-->
रायगडाचे संवर्धन

रायगडाचे संवर्धन

संपादकीय पान गुरुवार दि. 02 मार्च 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
रायगडाचे संवर्धन
केवळ रायगडवासियांचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या रायगड किल्ल्याच्या डागडुजी व सौंदर्यीकरणासाठी राज्या सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलून त्यासाठी तब्बल 600 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखविल्याबद्दल सरकारचे स्वागत झाले पाहिजे. कोणत्याही ऐतिहासिक वास्तुंची डागडुजी करणे हा केंद्राच्या पुरातत्व विभागाचा प्रश्‍न असल्याने व त्यांच्याकडे यासाठी निधी नसल्याने अनेक किल्ले व ऐतिहासिक वास्तू या मोडकळीस आल्या आहेत. अनेकदा तेथे जाणारे पर्यटक तेथेच घाण टाकतात व पर्यायाने या ऐतिहासिक वास्तुुंंकडे पूर्णपणे दुलर्क्ष होत असते. त्यामुळे या ऐतिहासिकत वास्तूंना कोणीच वाली नसल्याचे दिसते. आपण केवळ शिवाजी महाराजांचे गोडवे गातो, त्यांच्या शौर्यकथा मोठ्या अभिमानाने सांगतो, त्यातून तरुण पिढी घडावी अशी अपेक्षा ठेवतो, मात्र जेथे महाराजांची राजधानी होती त्या रायगडाची अवस्था पाहिल्यास कोणाचीही मान शरमेने खाली जाईल असेच चित्र आपल्याला दिसते. मात्र आता राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतला आहे. पुरातत्व विभागानेही ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना अनेक जाचक अटी घालून ठेवलेल्या आहेत. त्याचा परिणाम असा होतो की तेथे ना राज्य सरकार वा कोणतीही सामाजिक संस्था जाऊन तेथील दूरावस्था संपवू शकते. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत एखादी बाब आली की, ते ही धड काही करीत नाहीत व अन्य कुणालाही काही तेथे करु देत नाहीत अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. एक तर या खात्याचा खाक्या हा सरकारी लाल फितीत अडकलेला असतो व त्यातून खरोखरीच काही चांगले व्हावे अशी त्यांचीही काही इच्छा नसावी. कारण जर या खात्याकडे पुरेसा निधी नसेल तर त्यांनी आपण लक्ष ठेवून ज्यांच्याकडे निधी आहे त्यांच्याकडून तरी काम करवून घेण्याची गरज असते. मात्र असे काही घडताना दिसत नाही. राज्यात 336 गड-किल्ले आहेत व त्यातील 40 पेक्षा जास्त गड-किल्ले हे केंद्रा सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतात. यातील 18 किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. आता सरकारने रायगडाच्या संवर्धनाचे व पुर्नबांधणीचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार, किल्ल्यावरील चित्ता दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्दा बुर्ज, महादरवाजा, यांचे संवर्धन व जीर्णोध्दार करणे ही कामे हाती घेतली जाणार आहे. तसेच शिवप्रेमी व पर्यटकांना रायगडावर पोहोचण्यासाठी चांगला रस्ता करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व इतर सोयी सवलती पुरविणे ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. गड व किल्ल्यांची जपणूक कशाप्रकारे केली जाते याची पहाणी खरे तर युरोपातील धर्तीवर केली पाहिजे. तेथील लोकांनी किल्ल्यांचे केलेले संवर्धन व तेथील इतिहास विविध रुपांनी जागता केला आहे. आपण फक्त लाईट शो करतो, मात्र तेथे तर पुतळे उभे करुन तेथे पूर्वीच्या काळात राजे कसे राहात होते हे दाखविले जाते. यातून पर्यटकांना पूबर्वीच्या काळात घेऊन नेले जाते. या किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर तेथील इतिहासही जिवंत ठेवला जातो. अर्थात अशा प्रकारचे संवर्धन आपल्याकडे केले व त्यासाठी प्रवेश फी आकारली तर पर्यटक व शिवप्रेमी आनंदाने देतील. अर्थात आजवर केवळ गप्पा व्हायच्या आता सरकारने ठोस पावले रायगडाच्या संवर्धनासाठी काही ठोस पावले उचलली आहेत, त्याचे स्वागत व्हावे. तसेच हा प्रकल्प पूर्णत्वास जावा अशी अपेक्षा व्यक्त करु या.

0 Response to "रायगडाचे संवर्धन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel