-->
नवे राज कीय वळण?

नवे राज कीय वळण?

गुरुवार दि. 11 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
नवे राज कीय वळण?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात आता काही नवे घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतपत्रिकेवर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. अर्थात ही मागणी मान्य होणार नाही हे सर्वांनाच माहित आहे. सोनिया गांधी यांच्याशी देखील याच मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले तरीही याशिवाय निश्‍चितच राजकीय मुद्यावर चर्चा झाली असणार यात काही शंका नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी महाराष्टात आपले उमेदवार उभे न करता मोदींच्या विरोधात सभा घेतल्या होत्या. त्यांच्या आक्रमक शैलीतील भाषणांचा जनतेवर फार प्रभाव पडल्याचे जाणवत होते. मात्र तशी अपेक्षित मते काही पडली नाहीत. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणूक विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. राज ठाकरे यांना आपले अस्तित्व टिकवायचेही आहे व कॉग्रेसलाही सत्ताधार्‍यांच्या विरोधात मोट बांधावयाची आहे. आजपर्यंत राज सोबत जाण्यास कॉँग्रेसमधील बहुतेकांचा विरोधच होता. आता बहुदा हळूहळू काळाची गरज म्हणून विरोध मावळत जाईल असे दिसते. राज यांचे परप्रांतीयांविरोधातील धोरण पाहता काँग्रेससाठी कालपरवापर्यंत राज अडचणीचे ठरत होते. मात्र आता बदललेल्या राजकारणात कॉँग्रेसला राज यांना स्वीकारावे लागणार आहे असेच दिसते. यावेळी कॉँग्रेसला शून्यापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे मनसेला सामावून घेण्याचे धाडस दाखवू शकतात. असे खरोखरीच झाल्यास कॉँग्रेसचे ते एक राजकीय शहाणपण म्हणावे लागेल. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. राष्ट्रवादी, शेकाप यांच्यासह अनेक लहान पक्षांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. त्याव्दारे विरोधी मतांची विभागणी टाळता येईल. सध्याच्या स्थितीत कॉँग्रेससाठी मनसेला सोबत घेणे फायदेशीर ठरु शकते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी लाख, दीड लाख मते घेतली होती. तर विधानसभा निवडणुकीत 13 जागांपर्यंत मुसंडी मारत दमदार एन्ट्री केली होती. तसेच नाशिकसारख्या महानगपालिकेवरही व खेड या नगरपरिषदेवर मनसेने झेंडा फडकवला. परंतु हे यश मनसेला राखता आले नाही. मनसेचे इंजिन रुळावरुन घसरलेे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांची जी घसरण होत गेली ती त्यांना सावरताच आलेली नाही. सध्याच्या या पडत्या काळात सावरायचे असेल, तर कुणाची ना कुणाची साथ घेण्यावाचून मनसेला पर्याय नाही. शिवसेना-भाजपा एकत्र असल्यामुळे राज ठाकरे त्यांचाया सोबत जाऊ सकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सोबत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज यांचे अलीकडे सूर जुळल्यासारखे दिसत होते. राज यांनी पुण्यात पवार यांची घेतलेली मुलाखत, हा त्यासाठीचा टर्निंग पॉईंट होता. सोनिया व राज यांच्यातील तीस-पस्तीस मिनिटांतील चर्चाही पुढे याच वळणाने जाईल असे दिसते. राज्यीतल युतीला टक्कर देण्यासाठी आघाडीला सर्व विरोधकांना एकत्र करावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या समदु:खी पक्षांना एकत्र यावेच लागेल. शिवसेनेने राज यांच्या भूमिकेची खिल्ली उडविली, असली तरी एकेकाळी सेनेनेही काँग्रेसला पाठिंबा दिला होता, हा इतिहास विसरता येणार नाही. सेनेचा उल्लेख वसंतसेना, असा केला जायचा. आज त्याच मार्गाने मनसे जात असेल, तर त्यात नवीन काहीच नाही. विरोधकांचे गणित बिघडविणाऱया वंचित बहुजन विकास आघाडीचा स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याकडे कल आहे. वंचितमधील लक्ष्मण माने फुटले आहेत. त्यांच्या सोबत आता आणखी काही नेते वंचितमधून बाहेर पडतील असा अंदाज आहे. लोकसभेत वंचितने आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहेच. वंचितचे हे आव्हान सौम्य करावयाचे असेल तर सत्ताधार्‍यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणावे लागणार आहे. यासाठी कॉँग्रेसला पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यतेपोटी का होईना राज कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जातील असे दिसते. मनसेचा मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या शहरातील प्रभाव नाकारता येत नाही. शिवाय राज यांच्या माध्यमातून स्टार प्रचारकही आघाडीला उपलब्ध होऊ शकतो. राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरुपी मित्र वा शत्रू नसतो, असे म्हणतात. सगळया आघाडया, युत्या या फायद्यासाठीच असतात. विचारसरणी वगैरे हा मुद्दा दुय्यम ठरतो. निदान आजचे राजकारण तरी त्याच वळणाचे आहे. मनसेची भूमिका आघाडीतील सर्वच घचटक पक्षांना शंभर टक्के मान्य होणारी नसली तरीही भाजपा-शिवसेनेला सत्तेतून हुसकाविण्यासाठी तरी सर्वांना एकत्र यावे लागणार आहे. मनसेने एकेकाळी नरेंद्र मोदींचे कौतुक केलेही होती. परंतु ती चूक त्यांना आल्पावधीत उमगली व राज यांनी तेवढ्याच आक्रमकतेने मोदी म्हणजेत भाजपा विरोधी भूमिका घेतली. त्यांच्यातील हा बदल स्वागतार्ह म्हटला पाहिजे. मनसेमुळे तरी आघाडीला एक उत्तम वक्ता मिळेल तसेच सत्तेपर्यंत पोहोचण्याची ते स्वप्ने पाहू शकतात.
----------------------------------------------------------------

0 Response to "नवे राज कीय वळण?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel