-->
दलितांचा हुंकार

दलितांचा हुंकार

बुधवार दि. 17 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
दलितांचा हुंकार
आंबेडकरी चळवळीतील महत्वाचेे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने विक्रोळीतील घरी निधन झाल्याने दलितांचा हुंकार निमला आहे. ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्‍व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. गेले एक दशक ते राजकारणापासून अलिप्त होते. गेल्याच वर्षी त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा झाला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्याशी असलेले वैचारिक मतभेद बाजूला सारुन उपस्थित होते. हा त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम शेवटचा ठरला. दलित पँथर्सच्या फुटीनंतर गुरू शिष्यामध्ये म्हणजे ढाले व आठवले यांच्यात निर्माण झालेला दुरावा 46 वर्षांनंतर पुन्हा दूर होण्यास मदत झाली होती. हे नेते त्यावेळी एकाच व्यासपीठावर जरुर आले परंतु त्यांची वैचारिक जवळीक काही होऊ शकत नव्हती. 1972 मध्ये दलित अत्याचाराविरोधात दलित पँथर्स या जहाल संघटनेची स्थापना करण्यात आली. पँथरच्या स्थापनेत नामदेव ढसाळ आणि राजा ढाले ही दोन नावे सर्वात आघाडीवर होती. पुढे डावे आणि बौद्ध वाद उफाळला आणि ऐनवेळी पँथर्स बरखास्त करण्यात आली. राजा ढाले यांनीच रामदास आठवले यांना आपल्यासोबत ठेऊन त्यांना राजकीय डावपेच शिकविले. पँथर्समध्ये राजा ढाले यांच्याच सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राज्यातील कार्यकर्त्यांचा मोठा जनसंपर्क आठवले यांच्या बाजूने गेला. पँथर्स बरखास्तीनंतर राजा ढाले यांनी मास मुव्हमेंट सुरू केली. आठवले यांनी अखिल भारतीय दलित पँथर्सची स्थापना केली. त्यानंतर आठवले आणि ढालेंमध्ये मोठे मतभेद निर्माण झाले. आठवलेंनी चळवळ सोडून सत्ता मिळविण्यासाठी ज्या राजकीय कोलांड्याउड्या घेतल्या त्याचा ढाले यांना नेहमीच तिटकारा होता. त्यामुळे या गुरु-शिष्यात दरी निर्माण झाली होती. दहा वर्षांपूर्वी दादर लोकसभा मतदारसंघात त्यांना नेहमी पडणारी एक लाख मतांऐवजी 10 हजार मते पडली आणि त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. मात्र त्यानंतर त्यांनी राजकारणापसून दूरच राहणे पसंत केले ते शेवटपर्यंत. त्यांचे अनेक सहकारी आठवलेंसोबत गेले मात्र त्याची त्यांनी पर्वा केली नाही. आपला मूळ विचार त्यांनी काही सोडला नाही. दलित चळवळ ज्या प्रकारे आपल्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटत गेली त्यावर त्यांनी नेहमीच प्रहार केला. कर्मकांड आणि पौरोहित्य संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा दिली. मात्र, बाबासाहेबांचे तेच अनुयायी स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची मागणी करून बौद्ध भिक्खूची पुरोहितशाही निर्माण करण्याचा खटाटोप करत आहेत, अशा सडेतोड शब्दांत ढाले यांनी अनेकदा टीका केली. डॉ. आंबेडकरांनी दुसरा विवाह स्वत: कोर्टामध्ये जाऊन केला. त्यांनी बौद्धांची लग्ने भिक्खूकडूनच लावली पाहिजेत, असे कुठेही म्हटलेले नाही. हे लक्षात न घेता काही रिपब्लिकन नेते हिंदू, शीख, मुस्लिमांप्रमाणे बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायद्याची करत असलेली मागणी हास्यास्पद आहे, असे त्यांचे मत ते ठणकावून आपल्या समाजापुढे मांडत असत. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अ‍ॅट्रॉसिटीचे खटले लढवण्यासाठी राज्यातील मागासवर्गीय वकिलांच्या फोरमची स्थापना त्यांनी केली होती. केवळ जामीन मिळवून देणारे वकील आम्हाला नको असल्याचे त्यांचे मत होते. आरक्षण हवेच, जातीचे रकाने काढा म्हणायला अभ्यास लागत नाही, असा टोलाही ढाले नेहमी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना लगावत असत. मागासवर्गीयांना अजूनही राजकीय आरक्षणाची गरज आहे. बहुजनवादाचा काल्पनिक हत्ती निर्माण करून त्यामध्ये सर्व जातींना कोंबण्याचा प्रकाश आंबेडकरांचा खेळ अत्यंत बालीश असल्याचे त्यांचे स्पष्ट मत होते. मार्क्सवादाशी त्यांचे काही मुद्यांवर पटत असे तर काही मुद्दे त्यांना दलितांच्या चळवळीचा विचार करता अजिबात पटणारे नव्हते. मार्क्सवाद केवळ आर्थिक गुलामगिरी विरुद्ध असून जातीव्यवस्थेविरुद्ध नाही. केवळ आर्थिक समता म्हणजे समता नाही. भारतात लोकशाही आणि जातीभेद एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे विषमता मिटविल्याशिवाय लोकशाही, बंधुत्व टिकू शकत नाही. समतेसाठी लढा हाच राष्ट्र घडविण्याचा लढा आहे असे सांगताना ते आंबेडकरी चळवळ आदिवासींपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन नेहमी करीत. नीतिमान आयुष्य जगणे म्हणजेच बौद्ध धम्म आहे. बंडखोरी हा पिंड कार्यकर्त्यांचा असलाच पाहिजे. मात्र एकावेळी हिंदू आणि बौद्ध असे दोन धर्मात राहू नका असा त्यांचा आग्रह असे. शिक्षणाने क्रांती झाली आहे आता प्रतिगामी शक्तींच्या 70 पिढ्यांनी प्रयत्न केले तरी आमच्यावर ते गुलामगिरी लादु शकत नाही असे राजा ढाले यांचे मत होते. मराठीतली सत्यकथेची सत्यकथा ढाले यांनी लिहिली. महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्‍न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही यांनीच लिहिला. तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे. राजा ढाले हा दलित चळवळीचा हुंकार होता. दलित चळवळ गेल्या तीन दशकात भरकटत गेली. त्याची त्यांना खंत होती. परंतु त्यांच्या हातात त्याविरुध्द स्पष्ट बोलण्यापलिकडे काहीच नव्हते. आज हा हुंकार निमला आहे.
---------------------------------------------------------------------

0 Response to "दलितांचा हुंकार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel