-->
रोमहर्षक विजय!

रोमहर्षक विजय!

मंगळवार दि. 16 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
रोमहर्षक विजय!
इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने वन डे विश्‍वचषकावर आपले नाव कोरुन नवा इतिहास घडवला. खरोखरीच हा इतिहास आहे कारण ज्या देशाने क्रिकेटला जन्म दिला त्या देशाला विश्‍वचषकावर मोहोर उमटवायला चक्क चार दशके वाट पहावी लागली. अखेर गोर्‍या साहेबाच्या इंग्लंडला विश्‍वविजयाचा मान अखेर मिळालाच. गेली दीड महिने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या जागतिक क्रिकेट युध्दाची सुरुवात इंग्लने विजयाने केली व अखेरही त्यांच्या विजयानेच झाली. एक अनोखा योगायोगच म्हणावा लागेल. लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामना एवढा चुरशीचा झाला की, सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत विलक्षण उत्कंठावर्धक ठरला. शेवटच्या षटकात सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक निर्णायक प्रसंग आले. सुपर ओव्हरच्या आधी झालेल्या अखेरच्या षटकात 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना स्टोक्सने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याला धावबाद करण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूने चेंडू फेकला. त्यावेळी धावबाद होऊ नये यासाठी स्टोक्सने स्वतःला खेळपट्टीवर झोकून दिले. त्याचवेळी चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागला आणि चेंडूची दिशा बदलली व चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. यानंतर धावून काढलेल्या 2 धावा आणि अतिरिक्त चार धावा अशाप्रकारे 6 धावा स्टोक्सला ऐनवेळी मिळाल्या. याच प्रसंगानंतर सामना न्यूझीलंडच्या हातून निसटला. यानंतर सामना टाय झाला. सामना टाय झाल्याने वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या. गंमतीचा भाग म्हणजे प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सुपर ओव्हरमध्ये 15 धावा केल्या आणि सुपर ओव्हर देखील टाय झाली. मात्र या थरारक लढतीत आयसीसीच्या नियमांनुसार अखेर इंग्लंडला सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आले. या विजयाबाबत शंका उपस्थित करीत नेटकर्‍यांकडून तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंकडून आयसीसीच्या नियमाविरोधात संताप व्यक्त केला गेला आहे. अनेकांनी अखेरपर्यंत झुंजणारा न्यूझीलंड संघच आमच्यसाठी खरा विजेता असल्याचे मत व्यक्त केले. तुमच्या हातात विश्‍वचषक नसला तरी तुम्हीच खरे विजेते आहात आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांचा फटका तुम्हाला बसलाय अशाप्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतिरिक्त 4 धावा देण्याचा नियम अतिशय चुकीचा असून त्याचाच फटका न्यूझीलंडच्या संघाला बसला असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेता शोधण्याच्या नियमावरही अनेकांनी आक्षेप घेतला आणि अजून एक सुपर ओव्हर का खेळवू नये असा सवाल उपस्थित केला आहे. विरोधात अनेक निर्णय जाऊन देखील त्याचा विरोध न करता पराभव स्वीकारणार्‍या न्यूझीलंडच्या संघाचे आणि कर्णधार केन विल्यम्सनच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक जगातील क्रिकेटप्रेमींकडून होत आहे. त्याचबरोबर आयसीसीने नियमांमध्ये बदल करावेत अशी मागणीही जोर धरत आहे. नियम बदलण्याविषयी किंवा इंग्लडला विजयी घोषीत करण्याच्या निर्णयासंबंधी चर्चेचे गुर्‍हाळ अजून काही दिवस सुरु राहिलच. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांच्याच आधारे इंग्लंड विजयी झालेला असल्याने तोच खरा विश्‍वचषक विजेता आहे हे वास्तव मान्य करावे लागेल. विश्‍वचषक स्पर्धेत 578 धावा करत आपल्या नेतृत्वाच्या जोरावर संघाला अंतिम सामन्यामध्ये नेणार्‍या केनला हा पुरस्कार सचिन तेंडुलकरच्या हस्ते देण्यात आला. अंतिम सामन्यातील खेळीने केन हा विश्‍वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकत त्याने सर्वाधिक धावा करणार्‍या कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 2007 साली श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनने 548 धावा केल्या होत्या. अतिशय रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात नशिबाने साथ न दिल्याने पराभव पदरी पडल्यानंतर केनच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य कॅमेरामध्ये टिपले गेले. केनच्या याच कृतीवर नेटकरी फिदा झाले असून अनेकांनी ट्विटवरुन केनच्या या खिळाडूवृत्तीला दाद दिली आहे. तुमच्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची चर्चा अधिक आहे, या वक्तव्यानुसार इंग्लंडच्या विजयानंतरही ट्विटवर केन विल्यमसनच्याच नावाची सर्वाधिक चर्चा होती. न्यूझीलंडकडून कर्णधार विलियम्सनने 30 धावा काढून शानदार खेळी करुन विक्रमाला गवसणी घातली. आता तो विश्‍वचषकात सर्वाधिक धावा काढणारा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. यंदाच्या विश्‍वचषकात यजमान इंग्लंडच्या ज्यो रुटचे आपल्या घरच्या मैदानावरील क्षेत्ररक्षण अधिक लक्षवेधी ठरले. त्याने फायनलमध्ये जेम्स निशामचा झेल घेतला आणि त्याच्या नावे विश्‍वचषकात सर्वाधिक 13 झेलची नोंद झाली. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 11 झेल घेतले होते. क्रिकेट विश्‍वचषकात भारताची कामगिरी चांगली झाली असली तरीही उपान्त फेरीच्या पलिकडे भारत काही पुढे जाऊ शकला नाही. यावेळी मात्र अंतिम सामना हा सर्वांच्याच लक्षात राहाणार ठरला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंड हरला असला तरी त्यांच्या पराभवात एक शान होती. पराभवातही त्यांच्या खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन झाले. दमदार खेळ आणि खिलाडू वृत्ती याचा अनोखा संगम या स्पर्धेत पहायला मिळाला.
----------------------------------------------------------- 

0 Response to "रोमहर्षक विजय!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel