-->
स्वागत वरुण राजाचे

स्वागत वरुण राजाचे

मंगळवार दि. 12 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
स्वागत वरुण राजाचे
घामाच्या धारात निखळून निघणार्‍या जनतेला दिलासा द्यायला यंदा वेळेवर पाऊस आल्याने वरुणराजाचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. यंदा पावसाचे आगमन मौसम विभागाच्या भविष्यवाणीनुसार झाल्याने तो ही आणखी एक आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे. यंदा अगदी 7 जून पासून पाऊस सुरु झाला तरी खरा मौसमी पाऊस कोकणात शुक्रवारी आला. त्यामुळे आता अधिकृत पावसाळा सुरु झाला आहे. गेल्या दोन दिवसात कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. सध्या मुंबईत मेट्रोची कामे सुरु असल्याने तसेच मुंबईचे नियोजन शून्य असल्यामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय होणे स्वाभाविक होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस अपेक्षेएवढा म्हणजे बर्‍यापैकी असेल. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी राज्याच्या अनेक भागात दुष्काळाच्या तीव्र झळा बसल्या नसल्या तरी त्याला गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्याचे एक महत्वाचे कारण होते. तसेच जलयुक्त शिवाराची अनेक ठिकाणी कामे चांगल्यारितीने झाली आहेत. त्यामुळे जलसाठा टिकून राहाण्यास मदत झाली आहे. यंदा आता पाऊस दिलासा देणार असला तरी पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेबन् थेंब आपल्याला साठवून ठेवावा लागणार आहे. तसेच यंदा पाऊस चंगला पडणार असल्याच्या बातमीमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. परंतु पावसाचा हा सुरुवातीचा ओघ कायमस्वरुपपी टिकण्याची आवश्यकता आहे. गेली काही वर्षे पाऊस वेळेत येतो परंतु नंतर मात्र वेळेत पडत नाही असा अनुभव आहे. यात अनेकदा शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. अनेकदा उभी पिके करपतात असा अनुभव आहे. अशा स्थितीत पुन्हा पेरणी करावी लागते. परंतु यंदा वरुणराजाने अशी पाळी आणू नये अशी अपेक्षा आहे. सध्या तरी पावसाने वेळेत आपले आस्तित्व दाखवून सर्वांनाच खूष केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा शंभर टक्क्यांच्या जवळपास पाऊस अपेक्षित असल्याने चांगले पीक येईल अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. गेल्या वर्षी देखील अन्नधान्याचे विक्रमी पीक झाले आहे. पाऊस नेहमीच चांगला पडावा, मात्र अतिवृष्टी ही नेहमीच हानीकारक ठरते. त्यात अनेक घरे उजाड होतात, उभ्या पिकांचे नुकसान होते. यंदा तसे होऊ नये हीच वरुणराजाकडे मागणी. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यत बहातांशी धरणे भरली होती. त्यामुळे गेले वर्षे दिलासादायक गेले. यंदा देखील असेच सुखाचे वर्ष जाईल अशी अपेक्षा वरुण राजाचे स्वागत करताना व्यक्त करु या.
अखेर संप मागे
एस.टी. कर्मचार्‍यांनी आपल्या वेतनवाढीच्या मागणीसंबंधी अचानक पुकारलेले संप दोन दिवसांनी मागे घेतला आहे. या संपामुळे जनतेचे खूपच हाल झाले. त्यातच म्हणजे दहावीचा निकाल लागलेला असताना हा संप झाल्याने विद्यार्थींची फार धावपळ झाली. अनेक ठिकाणी एसटीवर हल्ले झाले. यातून महामंडळाचे नुकसान झाले आहे. अर्थातच एसटीचे अशा प्रकारे नुकसान करणे कोणाच्याही हिताचे नाही. एस.टी. रस्त्यावरुन धावत असताना आपल्याला तिची किंमत वाटत नाही, मात्र ज्यावेळी एस.टी.चा संप होतो त्यावेळी आपल्याला तिचे महत्व पटते. एस.टी.च्या कर्मचार्‍यांचा संप मात्र जवळपास शंभर टक्केच होता. राज्यातील 250 आगारातून केवळ 20 टक्केच फेर्‍या झाल्या. त्यापैकी 97 आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यावरुन एस.टी. कर्मचार्‍यांची एकजूट दिसते. तसेच त्यांच्या प्रदीर्घ साचलेल्या मागण्यांबाबत हे कर्मचारी किती संवेदनाक्षम होते ते दिसते. महामंडळाने कर्मचार्‍यांसाठी 4 हजार 849 कोटी रुपयांची पगारवाढ जाहीर केली होती. त्यासंबंधी वृत्तपत्रात पानभर जाहीराती देऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या कामाची टिमकीही वाजविली होती. मात्र या पगारवाढीनंतर कर्मचार्‍यांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगात एसटीसाठी तीन ट्कके वेतनवाढ मंजूर केल्यास वाढीव वेतनश्रेणी मिळेल असे सांगत कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व गैरसमज झाले होते. त्यातून हा संप झाला. गेल्या दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी पगारवाढीसाठी संप केला होता. त्यावेळी त्यांना काही ठोस हाती न देता पगारवाढ करण्याचे आश्‍वासन देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती. परंतु आता देखील कर्मचार्‍यांची पुन्हा फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याने ते संतंप्त होणे स्वाभाविक होते. केवळ पगारवाढ हा मुद्दा जसा आहे तसा कर्मचार्‍यांचे अनेक मुद्दे आहेत. प्रामुख्याने सरकारने शिवशाहीच्या नावाने मागील दाराने खासगीकरण करु घातले आहे. हे एसटीच्या मुळावर आहे. भविष्यात या लाल परीचे खासगीकरण करुन कोणा खासगी उद्योजकांच्या दावणीला हे महामंडळ बांधले जाऊ शकते. आज आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जशी चांगली असणे आवश्यक आहे तसेच माफक दरात ती पुरविली गेली पाहिजे. खासगीकरण करुन याला हरताळच फासला जाणार आहे. कर्मचार्‍यांनाही चांगले प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. सध्याचा संप मिटला म्हणून एसटीचे सर्व प्रश्‍न संपलेले नाहीत. अजूनही न सुटलेले प्रश्‍न सोडविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने कधी पावले टाकली जाणार याला महत्व आहे.
---------------------------------------------------------------------

0 Response to "स्वागत वरुण राजाचे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel