-->
संसदेत वीज कडाडली

संसदेत वीज कडाडली

मंगळवार दि. 02 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
संसदेत वीज कडाडली
लोकसभेतील सर्व नवीन सदस्यांचा परिचय आता सर्वांना होऊ लागला आहे. त्यातील अनेक सदस्य हे नवीन आहेत तर काही जुने जाणकार. नवीन सदस्यांच्या संदर्भात अनेकांना उत्सुकता आहे. हे सदस्य बोलतात केस विषयांची मांडणी कशी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन लोकसभेत या सर्व सदस्यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते एकमेव सदस्याने. पंचवीस जूनला लोकसभेत जी वीज कडाडली तिचे नाव आहे महुआ मोईत्रा. बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या 44 वर्षीय महुआचे शालेय शिक्षण कोलकातामध्ये झाले तर गणित व अर्थशास्त्रातली पदवी अमेरिकेत घेतली. तिथेच जेपी मॉर्गन या बहुराष्ट्रीय कंपनीत बँकर असलेली महुआ नोकरी सोडून 2008ला भारतात आली. राहुल गांधींच्या आम आदमी का सिपाही या अभियानात ती युथ काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून बंगालमध्ये चमकली. कॉँग्रेसमध्ये ती फार काळ काही रमली नाही. बंगालमधील कॉँग्रेसच्या बजबजपुरीने ती कंटाळली. मात्र तिने राजकारम सन्यास काही घेतला नाही. 2010 साली ती ममता दीदींकडे आकर्षित झाली. 2016 मध्ये करीमपूर विधानसभेची तृणमूलची उमेदवारी घेऊन निवडूनही आली. आपला बँकिंग क्षेत्रामधील अनुभव, ज्ञान व पत वापरून तिने करीमपूरसाठी तब्बल 150 कोटींची गुंतवणूक आणली. तिने आपल्या ज्ञानाचा वापर करुन आपल्या मतदारसंघासाठी आणलेली मदत पाहून बंगालमध्ये तिचे फार कौतुक झाले. ममता दिदीने तिच्यातील गूण हेरुन तिला देशपातळीवर लाँंच करण्याचे ठरविले. तृणमूल काँग्रेसची महासचिव आणि प्रवक्तेपद सांभाळणार्‍या महुआ मोईत्राला 2019 च्या निवडणुकीत कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्याची संधी देण्यात आली. भाजपच्या कल्याण चौबेंचा 63 हजार मतांनी पराभव करून ही वीज लोकसभेत पोहचली. तिने आपल्या प्रवेशाच्या पहिल्याच भाषणात सर्व सदस्यांना गारेगार करुन सोडले. आपल्या पहिल्याच व अवघ्या दहा मिनिटाच्या भाषणात तिने सभागृहात सरकारवर जो घणाघाती हल्ला केला. तिच्या या भाषणाला वृत्तपत्रातून फारशी प्रसिद्दी मिळाली नाही. मात्र ते भाषण आता सर्वत्र व्हायरल झाले आहे. अमेरिकेतील एका संग्रहालयात फॅसिझम येण्यापूर्वीच्या स्थितीची सात लक्षणे सांगणारे पोस्टर आहे. त्यातील एकेका लक्षणांचे आजच्या भारतात कसे प्रत्यंतर येत आहे, ते त्वेषाने मांडणारे महुआचे हे भाषण गाजले नसते तरच नवल. महुआचे मांडलेले सात मुद्दे पुढीलप्रमाणे होते. माणसा माणसांत फूट पाडून तुम्ही नागरिकांनाच देशप्रेम सिद्ध करायला लावता हे चुकीचे आहे. प्रत्येक स्तरावर मानवाधिकाराचे उल्लंघन सरकारच करत आहे. देशात धर्मांधांच्या झुंडी निष्पापांचे बळी घेत आहेत. प्रसार माध्यमांवर तुम्ही दडपण आणता व माध्यमे फेक न्यूजचा मारा करून देशात संभ्रम निर्माण करायला वापरता. तुमच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातील 120अधिकारी तर केवळ सरकारविरोधी बातम्यांवर नजर ठेवण्यासाठीच आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा बागुलबुवा उभा करून आपल्याच देशातील लोकांत तुम्ही शत्रू शोधता. मागच्या पाच वर्षात जवानांच्या शहीद होण्याचे प्रमाण 106 टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यांच्या शौर्याचे श्रेय एकच माणूस लाटतो आहे. परकीय नागरिक शोध विधेयकातून तुम्ही केवळ एका (हिंदू)धर्माच्या नागरिकांनाच या देशात राहण्याचा हक्क आहे, असे सुचवित आहात. विचारवंत व कलावंतांचे स्वातंत्र्य तुम्हाला मान्य नाही. संविधानाला वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार करणे अपेक्षित असताना तुम्ही शालेय पुस्तकातून मुलांना मध्ययुगात ढकलता आहात. निवडणूक आयोगाची स्वायत्तता तुम्ही नष्ट केली आहे. तुम्ही विकासाच्या मुद्दावर नाही, फेकन्यूज पसरवून निवडणूक जिंकली आहे. तुम्ही सत्तेत आहात ते भाडेकरू म्हणून. हे तुमच्या मालकीचे घर थोडेच आहे? इथल्या मातीत सर्वांचे रक्त मिसळलेले आहे. हा हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर थोडीच आहे ....? या अर्थाची शायर जनाब राहत इंदौरी यांची रचना सत्ताधारी पक्षाला ऐकवूनच ही सौदामिनी थांबली. महुआ मोईत्रा यांचे भाषण हे सत्ताधार्‍यांच्या मनात धडकी भरणारे जसे होते तसे मरगळलेल्या विरोधकांनाही जीवदान देणारे होते. महुआ यांची वैचारिक बैठक पक्की आहे, आपली विचारधारा किती प्रभावीपणाने आपण मांडावयाची त्याचा त्यांचा गृहपाठ ठोस आहे. त्याचबरोबर त्यांची भाषण करण्याची कला प्रभावी आहे. त्यांच्या या भाषणाने आता विरोधकांना एक जोरदार आवाज संसदेत सापडला आहे. सध्या सत्ताधारी ज्या आक्रमकतेने संसदेत बोलतात आपले म्हणणे मांडतात त्याला प्रभावीपणाने उत्तर देणारा एकही नेता लोकसभेत नाही. आता ही जागा महुआ भरुन काढतील असे दिसते.
---------------------------------------------------------------

0 Response to "संसदेत वीज कडाडली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel