-->
अब की बार...कौन?

अब की बार...कौन?

बुधवार दि. 22 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अब की बार...कौन?
एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजारात उधाण आले आहे. सोमवारी शेअर निर्देशांक तब्बल 1400 अंकांनी वधारला. अर्थात शेअर बाजाराच्या या तेजी-मंदीवर राजकारण चालत नाही. राजकारण व अर्थकारण याच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज घेत शेअर बाजाराची वाटचाल सुरु असते. परंतु शेअर बाजारात तेजी म्हणजे मोदी सरकार आलेच असा त्याचा अर्थ निघत नाही. भाजपा समर्थक आनंदले असून आपला विजय नक्कीच असल्याचे दिसते. खरे तर त्यांचा आत्मविश्‍वास एवढा आहे की, नरेंद्र मोदींचा शपथविधी ही केवळ औपचारिकताच आहे. परवानगी दिली असती तर त्यांनी निकालाच्या आधीच मोदींचा शेपथविधी आटोपला असता. परंतु एक्झिट पोल व प्रत्यक्ष निकाल यात बरेच अंतर असते. यासाठी 2004 सालच्या निकालाची आठवण येते. त्यावेळी सर्वच एक्झिट पोल कॉँग्रेसच्या विरोधात होते व प्रत्यक्षात काय झाले? कॉँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला, या निकालामुळे शेअर बाजार गडगडला होता. त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर बाजार सावरला होता. त्यामुळे भाजपाने आपला विजय हा निकालानंतरच साजरा करावा हे उत्तम. जो कोणी सत्तेत येईल किंवा ज्याच्या बाजूने जनता कौल देईल हा निर्णय सर्वच राजकारण्यांना स्वीकाहार्य असेल यात काही शंका नाही. परंतु सध्या ज्या प्रकारे भाजपा एक्झिट पोल व सर्व चॅनेल्स मॅनेज करीत आहे ते पाहता, आश्‍चर्यच वाटते. खरे तर भाजपाला विजयाची एवढी खात्री असेल तर त्यांना हे करण्याची काही आवश्यकताच नाही. परंतु काहीही करुन सत्ता टिकवायचीच हे तंत्र मोदी-शहा यांची जोडी अवलंबणार आहेत. एकदा का भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावर अन्य मित्र पक्षांची जमवाजमव करुन सत्ता टिकविण्याचे या जोडीने ठरविले आहे. त्यासाठी ते साम-दाम-दंड वापरण्याच्या तयारीत आहेत, असे समजते. दिल्लीत भाजपाने आपल्या मित्र पक्षांची बैठक बोलाविली आहे, ही केवळ त्यासाठीच आहे. त्याचबरोबर आपले नंबर्स अगदीच कमी झाले तर आणखी मित्र कसे जोडावयाचे याचा प्लॅनही भाजपाने तयार ठेवला आहे. तिकडे संघाने मात्र पूर्णपणे मौन बाळगून अशा स्थितीत नेमके काय् करायचे याची बंद भिंतीआड रणनिती आखली आहे. यात मोदींना पर्याय कोणता असेल याचीही चर्चा झालेल्या समजते. संघाची बंद दरवाज्यातली चर्चा ही सहसा बाहेर पडत नाही, परंतु प्रत्येक बाबतीत संघ पर्याय तयार ठेवतो त्यानुसार त्यांनी राजनाथ सिंग किंवा नितीन गडकरींना पंतप्रधानपदासाठी स्टॅँड बाय ठेवल्याची चर्चा आहे. एक्झिट पोलचे निकाल कितीही भाजपाच्या दृष्टीने अनुकूल दिसले तरीही प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत ठोस काहीच सांगता येणार नाही. भाजपला 2014 एवढी मते मिळाली तरी तिला प्रत्यक्षात जास्तीत जास्त 210 जागा मिळू शकतात असे जाणकार सांगतात. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे 300 पेक्षा एकही जागा कमी येणार नाही असा दावा करत आहेत. तर मोदी म्हणजे खणखणीत बंदा रुपाया आहे असे सांगत आहेत. मात्र त्यांचे हे दावे खोटे आहेत. कारण गेल्या वेळसारखी मोदी लाट यावेळी शंभर टक्के नाही. फुलवामा नंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरल्याने मोदींचा राजयोग बळकट झाला आहे असे पक्षातील नेते म्हणत असले तरीही याचा फारसा फायदा होणार नाही असे सांगणारे तेवढ्याचा संख्येने आहेत. कॉँग्रेसने देखील आपल्या पातळीवर पररंतु लो प्रोफाईल राहून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बिगर भाजपा सरकार सत्तेत कसे येईल यासाठीची कॉँग्रेसची मोर्चेबाधणी कितपत यशस्वी होते हे पहावे लागेल. यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी तर ज्यादिवशी निकाल जाहीर होणार आहेत त्याच दिवशी विरोधी पक्षांची बैठकदेखील बोलावली आहे. काहीही झाले तरी मोदी आपली खुर्ची सोडणार नाहीत आणि साम दाम दंड भेद असा सर्वांचा वापर करत पंतप्रधानपदी राहतील अशी भीती विरोधी पक्षात आहे. मोदी-शाह यांनी सत्तेत असताना एवढा उन्माद केला आहे की त्यांना खुर्चीशिवाय जगणे कठीण होणार, असा विरोधकांचा दावा आहे. 2014 सारखी मोदी लाट नसल्याने भाजपाची टक्केवारी घटणार आहे आणि काँग्रेसची मात्र वाढणार आहे. राहुल गांधी या निवडणुकीत मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून खंबीरपणे उभे असल्याने भाजपाविरुद्धची मते जास्त प्रमाणात काँग्रेसकडे वळतील अशी अपेक्षा बाळगली जात आहे. काँग्रेस किमान शंभरी तरी गाठणार आहे असे मोदी समर्थकदेखील मान्य करतात. राजधानीत मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुस्लिम समाजाने शेवटच्या एक दोन दिवसात टोपी फिरवून काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले असा केजरीवाल यांचा दावा आहे. अल्पसंख्याक समाजाने देशभर असे आयत्यावेळी स्ट्रटेजिक वोटिंग केले असेल तर त्याचे परिणाम भाजपकरता चांगले नाहीत. त्यामुळे यावेळी अबकी बार कौन? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी आता केवळ 48 तास शिल्लक राहिले आहेत. त्याची वाट बघु या...
------------------------------------------------------------

0 Response to "अब की बार...कौन?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel