-->
वनस्थळीचा वटवृक्ष / दिल्लीचा विकास चेहरा

वनस्थळीचा वटवृक्ष / दिल्लीचा विकास चेहरा

सोमवार दि. 22 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
वनस्थळीचा वटवृक्ष
गेली 40 वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थी व महिलांसाठी सेवाभावाने काम करणार्‍या निर्मला पुरंदरे यांचे निधन झाल्याने वनस्थळी या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वटवृक्ष उन्मळून पडला आहे. त्यांचा आणखी एक परिचय सांगावयाचा म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या पत्नी होत. तसेच माणूसचे संपादक श्री. ग. माजगावर यांच्या त्या भगिनी होत्या. एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या सहवासात असूनही त्यांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण केली हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यांनी तरुणपणापासून माणूसमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्यातल्या संपादक जागृत झाला. माणूसमधील लेखांना त्यांचे संपादकीय संस्कार लागलेले स्पष्ट दिसत. माणूसच्या वाढीत त्यांचा मोलाचा वाटा होता. माणूस सोडल्यावर त्यांनी पूर्णपणे सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांच्या माध्यमातून राज्यात सुमारे 250 बालवाड्या स्थापन झाल्या. सुमारे अकरा हजारहून जास्त बालवाडी शिक्षकांना त्यांच्या संस्थेने घडविले. बालवाडीतील शिक्षकांसाठी त्यांनी खार कोर्स सुरु केला. याचा महिलांना मोठा उपयोग झाला व यातून अनेक बालवाडी शिक्षिका आपल्या पायावर उभ्या राहिल्या.महिलांच्या प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांच्या उध्दारासाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. बालवाडीचे काम करताना त्यांना ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्‍नाची जाणीव झाली व पुढचा टप्पा म्हणून त्यांनी महिलांच्या प्रश्‍नावर काम सुरु केले. महिलांच्या प्रश्‍नांवर काम करताना त्यांना ग्रामीण भागातून शहरात जाणार्‍या तरुण विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव झाली. या तरुणांना मोठ्या शहरात निवासाची मोठी अडचण असते हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यासंदर्भात काम करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी निराधार बालकांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. वनस्थळी ग्रामीण विकास संस्था स्थापन करुन त्यांनी महिला, तरुणांच्या विविध प्रश्‍नांची सोडवणूक एकाच छञाखाली सुरु केली. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे तसेच तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रशिक्षण शिबीरे मोठ्या प्रमाणात केली. याचा हजारो लोकांना मोठा उपयोग झाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना देशपातळीवरील अनेक सन्मानाने गौरविण्यात आले. फ्रान्सशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यातून त्या प्रदीर्घ काळ भारत-फ्रान्स मैञी संघाच्या अध्यक्ष होत्या. अशा प्रकारे विविध सामाजिक क्षेञात काम करुन निर्मलाताईंनी आपला ठसा उमटविला. त्यांच्या जाण्याने महाराष्टातील एक सामाजिक कार्य करणारे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
दिल्लीचा विकास चेहरा
दिल्लीसारख्या राजधानीचा कायापालट करणार्‍या व सलग तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंञीपद भूषविण्याचा विक्रम करणार्‍या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन झाल्याने एका खणखणीत नेतृत्वाला देशाने गमावले आहे. गांधी कुटुंबाशी निकटवर्ती असलेल्या दीक्षित यांचा जन्म पंजाबमधील. परंतु त्यांची कर्मभूमी दिल्लीच राहिली. त्यांचे पती हे प्रशासकीय अधिकारी होते. तर सासरे उमाशंकर दीक्षित हे इंदिरा गांधींच्या मंञीमंडळात मंञी होते. शीलाजींना इंदिरा गांधींनीच राजकारणात आणले. 84 साली त्या उत्तरप्रदेशातील कन्नोज मतदारसंघातून प्रथम निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले. दिल्लीच्या उभारणीतील विकास चेहरा अशी त्यांची ओळख निर्माण झाली. दिल्लीवर त्यांचे निस्सीम प्रेमही होते. दिल्लीतील अनेक पायाभूत प्रकल्पाची उभारणी त्यांच्याच काळात झाली. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी वाहने सुरु करणे, मेटो रेल्वेची बांधणी तसेच 87 फ्लायओव्हरची उभारणी त्यांच्याच काळात झाली. त्यांनी केलेल्या कामाची जनतेनेही नोंद घेऊन त्यांना तीन वेळा मुख्यंमञीपदी बसविले. माञ चौथ्यावेळी म्हणजे 2014 साली त्यांचा अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा पराभव केला. शहरी मतदाराला नेहमी गृहीत धरुन चालत नाही, हे त्यांच्या पराभवाने जाणवले. मतदारांचा बदललेला कौल त्यांच्याही लक्षात आला नाही व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर त्यांनी केजरीवाल यांच्याबद्दल मनात कायमची अढी ठेवली. त्यातून केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षा बरोबर काँग्रेसने जागा वाटप करण्यास कायमचाच विरोध राहिला. त्यात गेल्या वेळी काँग्रेस पक्षाचे नुकसानही झाले. त्यांच्या मुख्यमंञीपदाच्या काळात एक उत्कृष्ट प्रशासक असा देखील त्यांचा नावलौकिक होता. 2014 साली त्यांची गांधी घराण्याची असलेली जवळीक पाहता त्यांना केरळचे राज्यपाल करण्यात आले. माञ केद्रात मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी  राज्यपालपदाचा राजीनामा दिला. 2017 सालच्या उत्तरप्रदेशातील निवडणुकीत त्यांना मुख्यमंञीपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने जाहीर केले होते. त्यांच्या ब्राह्मण चेहर्‍याचा उपयोग होईल हा काँग्रेसचा होरा फेल ठरला. माञ निवडणुकीअगोदरच त्यांचे नाव मागे घेण्यात आले. त्यांच्या जाण्याचे सध्या काँग्रेसच्या कठीण काळात पक्षाला एक मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. काँग्रेसने एक ब्राह्मण चेहरा गमावला. तसेच देशाने एक कुशल प्रशासक व दिल्लीचा विकास चेहरा गमावला आहे.
-----------------------------------

0 Response to "वनस्थळीचा वटवृक्ष / दिल्लीचा विकास चेहरा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel