही महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना अत्यल्प जागांवर समाधान मानावे लागले आहे. स्थानिक पक्षांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे हे निकाल आहेत. परभणीमध्ये काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी तर चंद्रपूर, लातुरात काँग्रेस विरुध्द भाजप अशी थेट लढत झाली. आजपर्यंत कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची तळागाळात संघटना होती. त्यातुलनेत भाजपा अगदीच कमी होता. मात्र असे असतानाही शहरी मतदारांना भूलविण्यात भाजपा यशस्वी झाला आहे. केंद्रातील 2014 सालापासून कॉग्रेसच्या मागे जी पराभवाची मालिका लागली आहे, त्याला काही अपवाद वगळता ही मालिका काही खंडीत झालेली नाही. मात्र अजूनही कॉग्रसचे नेते पराभवाच्या छायेतून काही बाहेर आलेले दिसत नाहीत. अनेक भागात कॉग्रेसचा मतदारांशी संपर्क तुटला आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व हतबल झाल्यासारखे झाले आहे. त्याउलट सत्तेचा जेवढा मिळेल तेवढा फायदा घेत सत्ता काबीज करण्याचे भाजपाचे धोरण पूर्णपणे यशस्वी होत आहे. राज्यात सत्ता असली की स्थानिक स्वराज्य पातळीवर सत्ता काबीज करणे सोपे जाते हे सत्य असले तरीही कॉग्रेसची हतबलता भाजपाला विजयी करण्यास हातभार लावत आहे, हेच या निकालांवरुन आपल्याला म्हणता येईल.
---------------------------------------------------------

0 Response to "हतबल कॉग्रेस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel