-->
निवडणूक अंदाज

निवडणूक अंदाज

सोमवार दि. 12 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
निवडणूक अंदाज
येत्या महिन्याभरात येऊ घातलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या अंदाजानुसार, सध्या तरी मध्यप्रदेश, राजस्थान व कदाचित तेलंगणा या तीन राज्यात कॉग्रेसची सत्ता स्थापना होण्याचे अंदाज जाहीर झाले आहेत. यातील राजस्थान व मध्यप्रदेशात कॉग्रेसची सत्ता येणार हे जवळपास नक्की असल्यासारखी स्थिती व्यक्त होत आहे. तर तेलंगणा या नव्याने स्थापन झालेल्या राज्यात कॉग्रेस किंवा टी.आर.एस. सत्तेत येण्याची शक्यता 50 टक्के आहे. छत्तीसगढमध्ये बहुदा बाजपा आपली सत्ता कायम राखेल असा अंदाज आहे. मिझोराममध्ये भाजपाचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे तेथे भाजपाचा येण्याची शक्यताच नाही. पाचही राज्यांना एकत्र केले तर लोकसभेच्या सुमारे 120 जागा आहेत. यांचा विचार करता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची त्यात सत्ताधारी भाजपची कसोटीच आहे. त्यामुळे या विधानसभेचे निकाल भविष्यातील राजकीय धुमाळीचे रणांगण ठरणार आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या सलग तीनवेळा भाजपची सत्ता आहे. शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे नेतृत्व करीत असून त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. मात्र तीन वेळा सलग सत्ता राखल्यावर सरकारच्या विरोधात नकारात्मक वातावरण तयार होणे स्वाभाविकच होते. त्याचबरोबर मध्यप्रदेशात अनेक भ्रष्टाराची प्रकरणे भाजपाला भोवणार आहेत. राजस्थानमधील भाजपच्या हातून सत्ता जाण्याची चिन्हे दिसत आहेत. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत. अंदाजानुसार भाजपचा सफाया होणार नाही परंतु पक्ष सत्तेवर येऊ शकणार नाही. काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा अंदाज आहे. राजस्थान हे असे एक राज्य आहे जे दर पाच वर्षांनंतर सत्ताबदल करते. दरवेळा आलटून पालटून कॉग्रेस किंवा भाजपाची सत्ता येते. राजस्थान भाजापामध्येही खूप नाराजी आहे. मुख्यमंत्र्याचा जनतेशी संपर्क तुटला आहे. जनतेत सरकारविरोधा लाट आहे व ती स्पष्टपणे जाणवत आहे. छत्तीसगडमध्ये देखील सलग चौथ्यावेळी भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज आहे तर तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती किंवा कॉग्रेस यांना अजूनतरी समान संधी आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाला राजस्थानमध्ये पुन्हा सत्ता येण्याचा मोठा फायदा होईल. काँग्रेसकडे सध्या एकमेव कर्नाटक हे मोठे राज्य आहे. तिथेदेखील स्वबळावर सत्ता नाही. याउलट राजस्थानमधे कोणाचीही मदत न घेता पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल. म्हणजेच काँग्रेससाठी ही एक जमेची बाजू ठरणार आहे. पाच राज्यातील निवडणूक पाहता भाजपला केवळ छत्तीसगडमध्ये आपला किल्ला शाबूत ठेवता येणे शक्य होईल, असा सध्याचा अंदाज आहे. भाजपने शतप्रतिशत भाजपचा नारा लावलेला आहे. काँग्रेसमुक्त भारतला छेद राजस्थान देणार आहे. राजस्थानची जनता आपल्या परंपरेनुसार परिवर्तन करेल याबाबत शंका नाही. भाजपला मात्र राजस्थानमधील पराभव पचनी पडणे थोडे कठीण जाऊ शकते. तसेच देशातील राजकारणावर त्याचा मोठा परिणामही होऊ शकतो. यामुळे मोदी-शहांच्या राजकारणाला चाप लागणार आहे. राजस्थानमधील भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढल्यानेच भाजपच्या हातून सत्ता निसटणार आहे, असे बोलले जात आहे व निवडणूक पूर्व अंदाज देखील हेच सांगतो. अलीकडेच कर्नाटकातील लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीत केवळ एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागलेले आहे. यावरून आगामी चार महिन्यांनंतर होणा़र्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकात फार संघर्ष करावा लागेल. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या विषयांवर लढविल्या जातात. तरीदेखील सध्या विरोधी पक्ष एकत्र येत असल्याने विद्यमान भाजप सरकारसमोर आव्हान उभे राहाणार आहे. देशातील बहुतेक राज्ये, त्यातल्या त्यात मोठी राज्ये भाजपच्या ताब्यात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला आतापर्यंत सर्वात मोठे व घवघवीत यश प्राप्त झाले होते मात्र त्याच उत्तर प्रदेशात अनेक पोटनिवडणुकांमध्ये जनतेने धक्कादायक निकाल दिलेले असल्याने भाजपसाठी फारच कठीण परिस्थिती आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची एकप्रकारे लाट होती. देश एका मोठया आशेने भाजपकडे पाहत होता. मात्र जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. भाजपाने दिलेल्यापैकी कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. विकासाच्या मुद्यावर जनतेने भाजपालाच्या एकहाती सत्ता दिली. परंतु त्यांनी प्रत्यक्षात विकास नव्हे तर हिंदुत्वाचे राजकारण सुरु केले. त्यातूनच मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. पूर्वी त्यांची भाषणे लोक एैकत. आता त्यांचे भाषण सुरु झाल्यावर लोक चॅनेल बदलतात अशी परिस्थिती आहे. असे असले तरीही कॉग्रेसकडे आजही भक्कम पर्याय म्हणून पाहिले जात नाही. त्यासाठी भाजपाविरोधी आघाडी किती यशस्वीरित्या उभारली जाते त्यावर भाजपाचे यश अवलंबून राहिल. गेल्या वेळी भाजपाला 31 टक्के मते मिळाली होती. म्हणजे त्यांच्या विरोधातली 69 टक्के मते विरोधकात विभागली गेली होती. ती मते किती एकवटतात त्यावर भाजपाचा पराभव होऊ शकतो. आंध्रप्रदेेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांच्या कळपात उडी घेतली आहे. नुकतीच त्यांनी राहूल गांधी, शरद पवार यांची भेट घेऊन कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली. एकूणच विरोधकांच्या तंबूत आता विश्‍वास संपादन होऊ लागला आहे. आगामी काळातील या निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी अनुकूल ठरल्यास विरोधकांची मोट बांधण्याचा वेग वाढू शकतो.
---------------------------------------------------------------

0 Response to "निवडणूक अंदाज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel