-->
भाजपाची कॉँग्रेस!

भाजपाची कॉँग्रेस!

शनिवार दि. 13 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
भाजपाची कॉँग्रेस!
गोव्यातील व कर्नाटकातील राजकीय घडामोडी पाहता भाजपाचे आता पूर्णपणे कॉँग्रेसीकरण झाले आहे यावर शिक्कामोर्तब करण्यास काहीच हरकत नाही. या दोन्ही राज्यात घोडेबाजार सध्या तेजीत आहे. गोवा राजय लहान असल्याने भाजपाला कॉँग्रेसच्या 15 पैकी 10 सदस्यांना आपल्याकडे वळविण्यात फार मोठे कष्ट घ्यावे लागले नाहीत. कर्नाटकात कॉँग्रेस सत्तेवर असल्याने तथे फोडाफोडी करणे भाजपाला कठीण जात आहे, परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी ज्या प्रकारे राज्य सरकार पाडून सत्ता कमविल्या आहेत ते पाहता कर्नाटकातही त्यांना सरकार पाडणे काही कठीण जाऊ नये. एकूणच पाहता कॉँग्रसने पूर्वी विरोधकांची सरकार पाडण्यात जे काही तंत्र अवलंबिले होते त्यापेक्षा दोन पावले पुढे जाऊन भाजपाने आपण कॉँग्रेसपेक्षा अशा कामात सरस आहोत हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता भाजपाची कॉँग्रेस झाल्याचे स्पष्ट दिसते. गेल्या पाच वर्षात पक्षनिष्ठा, सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणे, विचारांशी बांधिलकी नसणे आणि सहजरित्या होणारी पक्षांतरे हे सर्व पाहता आपल्या राजकारणाने आता भ्रष्टाचाराचे अच्युत्त्य टोक गाठले आहे. आपल्या भोवतीची ही दोन राज्ये ज्या प्रकारे एक एक नवीन राजकीय पायंडे पाडत आहेत ते पाहता त्याचे पडसाद हे महाराष्ट्रातही उमटणार आहेत. राज्यातील सरकार स्थिर असले तरीही पुढील काळात मंत्री होण्यासाटी भाजपाच्या गोटात जाण्याची स्पर्धा लागू शकते. त्याचे प्रत्येतर येत्या काही काळात निवडणुका जशा जवळ येऊ लागतील तसे दिसेल. गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारला टेकू देणा़र्‍यांना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसमधून तब्बल 10 आमदारांना भाजपमध्ये घेतले गेले आहेत. ज्यांना प्रवेश दिला जात आहे त्यांची एकंदरीत राजकीय पार्श्‍वभूमी वा एकंदरीत त्यातील काही जणांवर नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हेही पाहिले जात नाहीत. बरे जे आमदार काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले त्यांना पक्षांतर करण्याची गरजच होती का? प्रत्येक आमदाराला मंत्रीपद हवे. गोव्यात सत्तालोलूप आमदार मंत्रीपदासाठी वाट्टेल ते करतात असेच चित्र निर्माण झाले आहे. गोव्यात गेल्या अडीच वर्षात काँग्रेसची शकले होत गेली तो प्रकार लोकशाहीसाठी कलंक ठरावा. पक्षांतर बंदी कायद्याची चिरफाड जेवढी म्हणून करता येईल तेवढी गोव्यातील राजकीय नेत्यांनी आजवर केलेली आहे. पक्षांतर बंदी कायद्यात गेल्या 10 वर्षापूर्वी मोठी दुरूस्ती करून घाऊक पक्षांतराला संधी दिली. अर्थात पक्षांतर बंदी आहे परंतु पक्षाचे दुसर्‍या पक्षात विलिनीकरणावर बंदी नाही. गोव्यात जे काही झाले ते विलिनीकरण म्हणता येणार नाही. काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही तर ही फूट केवळ विधिमंडळ गटात पडलेली आहे. सर्व 10 ही आमदार भाजपमध्ये विलीन झालेले आहेत. तिकडे कर्नाटकात काँग्रेसचे 13 आणि जनता दलाचे 3 आमदार फुटले आणि त्यांनी आमदारकीचे राजीनामे दिलेले आहेत. या आमदारांनी जर स्वखुशीने राजीनामे दिले असते तर गोष्ट निराळी. यांच्या राजीनाम्यामागचे कारण नाराजी आहे. परंतु ही नाराजी दुसरी तिसरी कसलीच नसून केवळ सत्ता मिळावी यासाठी आहे. ज्या प्रकारे सध्या पक्षांतरे चालू आहेत व आपल्या लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत त्यावर काहीतरी उपाय करण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता कर्नाटक व गोव्यातील या घटनेनंतर झाली आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे जे कोणी राजीनामे देतील त्यांनी त्या त्या विधानसभेच्या पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत निवडणूक लढविण्यावर बंदी असावी. गोव्यात गेल्या अडीच वर्षात काँग्रेसमध्ये तिस़र्‍यांदा फूट पडली आहे. अलिकडे पडलेली फूट ही घाऊक पद्धतीची आहे. गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांना पूर्णत: 23 सदस्यांचे बहुमत असताना व सरकारला कोणताही धोका नसताना त्यांना आपले आघाडीचे सरकार धोकादायक आहे, असे का वाटावे? यामागे कोणती नेमकी कारणे दडलेली आहेत? असा प्रकारची पाटाफूट ही एकेकाळी पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणार्‍या पक्षाने करावी याहून लोकशाहीची थट्टा ती काय? सरकार पाडत असताना किंवा मजबूत करीत असताना कॉँग्रसे पक्ष म्हणजे विरोधी पक्ष कसा संपवायचा हे लक्ष्य भाजपाचे आहे. आज भाजपा जे फोडाफोडीचे राजकारण करीत आहे त्याचे सर्वच पातळ्यांवर कौतुक केले जात आहे. मात्र त्यामागे होत असलेली पैशाची देवाणघेवाण व निष्ठेला तिलाजली देण्याचे प्रकार चिंताजनक आहेत. पूर्वी कॉँग्रेसने फोडाफोडी केली होती, त्यांचेही चूकच होते व भाजपा आता जे करीत आहे ते देखील चूकच आहे. कारण यातून लोकशाहीची हत्या होत आहे. भविष्यातील राजकारण केवळ पैशाच्या आधारावर होणार आहे असेच चित्र आता दिसू लागले आहे. हा कल सर्वात धोकादायक आहे. लोकशाहीला मारक आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "भाजपाची कॉँग्रेस!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel