-->
चांदोबाच्या भेटीला...

चांदोबाच्या भेटीला...

मंगळवार दि. 23 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
चांदोबाच्या भेटीला...
श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून अखेर चांद्रयान-2 हे यान घेऊन भारतीय बनावटीच्या रॉकेटने यशस्वी उड्डाण केलेे. पृथ्वीला चार प्रदक्षिणा मारल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल होणार आहे. इस्त्रोने शनिवारी चांद्रयान-2ची रंगीत तालीम केली होती. यातील अडचणी, त्रुटी पूर्ण केल्यानंतर सोमवारी चांद्रयान अवकाशात झेपावले. उड्डाणानंतर 17 मिनिटांतच योग्य कक्षेत प्रवेश केला आणि यशस्वी वाटचाल सुरू झाली. चांद्रयानाचे प्रक्षेपण यशस्वी ठरताच इस्रोच्या संशोधकांनी एकच जल्लोष केला. आता पुढील 23 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे. 15 जुलै रोजी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. इस्रोने एका आठवड्यात चांद्रयान-2 मधील सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या. विशेष बाब म्हणजे प्रक्षेपणाची तारीख पुढे ढकलल्यानंतरही चांद्रयान-2 नियोजित तारखेला म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर दाखल होणार आहे. लँडर आणि रोव्हर यांनी नियोजित वेळापत्रकानुसार काम करावे यासाठी चांद्रयान-2 चंद्रावर ठरलेल्या वेळेवर पोहचवण्यात येणार आहे. हा वेळ वाचवण्यासाठी आता चांद्रयान पृथ्वीची एक प्रदक्षिणा कमी मारणार आहे. चांद्रयान पाच वेळा पृथ्वी भ्रमण करुन चंद्रावर जाणार होते पण आता चार फेर्‍या मारेल. चंद्रावर सूर्यप्रकाश जास्त असलेल्या ठिकाणी याचे लँडिंग होणार आहे. 21 सप्टेंबरनंतर सूर्यप्रकाश कमी होण्यास सुरुवात होणार आहे. लँडर-रोव्हरला 15 दिवस काम करायचे आहे. यामुळे ते वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे. यान चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ऑर्बिटर एक वर्ष पृथ्वी आणि लँडरमध्ये संवाद साधण्याचे काम करणार आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणार आहे. यामुळे चंद्राचे अस्तित्व आणि विकासाबद्दल माहिती मिळेल. लँडर आणि रोव्हर चंद्रावर एक दिवस (पृथ्वीचे 14 दिवस) काम करणार आहेत. चंद्रावर भूकंप येतात का नाही हे तपासणे लँडरचे काम असणार आहे. तर रोव्हर चंद्रावरील खनिज घटकांबाबत माहिती मिळवण्याचे काम करणार आहे. यापूर्वी चांद्रयोन 1 ही मोहीम जबरदस्त यशस्वी झाली होती. चंद्रावर पाणी असल्याचा शोध या मोहिमेत लावण्यात आला होता. चंद्रावर पाणी आहे याचा अर्थ तेथे जीवसृष्टी असू शकते किंवा तेथे जीवसृष्टी जगू शकते असे त्याचे अनुमान होते. आता चांदोबाच्या भेटीला पुन्हा भारतीय पाहुणा जात असून त्यातून अनेक नवीन शोध लावले जातील. महत्वाचे म्हणजे चंद्राच्या ज्य दक्षिण भागावर कोणीही यान उतरविले नव्हते तेथे चांद्रयान दोन उतरणार आहे. त्यामुळे आजवर दुर्लक्षीत असलेल्या चंद्राच्या भागात जाऊन काही तरी नवे हाती लावण्याची उर्मी भारतीय अंतराळ संशोधकांमध्ये आहे. चांद्रयान 2 हा उपग्रह ज्या जीएसएलव्ही मार्क 3 या भारतीय बनावटीच्या प्रक्षेपकाच्या साह्याने अवकाशात गेला आहे त्याचे तीन टप्पे आहेत. त्यातील शेवटच्या स्टेजमध्ये क्रायोजनिक इंजिन प्रज्वलित केले जाते. या इंजिनात लिक्विड हायड्रोजन व लिक्विड ऑक्सिजनच्या दोन टाक्या असतात. या टाक्यांमधील इंधन आणि ऑक्सोडायझर यांच्या प्रज्वलनामुळे अत्यंत गरम असे वायू तयार होतात. हे वायू इंजिनाच्या नळकांड्यातून वेगाने बाहेर पडल्याने प्रक्षेपकाला जोर मिळतो. त्याच्या साह्याने उपग्रह वर जाण्यास मदत होते. यासाठी वापरली जाणारी सर्व यंत्रणा ही देशातच तयार करण्यात आली असून असा प्रकारे विकसनशील देशाने अशी यंत्रणा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गेल्या वेळची चंद्राची मोहिम असो किंवा आजवरचे अंतराळ संशोधनातील यश असो त्यात भारतीय शास्त्रज्ञांंच्या कामगिरीला सलामच केला पाहिजे. भारताची ही झेप वाखाणण्याजोगीच ठरावी. भारतीय बनावटीचा जीएसएलव्ही मार्क 3 हा इस्रोचा सर्वांत शक्तिमान प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपकाच्या जोरावर 2022मध्ये गगनयान मोहिमेंतर्गत पहिल्या भारतीय मानवाला अवकाशात पाठविण्याची योजना आहे. चांद्रयान 2 या उपग्रहाचे वजन हे 3 हजार 800 किलोग्रॅम आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविला जाणारा रोव्हर सौरऊर्जेवर काम करतो. चंद्रावरचा एक दिवस हा पृथ्वीच्या 14 ते 15 दिवसांचा मिळून होतो. तेवढ्याच दिवसांची रात्र चंद्रावर असते. चंद्राच्या एका दिवसाचा सूर्यप्रकाश वापरून रोव्हर आणि लँडर यांना काम करावे लागणार आहे. ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्षाचे आणि लँडर व रोव्हरचे आयुष्य प्रत्येकी 14 दिवसांचे आहे. प्रज्ञान हा रोव्हर चंद्रावरील मातीच्या नमुन्यांचे विश्‍लेषण करून ऑर्बिटरच्या साह्याने ही माहिती इस्रोकडे पाठविणार आहे. त्याचबरोबर पृथ्वी व चंद्रातील अंतर नेमके किती आहे ते मोजण्याचे काम केले जाईल. चांद्रयान दोन हा भारतीय अंतराळ संशोधनातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. 80च्या दशकात शीत युध्दामध्ये अंतराळ संशोधन हे विध्वंसक झाले होते. ज्या संशोधनाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग करावयाचा ते संशोधन शीतयुद्दामध्ये स्टार वॉर्ससारखे कार्यक्रम हाती घेऊन जग संपवायला निघाले होते. आता मात्र तो काळ संपला आहे. असे असले तरीही यापुढे कोणतेही संशोधन हे मानवजातीच्या कल्याणासाठी वापरले गेले पाहिजे याची दक्षता सर्वांनीच घेण्याची गरज आहे. चांदोबाच्या भेटीला जाणार्‍या चांद्रयानाला शुभेच्छा!
----------------------------------------------------------------

0 Response to "चांदोबाच्या भेटीला..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel