-->
कामगिरी खासदारांची...

कामगिरी खासदारांची...

शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कामगिरी खासदारांची...
सोळाव्या लोकसभेचा कार्यकाल आता संपला आहे. आता काही दिवसातच लोकसभा निडणुकांचे बिगुल वाजतील. निवडणुकीनंतर जे सरकार स्थापन होईल त्यानंतर 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ सुरु होईल. तत्पूर्वी सोळाव्या लोकसभेचा आढावा घेतल्यास या लोकसभेबरोबरच कायदा करण्यासाठी मांडण्यात आलेली अनेक विधेयके आणि संसदीय समितीचे अहवाल रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. तीन तलाक विधेयक, नागरिकता विधेयक यांसारख्या वादग्रस्त ठरलेल्या विधेयकांचे कायद्यात रुपांतर होऊ शकलेले नाही. आता नवीन सरकार आल्यावरच या विधेयकांविषयी निर्णय घेईल. बुधवारी संसदीय पक्षाच्या नेत्यांच्या निरोपाच्या भाषणानंतर संसद स्थगित केली गेली. आता लोकसभा निवडणुकीची हवा तापण्यास सुरुवात झाली आहे. कायदे आणि देशाची ध्येयधोरणे ठरवणारे सर्वोच्च ठिकाण म्हणजे संसद. लोकसभा, हे संसदेचे कनिष्ठ सभागृह, येथील सदस्यांना भारतातली जनता थेट निवडून देते. लोकसभा सदस्यांचे प्रमुख काम हे भारतीय राज्यघटनेशी सुसंगत कायदे बनवणे आणि देशाची ध्येयधोरणे आखणे हे असते. आपण महाराष्ट्रातून आपण निवडून दिलेले 48 खासदार तिथे कोणते प्रश्‍न विचारतात, त्या प्रश्‍नांचे विषय काय असतात, त्यांची विचारदिशा काय असते हे आपण तपासणे गरजेचं आहे. याविषयी संपर्क या संस्थेने एक चांगला पाहणी अहवाल प्रसिध्द केला आहे. यावरुन आपले लोकप्रतिनीधी नेमके कसे काम करतात त्याचा अंदाज येऊ शकतो. सोळाव्या लोकसभेच्या 2014 ते 2018 या काळातल्या एकूण 16 अधिवेशनांत खासदारांनी विचारलेल्या प्रत्येक अधिवेशनात सरासरी 400 तारांकित प्रश्‍न स्वीकारले आणि त्यापैकी जवळपास 75 प्रश्‍नांना मंत्र्यांनी तोंडी उत्तरे दिली. या 16 अधिवेशनांत तारांकित आणि अतारांकित मिळून एकूण 77,365 प्रश्‍न उपस्थित केले गेले. त्यापैकी महाराष्ट्राच्या खासदारांनी 26,725 प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी महिला व बालकल्याण या विषयावर सर्वाधिक 26 आणि आरोग्य-कुटुंबकल्याण या विषयावर सर्वाधिक 83 प्रश्‍न उपस्थित केले गेले. हे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित केले. सोलापूरचे खासदार शरदकुमार बनसोडे यांनी महिला व बालकल्याणविषयक एकही प्रश्‍न विचारला नाही. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या विषयावर सर्वाधिक 13 प्रश्‍न कल्याणचे श्रीकांत शिंदे, रामटेकचे कृपाल तुमान आणि दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण या तिघांनी विचारले होते. हागणदारीमुक्ती, शौचालय बांधणी, जलाशय पाणी साठवण क्षमता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता याबद्दलचे मुद्दे त्यात आहेत. शरदकुमार बनसोडे, राजेंद्र गावित, आणि रावसाहेब दानवे यांनी या विषयावर एकही प्रश्‍न विचारलेला नाही. ग्रामीण विकास या विषयाशी संबंधित सर्वाधिक 28 प्रश्‍न उपस्थित करणार्‍या शिर्डीच्या खासदार सदाशिव लोखंडे यांनी भूमिहीनांना जमिनी मिळण्यासाठी, जमिनीच्या समन्यायी वाटपासाठी जमीनविषयक कायद्यांत सुधारणांची गरज, गरिबीरेषेखालील जनतेच्या विकासाची धोरणे, जातपंचायतींमध्ये सक्रिय असलेल्यांनी ग्रामपंचायतीचे निर्वाचित सदस्य म्हणूनही काम करण्याने तयार होणारे पेच असे लक्षणीय मुद्दे मांडले. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी स्मार्ट शहरे, शहरांची स्वच्छता, मुंबईतल्या किल्ल्यांची डागडुजी आणि सुशोभीकरण यासह नागरी विकासाशी संबंधित सर्वाधिक 23 प्रश्‍न विचारले. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेही आदिवासी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे. मात्र, खासदार झाल्यापासूनच्या चार अधिवेशनांत आदिवासीविषयक एकही प्रश्‍न त्यांनी विचारलेला नाही. शेती आणि शेतकरीविषयक सर्वाधिक 53 प्रश्‍न उपस्थित करणार्‍या खासदार आहेत सुप्रिया सुळे. त्यांच्या मागोमाग अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी 50 प्रश्‍न विचारले आहेत. नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी सर्वाधिक 8 पंचायतराज विषयक प्रश्‍न विचारले आहेत. कौशल्यविकास आणि उद्योजकता या विषयावरचे सर्वाधिक 25 प्रश्‍न माढयाचे विजयसिंह मोहिते-पाटील आणि बारामतीच्या सुप्रिया सुळे यांनी आणि त्यामागोमाग 24 प्रश्‍न हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी विचारले. सर्वात कमी 101 प्रश्‍न विचारले जालन्याचे  खासदार रावसाहेब दानवे यांनी विचारले. एकही प्रश्‍न न विचारणारे दोन खासदार आहेत. सातार्‍याचे उदयनराजे भोसले आणि मागच्याच वर्षी पोटनिवडणुकीतून निवडून गेलेले आणि भंडारा-गोंदियाचे मधुकरराव कुकडे. या दोघांनीही एकही प्रश्‍न न विचारुन एक विक्रमच केला आहे. एक अंकी, म्हणजे 8 ही प्रश्‍नसंख्या आहे गेल्या वर्षी पोटनिवडणूक जिंकून पालघरचे खासदार झालेले राजेंद्र गावित यांची. संसदेचे कामकाज वर्षांतील साधारणपणे 70 ते 80 दिवस चालले. 16 अधिवेशनांचे एकूण 321 दिवस आहेत. अधिवेशन काळात 100 टक्के उपस्थित असणारेही खासदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गोपाळ शेट्टी यांची 100 टक्के उपस्थिती होती. मात्र ते पारसे कुठल्याही चर्चेत सहभागी झालेले दिसले नाहीत. अरविंद सावंत, अनिल शिरोळे, किरीट सोमय्या, सुनील गायकवाड, सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांची उपस्थिती 95 ते 99 टक्के या वर्गवारीत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांच्या उपस्थितीची सरासरी 80 टक्के आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थितीही सर्वात कमी आहे. एकूण पाहता राज्यातील खासदारांची वैयक्तिक कामगिरी अतिशय समाधानकारक आहे. मात्र राज्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांच्या बाबतीत सर्व पक्षांचे खासदार एक झाले व त्यासंबंधी आवाज उठविला असे काही एकदाही झाले नाही. असे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राज्याता आवाज खर्‍या अर्थाने दिल्ली दरबारी पोहोचणार नाही. 
--------------------------------------------------------

0 Response to "कामगिरी खासदारांची..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel