-->
मुंबईची दैना कोणामुळे?

मुंबईची दैना कोणामुळे?

गुरुवार दि. 04 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
मुंबईची दैना कोणामुळे?
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत कोसळलेल्या पावसामुळे 48 तासात 46 बळी गेले आहेत. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पिण्याची पाण्याची चिंता करणार्‍या मुंबईकरांना घामांच्या धारांनी नव्हे तर पावसामुळे ओलेचिंब व्हावे लागले. केवळ मुंबईतीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात आता टोकाचे हवामान झाले आहे. कोसळला तर मरणाचा पाऊस नाहीतर मरणाचा उकाडा. तसे पाहता मुंबईत धो-धो पाऊस पडून लोकल बंद पाडणारी एकदा किंवा दोनदा पाळी दर पावसाळ्यात येत. परंतु यावेळी पावसाचा कहर झाला. दोन दिवसात 700 मि.मि. एवढा विक्रमी पाऊस पडल्याने मुंबईकरांना 26 जुलै 2006 सालची पुन्हा एकदा आठवण आली. त्यावेळी तर मुंबई पूर्णपणे जलमय झाली होती. त्या घटनेला आता तेरा वर्षे झाली आहेत. परंतु त्यातून मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने व गेले पंचवीस वर्षाहून जास्त काळ सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेने कोणताही बोध घेतलेला नाही, हेच कालच्या पावसानंतर झालेल्या अपघातांच्या मालिकांनंतर व मनुष्यहानीनंतर दिसते. पालिकेतील सत्ताधारी व राज्य सरकार या दोघांनीही झालेल्या प्रकाराच्या चौकशीचे भूत मानगुटीवर बसवून तसेच मृतांच्या नातेवाईकांना दोन-पाच लाखाची मदत देऊन आपली जबाबदारी झटकली आहे. म्हणजे मुंबईत राहाणार्‍याच्या आयुष्याची किंमत ही सरकारने पाच लाख रुपये केली आहे असाच त्याचा अर्थ काढावा लागतो. विक्रमी पाऊस झाल्याने सर्वच यंत्रणा हतबल झाली असे सांगत त्याचे निर्लज्जपणाने समर्थन करण्यात शिवसेना नेते मशगुल झाले आहेत. मुंबईच्या महापौरांनी तर सर्व जीवनमान व्यवस्थीत सुरु आहे असे सांगून कळसच गाठला. महापौरांचे हे विधान म्हणजे मुंबईकारांच्या हालाखीच्या जीवनाच्या जखमेवर मीठ चोळल्याचाच प्रकार आहे. खरे तर प्रशासनाची व सत्ताधार्‍यांची खरी कसोटी ही अशाच आपत्तीच्या काळात लागते. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आखून सज्ज करावे लागते व केवळ आपत्ती व्यवस्थापनच नव्हे तर एकूणच शहराचे नियोजन व्यवस्थित करावे लागते. मुंबईवर पाऊस कोसळणार हे 24 तास अगोदर समजले असतानाही पालिकेचे प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन काय झोपले होते काय? असा सवाल उपस्थित होतो. ओरिसात नुकत्याच आलेल्या चक्रिवादळात तब्बल दहा लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते, त्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचा मुंबईने बोध घेण्याची वेळ आली आहे. आज मुंबईवर हे संकट आले ते केवळ अचानक कोसळलेल्या पावसामुळे जसे आलेे त्यापेक्षाही ते मुंबईकडे दुर्लक्ष करणार्‍या सत्ताधार्‍यांमुळेही आले आहे. मुंबईवर आलेले हे संकट म्हणजे आस्मानी नव्हे तर सुलतानीच आहे असे म्हणावे लागेल. याला केवळ सध्या महानगरपालिकेत सत्तास्थानी जबाबदार असलेली शिवसेना जशी जबाबदार जशी आहे तसेच राज्यात सत्तेत असलेला भाजपा व यापूर्वी सत्तेत असली कॉँग्रेस-राष्ट्रवादी तेवढीच जबाबदार आहे. कारण गेल्या तीन-चार दशकाहून जास्त काळ मुंबईकडे दुर्लक्ष झाल्यानेच आजची स्थिती ओढावली आहे. आजवर सत्ताधार्‍यांनी मुंबईकडे केवळ दुभती गाय म्हणून पाहिले. मुंबईतून सर्वाधिक महसूल केंद्राला व राज्यालाही मिळतो, मात्र यातील किती पैसा मुंबईच्या नियोजनबद्द विकासात खर्च केला याचे उत्तर शोधावे लागेल. कॉँग्रेसने मुंबईकडे तर पूर्णपणेच दुर्लक्ष केले होते. आज मुंबईवर केवळ बिल्डरांचे राज्य आहे असे म्हणता येईल. अनेक ठिकाणी याच बिल्डरांनी नद्या बुजवून किंवा त्यांचा प्रवाह अडवून भर घालून उंच इमारती उभारल्या आहेत. मिठी नदीचा प्रवाह हा आकूंचन पवलेला आहे व ही प्रक्रिया गेल्या दोन दशकात झालेली आहे. त्याचबरोबर मुंबईची सात बेटे बुजवून तिचा विकास करण्यात आला, एकप्रकारे हा निसर्गावर अत्याचार केल्याने समुद्राचे पाणी आज शहरात घुसते आहे. नरिमन पाँईंटचा विकास करताना 70च्या दशकात समुद्राला वेसण घालण्यात आली. तेथे टॉवर उभे राहिले खरे परंतु आज समुद्र पुन्हा त्यांचा आत खेचू पाहात आहे. मुंबईचे नियोजन करताना कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. बिल्डरांना जसे सोयिस्कर वाटत गेले तसे ते त्यांच्या फायद्यासाठी मुंबईत आक्रमण करीत गेल्यानेच मुबंईवर ही आफत आली आहे. दररोज सुमारे 85 लाख लोक प्रवास करतात त्या मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या गेलेल्या लोकलचे ट्रँक तसेच राहिले. मात्र लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली. युतीच्या काळात नितीन गडकरी सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबईत 56 पूल उभारले, ते स्वागतार्हच होते. परंतु त्याच्या कितीतरी पटीने मोटारींची संख्या वाढली. आज मेट्रोचे जाळे उभारण्याची राज्य सरकारला घाई लागली आहे. मात्र त्यासाठी अख्या मुंबईभर रस्ते खणून ठेवले आहेत. त्यासाठी त्यांनी तेच काम जर टप्प्याटप्प्याने केले असते तर सध्या मुंबईत होणारी वाहानांची गर्दी टाळता आली असती. एकूणच काय मुंबईसारख्या दीड कोटी लोकसंख्या असलेल्या एवढ्या महाकाय शहराचे नियोजन कुणीच न केल्याने आज ही दैना झाली आहे. 
------------------------------------------------------------------

0 Response to "मुंबईची दैना कोणामुळे?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel