-->
शपथविधीच्या निमित्ताने...

शपथविधीच्या निमित्ताने...

बुधवार दि. 19 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
शपथविधीच्या निमित्ताने...
राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ या तीन राज्यातील शपथविधीच्या निमित्ताने विरोधकांची एकजूट दिसली ही सर्वात महत्वाची घटना म्हटली पाहिजे. एकाच बसमधून सर्व विरोधक जात असतानाचे हे छायाचित्र पाहून भाजपाच्या पोटात निश्‍चितच गोळा आला असेल हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. कर्नाटक निवडणुकीनंतर जी विरोधकांची एकजूट झाली आहे, त्यात काकणभर वाढच झाली आहे असे म्हणता येईल. भाजपा व त्यांच्या गोटातून एक नेहमी प्रश्‍न उपस्थित केला जातो की, मोदींना पर्याय देणारा सशक्त नेता विरोधकांकडे नाही. परंतु हा खोटा समज आहे. कारण ज्या तीन राज्यात कॉँग्रेसने बाजी मारली तेथे अगोदर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर झाले नव्हते. उद्या देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही अगोदर पंतप्रधानाचे नाव जाहीर करण्याची आवश्यकता नाही. ज्याच्या जागा सर्वाधिक असतील तसेच त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार, पंतप्रधानांचे नाव जाहीर करण्याचे धोरण ठेवता येईल. भाजपाकडे सध्या मोदींचे नाव आहे, परंतु आता आगामी निवडणुकीत मोदींच्या नावे मते मिळणार नाहीत हे त्यांनी देखील लक्षात ठेवावे. भाजपाविरोधी महागठबंधन आता खर्‍या अर्थाने वेग घेईल असे दिसते.  त्याची झलक या शपथविधीच्या निमित्ताने मिळाली. नुकत्याच झालेल्या द्रमुकच्या मेळाव्यात स्टॅलिन यांनी राहूल गांधी यांचे नाव पंतप्रधानदासाठी सुचविले. परंतु त्यासंदर्भात खुद्द राहूल गांंधी व कॉँग्रेसचे अनेक नेते गप्प आहेत. त्यात काहीच चूक नाही. कारण राहूल गांधींनी स्वत:ला किंवा कॉँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यास ते अनेक नेत्यांना रुचणार नाही. याचा अर्थ स्पष्टच आहे की, अनेक त्यांंना आपल्याला या स्पर्धेत रहावयाचे आहे. परंतु निकाल लागल्यावर यातील अनेकांना माघार घ्यावी लागेल. त्यामुळे सध्या या नेत्यांच्या आशाआकांक्षांना फूलू द्यावे. नंतर काळच त्यांच्याविषयी निर्णय घेईल. कॉँग्रेसने मात्र तीन राज्यातील निवडणुका जिंकून मोदी व भाजपा या दोघांचीही हवा काढून घेतली आहे हे नक्की. राहूल ागंधी हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत हे देखील या निमित्ताने दिसले. कारम मुख्यमंत्र्यांची माळ नवीन पिढीच्या नेत्यांच्या गळ्यामध्ये पडणार की जुन्या जाणत्यांना यात प्राधान्य दिले जाणार हा सवाल होता. राहूल ागंधींनी या दोन्ही नेत्यांना सांभाळत या दोगांची पक्षाला गरज आहे असा संदेश दिला आहे. एका झटक्यात जुन्यांना बाजूला सारुन ते सर्व सुत्रे तरुणांच्या हातात द्यायला तयार नाहीत हे देखील या निमित्ताने दिसले. जुन्यांना मान देत तरुणांनाही समान संधी देण्याचे गांधींचे धोरण दिसते. देशात अवघ्या चार महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ते आव्हान फार मोठे आहे आणि त्याला सामोरे जाताना पक्ष मजबूत कोण उभा करू शकतो, याचा विचार सोनिया आणि राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. त्यामुळेच मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, तर राजस्थानात सचिन पायलट यांना आपला तरुण-तडफदार घोडा सारीपटावरून दोन घरे मागे घ्यायला राहूल गांधींनी भाग पाडले आहे. राजस्थानात अशोक गेहलोत, मध्य प्रदेशात कमलनाथ आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली आहे. यामागे एक सूत्र दिसत आहे. हे तिन्ही नेते ओबीसी आहेत आणि भाजपची मतपेढी ही प्रामुख्याने ओबीसी आहे. त्यालाही छेद कॉँग्रेस पक्षाला देता आला आहे. त्यापलीकडची बाब म्हणजे कमलनाथ असोत की बघेल, हे दोघेही आपापल्या राज्यांत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांचा पक्ष संघटनेशी निकटचा संबंध होता. गेल्या काही वर्षात पक्षाची संघटना मोडकळीस आल्यासारखी स्थिती होती. आता लोकसभा निवडणुकीत याच विजयाची पुनरावृत्ती करावयाची असेल तर पक्षाची संघटना हाताशी लागणार आहे. त्यामुळे यातील जाणकार असलेल्यांचा वितार करणे त्यांनी पसंत केले आहे. मात्र राजस्थानात पक्षसंघटनेत काम करणारे प्रदेशाध्यक्ष पायलट यांच्याऐवजी गेहलोत यांना प्राधान्य देण्यात आले. राजस्थानात निवडून आलेल्या 99 आमदारांपैकी जवळपास 70 आमदारांचा पाठिंबा गेहलोत यांना होता, हे एक महत्वाचे कारण सांगितले जाते. गेहलोत यांचे तिकीट वाटपावर वर्चस्व होतेच; शिवाय पायलट यांच्या पाठीराख्यांच्या पायात पाय टिपीकल कॉँग्रेसच्या नेत्याप्रमाणे घालण्याचे कामही केले होते. मध्य प्रदेशात कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे तसेच ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी हातात हात घालून निवडणुका लढवल्या होत्या. राजस्थानात मात्र पायलट यांना शह देण्यासाठी सी. पी. जोशी, गिरिजा व्यास ही जुन्या पिढीतील मंडळी काम करीत होती. ही तिन्ही राज्ये भाजपचे बालेकिल्ले होते. यातील मध्यप्रदेशात तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चांगले संघटन आहे, त्यांच्या विविध संस्थांनी आपला चांगला जम राज्यात बसविला आहे. असे असून तेथेे भाजपाचा पराभव करणे ही सोपी बाब नव्हती. तिन्ही मुख्यमंत्र्यांची निवड ही व्यवहारवादानुसार झाली आहे. भविष्यात पक्ष वाढविण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. जर सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे या तरुणांची निवड झाली असती, तर तरुणांना कॉँग्रेसने वाव दिला असे म्हणण्यास जागा होती. परंतु त्यासाठी थोडी जोखीम घ्यावी लागली असती. सध्या अशा प्रकारची जोखीम काँग्रेसला परवडणारी नाही. कॉँग्रेसला व विरोधकांना आता लोकसभा निवडणुकांसाठी यातून बळ मिळाले आहे. सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जात सत्तास्थानी येणे हे कॉँग्रेसचे आता उदिष्ट असेल. शपथविधीच्या दिवशी विरोधकांमध्ये असलेला उत्साह पाहता, हे उदिष्ट गाठणे आता अशक्य आहे असे नाही. 
---------------------------------------------------------------------

0 Response to "शपथविधीच्या निमित्ताने..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel