-->
एक टप्पा पार...

एक टप्पा पार...

शुक्रवार दि. 19 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
एक टप्पा पार...
भारताचे सेवानिवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याने भारताचा हा एक मोठा विजय झाला आहे. या निकालामुळे कुलभूषण यांच्या मानेभोवती आवळला गेलेला फास आता सैल झाला असला तरी त्यांना सोडवून परत मायदेशी आणणे हे दुसरे मोठे आव्हान देशापुढे असेल. या निकालामुळे पहिला टप्पा भारताने यशस्वीरित्या पार केला असे म्हणता येईल.गेले दोन वर्षे दोन महिने चाललेल्या या आन्तरराष्ट्रीय खटल्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. एकूण 42 पानी निकालपत्रात जाधव यांच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करावा, अशी सूचना देखील आन्तराराष्ट्रीय न्यायालयाने केली आहे. कोर्टाने जाधव यांना वाचवण्यासाठी भारताच्या बहुतेक मागण्या फेटाळल्या. जाधव यांची मुक्तता करून त्यांना भारतात परत पाठवणे, त्याविरोधातील पाकिस्तानी लष्करी न्यायालयाचा निर्णय रद्द करणे यासारख्या मागण्या न्यायालयाने मान्य केल्या नाहीत. आन्तरराष्ट्रीय न्यायलयाचे अध्यक्ष ए.ए. युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील 16 न्यायमूर्तींच्या पीठाने 15 विरुध्द एकच्या बहुमताने हा निकाल दिला. भारताच्या विरोधात निकाल देणारा हा एक देश कोणता असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या प्रकरणी पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानने भारताला माहिती देण्यास तीन आठवडे उशीर केला. व्हिएन्ना कराराच्या कलम 36 परिच्छेद 1 (बी) नुसार भारताला आपल्या नागरिकाशी संपर्क करण्याचा अधिकार आहे. जाधव यांच्याबाबत भारताला काउन्सलर अ‍ॅक्सेस देण्याचा आदेशही अखेर आन्तराराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच पाकिस्तानची जाधव यांच्या प्रकरणी भूमिका संशयास्पद होती, असे म्हणण्यास वाव होता. जाधव हे भारताचे हेर असून ते त्याच उद्देशाने पाकिस्तानात आले होते असा पाकचा आरोप त्यांना अटक करताना होता. मात्र यासंबंधीचे ठोस पुरावे पाककडे नाहीत. त्यामुळे आन्तरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे लढविली गेली. भारताच्या बाजूने कुलभूषण जाधव यांची बाजू भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल हरिष साळवे यांनी मांडली होती. आन्तरराष्ट्रीय न्यायलयात भारताच्या वतीने बाजू लढविली जाण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना होती. साळवे यांनी त्यासाठी नाममात्र एक रुपयावर हे काम केल्याने त्यांचे देशात कौतुक होत आहे. मात्र दुसरीकडे पाकिस्तानची बाजू लढविणारे वकिल खावर कुरेशी यांनी हा खटला लढविण्यासाठी 20 कोटी रुपये फी आकारली होती. एवढी फी आकारुनही पाकच्या वाट्याला निराशच आली. कुरेशी यांनी केंब्रीज विद्यापिठामधून वकिलीचे शिक्षण घेतले असून ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात एखाद्या देशाची बाजू मांडणारे सर्वात तरुण वकील ठरले आहेत. या निमित्ताने भारताचे जागतिक पातळीवर मित्र नेमके कोण हे स्पष्टपणे दिसले आहे. चीन यासंबंधी कोणती भूमिका घेणार असा अनेकांना प्रश्‍न पडलेला होता. मात्र चीनने कुलभूषण जाधव प्रकरणात चीनच्या न्यायाधीशांनीही भारताच्या बाजूने मत दिले. चीनचे न्यायाधीश हनकीन यांनीही बहुमताच्या बाजूने म्हणजेच पाकिस्तानविरोधात कौल दिला. एक मत पाकिस्तानच्या बाजूने पडले. हे मत देखील न्यायवृंदातील पाकिस्तानच्या सदस्यानेच केले असावे असे बोलले गेले आहे. अर्थात पाकिस्ताननेच स्वतःच्या बाजूने मत दिले. विशेष म्हणजे चीनने पाकिस्तानविरोधात मत दिल्याने पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पाकिस्तानी माध्यामांमध्येही यावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हा भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. या निकालानंतर कुलभूषण जाधव प्रकरणात कायद्याप्रमाणे पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असे पाकिस्तानने स्पष्ट केले. पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा जबाबदार सदस्य आहे. पाकिस्तानने या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यापासूनच आपली कटिबद्धता जोपासली आहे, असे पाकिस्तानने म्हणणे स्वागतार्ह आहे. या निकालानंतर भारतातही मोठा जल्लोष झाला.य मात्र या विजयाने हुरळून जाता कामानये हे लक्षात घेतले पाहिजे. या निकाल म्हणजे आपल्या यशस्वी घोडदौडेतील हे पहिले पाऊल आहे. कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील प्रदीर्घ लढाई अजून शिल्लक आहे. ही पहिली लढाई जिंकल्याबद्दल देशाने हरिष सावळे यांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांनी आपले आजवरचे वकिली कौशल्य पणाला लावले होते. त्यांच्या आजवरच्या अनुभवाचा त्यांनी देशाला मोठा फायदा करुन दिला आहे. आता पुढील लढाई भारताला लढावी लागणार आहे. कारण हेरगिरी प्रकरणात अटक झालेली असल्याने जाधव हे हेर नाहीत हे सिद्द करण्याची जबाबदारी आता भारतावर येऊन पडली आहे. आज जाधव यांच्या भोवती असलेला फास सैल झाला असला तरीही त्यांना मायदेशी परत आणणे हे मोठे आव्हान भारताला पेलायचे आहे. या निकालामुळे मात्र पाकिस्तान आता बॅकफुटवर गेला आहे. त्यामुळे आनंद साजरा करताना भारताला अनेक सावध पावले उचलावी लागणार आहेत.
-------------------------------------------------------------

0 Response to "एक टप्पा पार..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel