-->
धुवाधार पाऊस आणि राजकीय घमासान

धुवाधार पाऊस आणि राजकीय घमासान

मंगळवार दि. 30 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
धुवाधार पाऊस आणि 
राजकीय घमासान
गेले तीन दिवस राज्यातील बहुतांशी भागात धुवाधार पाऊस पडला आहे. याला आपवाद विदर्भ व मराठवाड्यातील काही भागाचा आहे. मुंबई व परिसरातील भागात तसेच कोकणात मात्र पावसाने हाहाकार माजविला. जूनमध्ये उशीरा पाऊस सुरु झाल्याने सर्वांनाच चिंता वाटत होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने आपले जोरदार अस्तित्व दाखवून दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त उंची गाठली. एकूणच राज्यातील 60 टक्क्याहून जास्त भाग पावसामुळे सुखावला आहे. हवामानखात्याने मात्र सर्वानाच निराश केले आहे. आपण एकीकडे चंद्रावर पाऊल टाकत असताना हवामानखाते मात्र चुकीचे अंदाज देते याचे वैष्यम्य वाटते. रिववार व सोमवारी मुसळधार पाऊस पडेल असा त्यांनी व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरला आहे. असो. गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला आहे, हे मात्र खरेच त्याचबरोर अनेक भागात पावसामुळे पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हालही झाले आहेत. त्याला आपल्याकडील प्रशासन जबाबदार आहे. शनिवारी दिवसभरात माथेरानला तब्बल 450 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. थंड हवेचे हे ठिकाण आता पावसाच चिंब नहाले. विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाडा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्याने अनुभवला. त्यातही राज्यातील 42 ठिकाणी पावसाने 24 तासांत तीन आकडी संख्या गाठली, हेही वैशिष्ट्यपूर्ण ठरले. उल्हास नदीच्या पुरात चारी बाजूंनी वेढलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या एक हजाराहून अधिक लोकांची सुरक्षितपणे सुटका झाली असली तरीही हा सर्वसामान्य प्रवाशांच्या जिवाशी खेळलेला एक गंभीर खेळ होता. एकाच ठिकाणी सलग 12 तास पाण्याच्या वेढयात थांबलेल्या रेल्वेच्या रूळाला वाढत्या पाण्याने काही इजा झाली असती तर हजार प्रवाशांना घेऊन रेल्वे पाण्यात कोसळण्याचा धोका होता.या गाडीत असलेल्या गरोदर महिला, वृध्द व अन्य प्रवासी यांची स्थिती काय झाली असेल त्याचा विचारत करता येत नाही. रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेला रात्रभर अडकलेले लोक आठवले नाहीत. ही यंत्रणा पाऊस थांबून ओहोटीची वाट पाहत राहिली. म्हणजे आजपर्यंत मुंबईकर रामभरोसे होताच आता दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील प्रवासीही त्यांनी असुरक्षित केला. बदलापूरमध्ये कोसळणा़र्‍या पावसामुळे 10 ते 2 रेल्वे वाहतूक बंद ठेवली होती. उल्हास आणि तिची उपनदी बारवीच्या पात्रात प्रचंड पाणी होते. तीन दिवस मुसळधार पावसाने बारवी धरण तुडुंब भरल्याने पाणी सोडणे नक्की होते. पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला कल्पना दिली नाही ही मोठी चूक. वाढते पाणी पाहून भयभीत सात प्रवाशांनी रेल्वेतून उड्या घेतल्या आणि पुढे ते छाती एवढ्या पाण्यात अडकून पडले. ग्रामस्थांनी त्यांना वाचवले. ऐनवेळी लष्कर, नौदलाची मदत घेऊन एनडीआरएफला उतरवून या प्रवाशांना वाचविण्यात आले. सोमवारपासून आता मुंबई-पुणे ट्रक सुरु झाला आहे. पुण्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण पूर्ण भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. जुलैच्या अखेरीस पुन्हा धरण काठोकाठ भरल्याने मुठा नदीत शनिवारी रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चासकमान धरणातून भीमा नदीतसाडेपाच हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. भीमा खोर्‍यातील कळमोडी, आंद्रा आणि खडकवासला धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र पिंपळगाव जोगे, घोड, नाझरे आणि उजनी धरणांची स्थिती पावसाअभावी जैसे थे आहे. भीमा खोर्‍यातील पंचवीसपैकी वीस धरणांच्या क्षेत्रात पावसामुळे स्थिती सुधारली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांत गेल्या 48 तासांत संततधार पावसाच्या हजेरीने परिसर जलमय झाला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याने कोयना, धारणेसह अन्य धरणांतही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने दुसर्‍यांदा पात्र ओलांडले असून कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीही विविध ठिकाणी 30 फुटांवरून अधिक झाली आहे. महाराष्ट्राच्या वरदायिनी समजल्या जाणार्‍या कोयना धरणात 63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुंबईहून नाशिककडे जाणार्‍या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जुन्या कसारा घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्याला शनिवारी तडे गेले. कसारा घाटातील ही दुरुस्ती तीन दिवसांनंतर पूर्ण झाली. नाशिकमध्ये सलग तीन दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा तसेच भूजल पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. पहिने, त्रंबकेश्‍वर, भावली डॅम, हरिहर किल्ला, नांदूर मधमेश्‍वर, सोमेश्‍वर धबधबा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. दारणा, गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. मराठवाडा व विदर्भ वगळता आता बहुतांशी भागात सुजलाम सुफलाम वातावरण पसरले आहे. पावसामुळे राज्याला दिलासा मिळत असताना राजकीय गरमागरमी जोरात सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षाने धाकदपटशहा करुन आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना राज्यात आयाराम-गयारांचाही पाऊस सुरु झाला आहे.
------------------------------------------------------------------------

0 Response to "धुवाधार पाऊस आणि राजकीय घमासान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel