-->
अस्वस्थ सीमा /  विद्यार्थांचा बदलता कल

अस्वस्थ सीमा / विद्यार्थांचा बदलता कल

मंगळवार दि. 19 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अस्वस्थ सीमा
ईदच्या दिवशी पाकिस्तानी सीमेवरील भागात तसेच काश्मीरमधील झालेल्या हिंसाचाराच्या घटना मनाला वेदना देणार्‍या आहेत. रमझानच्या महिन्याच्या काळात भारतीय लष्कराला सौजन्याचा एक भाग म्हणून सीमेवरील भागात गोळीबार न करण्याचे आदेश भारत सरकारने दिले होते. परंतु सीमेपलिकडून त्याला योग्य प्रतिसाद काही मिळाला नाही. पाकिस्तान आपल्या सैनिकांवर रमझानच्या पवित्र महिन्यातही गोळीबार करीतच होता. त्यात आपले बरेच जवान धारातीर्थी पडले. काश्मीरमध्ये तर ईदच्या दिवशी झालेला हिंसाचार पाहता सरकारने आता गप्प बसण्यात अर्थ नाही. गेले महिनाभर पाकिस्तानला संबंध सुधारण्याची आपण एकतर्फी दिलेली संधी स्वागतार्हच होती. परंतु आता छप्पन इंचाची छाती असलेले आपल्याला पंतप्रधान नरेद्र मोदी लाभले आहेत. त्यांनी याकामी पुढाकार घेऊन काही तरी करण्याची गरज आहे. अतिरेक्यांनी पळून नेलेला आपला जवान औरंगजेब याची हाल हाल करुन हत्या करण्यात आली. मात्र औरंगजेब शेवटपर्यंत मातृभूमीचे रक्षण करीत होता. दहशतवाद्यांपुढे त्यांनी शेवटपर्यंत हार पत्करली नाही. शेवटी तो धारातिर्थी पडला. काश्मीरमधील अनेक भागात जो हिंसाचार झाला आहे तो पाहता, तेथे भारतीय सरकार अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्‍न पडावा. अर्थात राज्य सरकारच्या सत्तेतही भाजपाच वाटेकरी आहे, त्यामुळे त्यांनाही यासाठी जबाबदार धरले पाहिजे. कारण राज्यातील शांतता राखणे हे तेथील स्थानिक सरकारचे काम आहे व ते जर आपले कर्त्यव्य पार पाडत नसतील ते सरकार बरखास्त करावे. या घटना पाकिस्तानातून अतिरेकी घुसून करीत आहेत, यात काहीच शंका नाही. सरकारने मोठा गाजावाजा करुन पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याचे जाहीर केले, त्यानंतर पाकिस्तानचे कंबरडेच मोडले असे सांगण्यात आले. नोटाबंदीच्या काळात असेही सांगण्यात आले होते की, यामुळे अतिरेकी कारवाया बंद होतील कारण कारण या नोटा अतिरेक्यांना उपलब्ध होणार नाहीत. परंतु झाले उलटेच. त्यानंतर अतिरेकी कारवाया वाढल्याच आहेत. यात निष्पाप काश्मिरी तरुणांचे व तेथील नागरिकांची फरफट होत आहे. काश्मिरात रोजगार नाही, हाताला काम नाही त्यामुळे हा तरुण नाईलाजास्तव अतिरेक्यांच्या मोहाला बळी पडतोय. राज्य सरकारने तेथील हे मूलभूत प्रश्‍न सोडविण्याची आवश्यकता आहे. केंद्राचा या सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. परंतु येथील राज्य सरकार पूर्णपणे फ्लॉप गेले आहे. सीमेवरील सौजन्य आता संपले आहे. पाकिस्तान देशातर्गत पूर्णपणे पोखरला गेला आहे, अस्वस्थ आहे. यासाठी त्यांना भारताशी शत्रुत्व टिकवायचे आहे. त्यासाठी केवळ लष्करी नव्हे तर राजकीय मार्गानेच हा प्रश्‍न सोडवावा लागणार आहे.
विद्यार्थांचा बदलता कल
दहावीनंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा कल जास्त असल्याचे मुंबई विद्यापीठातील यंदाच्या प्रवेशावरुन दिसले आहे. अर्थात गेले नऊ वर्षे वाणिज्य शाखेत जाणार्‍या मुलांचा कल सर्वाधिक आहे. त्यापूर्वी विज्ञान शाखेकडे सर्वाधिक मुलांचा कल होता. परंतु गेल्या दशकात हा कल बदलला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुंबईचे महत्व गेल्या दशकात एक आर्थिक केंद्र म्हणून वाढले आणि वाणिज्य शाखेशी संबंधीत नोकर्‍या मिळण्याचे तसेच त्यातील स्वयंरोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. एक काळ प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चार दशकात डॉक्टर, इंजिनिअर, वकिल याशिवाय फारशा करिअर आपल्याकडे नव्हत्या. तसेच महाविद्यालयात जाऊन शिकणार्‍यांचे प्रमाणही मर्यादीतच होते. मात्र गेल्या दोन दशकात प्रामुख्याने आर्थिक उदारीकरणाच्या युगापासून हे सर्व कल बदलले. शहरात तसेच ग्रामीण भागातही महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकडे कल वाढला. शहरात नवीन मध्यमवर्गीय उदयास आला. त्याच्याकडे बर्‍या प्रमाणात हातात पैसा खेळू लागला. त्यातच एक किंवा दोन मुले असल्यामुळे उच्चशिक्षण घेण्याकडे कल वाढू लागला. हे गेल्या दोन दशकातील बदल आपल्या शैक्षणिक धोरणात बदल करणारे ठरले. एकेकाळी अभियांत्रिकी शिक्षणाला फार मोठा भाव असे, मात्र गेल्या तीन वर्षात अगदी मोजकेच विद्यार्थी या शाखेकडे वळत आहेत. येथे अनेकदा विदार्थ्यांच्या अपेक्षांचा भंग खासगी अभियांत्रिकी कॉलेजने केला आहे. त्यामुळेही कदाचित अभियांत्रिकी शाखेला मर्यादीत मागणी आहे. अभियांत्रिकी शाखेत आता दहावी नंतर बारावी करुन अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला जाण्याएवजी प्रथम पदविका करुन नंतर पदवीला प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे. यात अभ्यासाचा काळ तेवढाच लागतो व सीईटी पासून मुक्त राहाता येते.कला शाखा ही पूर्वीपासून आपल्याकडे दुर्लक्षीत राहिली आहे. खरे तर या शाखेलाही वाणिज्यसारखी मागणी असणारे अनेक अभ्यासक्रम आहेत. परंतु अजूनही ते दुर्लक्षीत राहिले आहेत. आजही कितीही दहावीला मार्क्स मिळाले व त्या विद्यार्थ्याने कला शाखेत प्रवेश घेतला तर त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. जसे कलेच्या शिक्षणाशी निगडीत नोकरीच्या संधी वाढतील तसे याकडेही पाहाण्याचा दृष्टीकोन बदलेल यात काही शंका नाही. आज वाणिज्य शाखेत भरपूर संधी आहेत, त्यामुळे तेथे शिक्षण घेण्याचा कल वाढणे स्वाभाविकच आहे. आगामी काळात अनेक नवीन संधी तरुणांना उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी जग ही आपली बाजारपेठ आहे हे लक्षात घेऊन शिक्षण घेण्याची गरज आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "अस्वस्थ सीमा / विद्यार्थांचा बदलता कल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel