-->
नवा उत्साह, नवी उमेद!

नवा उत्साह, नवी उमेद!

सोमवार दि. 08 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
नवा उत्साह, नवी उमेद!
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांच्या 64 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या युवा मेळाव्यात नवा जोश, नवी उमेद जशी पहायला मिळाली तसेच राज्यातील भावी राजकारणाच्या समीकरणांची पेरणी केली गेली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचा झालेला विजय तसेच नुकत्याच पार पडलेल्या चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापचा झालेला दणदणीत विजय या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्यास विशेष महत्व होते. खासदार सुनिल तटकरे व वंचित आघाडीचे बंडखोर नेते उपकारकार व माजी आमदार लक्ष्मण माने यांची या मेळाव्याची उपस्थितीही राज्याच्या भावी राजकारणाची दिशा ठरविणारी निश्‍चितच होती. भावी काळ हा युवकांचा आहे. आपला देश हा जगातील सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. या तरुणांना योग्य दिशा देऊन त्यांना केवळ रोजगारच नव्हे तर त्यांना पुरोगामी विचारांची शिदोरी देऊन त्यांना वैचारिकदृष्ट्या संपन्न करण्याची तयारी या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आली. सध्या सोशल मिडियावर तरुण सक्रिय असतात, त्यांनी जरुरु सोशल मिडियात सहभागी असावे मात्र त्याच्या आहारी जाऊ नये. त्याचबरोबर तरुणांनी वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस समृध्द होतो व ती समृध्दीच तरुणांना भविष्यात उपयोगी पडणार आहे. असा संदेश या मेळाव्यात देण्यात आला. उपराकार लक्ष्मण माने यांंनी दोन दिवसांपूर्वीच बहुजन वंचित आघाडीची वैचारिक दिवाळखोरी उघड केली आणि त्यांच्या या बंडोखोरीमुळे राज्यात काही नवीन राजकीय समीकरणांची बांधणी सुरु झाल्याचे सुचित झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे कॉँग्रेस-राष्ठ्रवादी-शेकाप आघाडीला 12 जाागंवर फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याची जी टीका होत होती त्यावर शिक्केमोर्तब झाले. आता देखील वंचित आघाडीने जी जागांची ऑफर दिली आहे ते पाहता त्यांना कॉँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छाच नाही असेच दिसते. म्हणजेच पुन्हा वंचित आघाडी आता लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वतंत्रपणाने लढवून भाजपाचाच फायदा करुन देणार हे स्पष्ट आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांचा प्रतिगामी पक्षांना मदत करण्याचा हा डाव उधळून लावण्याचे वंचित आघाडींच्या नेत्यांनी ठरविले आहे. त्यातून लक्ष्मण माने यांनी बंडखोरी करुन आपम स्वतंत्र लढणार असल्याचे सुचित केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी आमदार जयंतभाईंच्या वाढदिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. आज देशात प्रतिगामी शक्ती एवढ्या आक्रमक झाल्या आहेत की त्यांना कोणताच विरोधक नको आहे. देशातील पुरोगामी विचार व पक्ष त्यांना संपवायचे आहेत. अशा वेळी देशातील सेक्युलर पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात विरोधक एकत्र आले असेल तरीही त्यांना फारसे यश आले नाही. रायगडमध्ये मात्र तटकरे यांचा विजय झाल्याने त्यांच्या रुपाने रायगडातील विरोधकांचा आवाज लोकसभेत घुमणार आहे. रायगडमध्ये जो आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तोच प्रयोग आता राज्यात नेण्याची गरज आता आहे. त्यादृष्टीनेे आज अलिबागमध्ये झालेला युवा मेळावा महत्वाचा ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या बाबतीत अजूनही अनेक जण साशंक आहेत. त्याबाबतीतील शंका दूर झालेल्या नाहीत. मात्र तो मुद्दा बाजूला ठेऊन विरोधकांनी आपली मोट एकत्र बांधणे जरुरीचे आहे. सर्व विरोधकच एकत्र आले तर सत्ताधार्‍यांच्या विरोधात जबरदस्त आव्हान उभे करता येईल. लोकसभेत पराभव झाला असला तरीही त्यातून पुरोगामी शक्ती केव्हाच बाहेर आल्या आहेत. काँँग्रेस मात्र पराभवाच्या छायेत अजूनही वावरते आहे. कारण कॉँग्रेसने प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगल्यामुळे विरोधात राहमे त्यांच्या आंगवळणी पडलेले नाही. परंतु आता ठोसपणाने विरोधात उभे राहून सत्ताधार्‍यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व लोकशाही व सेक्युलर पक्षांनी एकञ येण्याची आवश्यकता आहे. गेल्या पाच वर्षात भाजपाने देशातील राजकारणाचा बाजच बदलून टाकला आहे. राजकीय निष्ठेपेक्षा पैसा फेकून लोक आपल्याकडे आकृष्ट करण्याकडे त्यांचा कल आहे. त्याला अनेक जण फसले आहेत. आपली राजकीय निष्ठा वेशीवर टांगून आपल्या विचारांच्या नेमक्या उलट्या विचारांच्या पक्षात रातोरात जाणारे अनेक जण आपल्याला आढळतात. पैसे फेकले की आपण लोक व नेते असे दोघेही विकत घेऊ शकतो हे भाजपाचे सूत्र सध्या यशस्वी होताना दिसले तरीही ते फार काळ टिकणारे नाही. राजकारणात आपला विचार व आपली पक्ष निष्ठा फार महत्वाची असते. पण भाजपाने पैसा फेकून राजकीय चित्र पालटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेला आता हळूहळू या सर्वच बाबींचा उबग येऊ लागला आहे. अर्थात हे चित्र बदलण्याची कुवत व क्षमता पुरोगामी पक्षांमध्ये आहे व आता त्यांच्यावर ती एक ऐतिहासीक जबाबदारी येऊन ठेपली आहे. येत्या निवडणुकीत हे दिसेलच. अर्थात त्याची पेरणी अलिबागच्या युवा मेळाव्यात झाली असे म्हणावे लागेल.
----------------------------------------------------------- 

0 Response to "नवा उत्साह, नवी उमेद!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel