-->
प्रणबदांनी ठणकावले!

प्रणबदांनी ठणकावले!

शनिवार दि. 09 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
प्रणबदांनी ठणकावले!
माजी राष्ट्रपती व आपली हायात कॉग्रेस पक्षात घालविलेले तसेच कॉग्रेसने पंतप्रधान न केल्याबद्दल मनात सल असलेले प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात केलेले भाषण पाहता त्यांनी नेहरुंचीच लाईन जोमदारपणे मांडली. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम यांची खरी व्याख्या सर्वधर्मसमभाव तसेच सध्याच्या वातावरणात निर्माण झालेली असहिष्णुता यावर आपली मते ठामपणाने मांडून आपले संघाच्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी गेल्या पन्नास वर्षाची आपली राजकीय बांधिलकी आपण सोडलेली नाही, असे दाखवून दिले. खरे तर प्रणबदा संघाच्या व्यासपीठावर बौध्दीक घेण्यासाठी गेल्यावर तेथे राममंदीर व्हावे किंवा हिंदुराष्ट्र ही देशाची गरज आहे, असे बोलणे अपेक्षितच नव्हते. परंतु प्रणब मुखर्जी हे संघाच्या या कार्यक्रमाला जाणार हे समजताच प्रसार माध्यमांनी अशा विनाकारण चर्चा घडविल्या. त्यांच्या या भाषणासंबंधी अजून कॉग्रेसने अधिकृत नाराजी व्यक्त केली नसली तरीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रणबदांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतु राष्ट्रपती झाल्यावर व निवृत्त झाल्यावरही प्रणबदा हे कॉग्रेसचे अधिकृत सदस्य नाहीत. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून त्यांनी कोणत्या व्यासपीठावर जावे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. तेथे जाऊन ते कोणता विचार मांडतात, हे महत्वाचे होते. प्रणब मुखर्जी हे कट्टर नेहरु व इंदिरावादी म्हणून ओळखले जातात. संघाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी अर्ध्या तासात जेवढे नेहरुंचे विचार मांडता येतील तेे ठणकावून मांडले. त्याबद्दल कॉग्रेसने खरे तर त्यांचे आभारच मानले पाहिजेत. या निमित्ताने संघाकडून विरोधकांना आमंत्रित करुन आपण संघाव्यतिरिक्त अन्य विचार एैकण्याची कशी संधी देतो, याचे उद्त्तीकरण केले आहे. एक लक्षात ठेवले पाहिजे की, संघाच्या प्रशिक्षिकांपुढे अन्य कोणताही विचार मांडला तरी त्यांच्या मनात जो संघाचा विचार घर करुन बसविला जातो तो काही निघणारा नाही. प्रणबदा जसे संघाचे होऊ शकत नाहीत, तसेच संघाचे लोक प्रणबदांचे विचार एैकून त्या विचारांचा स्वीकार करतील असे अजिबात नाही. त्यामुळे संघाकडून आपण कसे उदार होऊन इतरांच्या विचारांना स्थान देतो हे जनतेला दाखविणे ठीक आहे. परंतु संघांची रचना व तिचे कामकाज कसे चालते हे पाहिल्यास संघ कधीच दुसर्‍या विचारांना थारा देत नाही. कॉग्रेस हा पक्ष काही कॅडरबेस नाही, ती एक विचारधारा आहे असे म्हणता येईल. काँग्रसला वेळोवेळी लाभलेल्या नेतृत्वाने कधी डावीकडे तर समतोल साधत तर कधी काळाची गरज ओळखून उदारीकरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. एखाद्या अथांग सागराप्रमाणे कॉग्रेसचे स्वरुप आहे. या समुद्रात सत्तेच्या राजकारमात पोहत राहाणे अनेक आहेत. कॉग्रेसकडेे नेहरुवादाचे राजकारण करणारेे नेते आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिले आहेत. असे असले तरी कॉग्रेसने कधीही उजवे प्रतिगामी धोरण, एकाच धर्माचा पुरस्कार करणारे धोरण अवलंबिले नाही, ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे. प्रणब मुखर्जी हे कॉग्रेसमधील नेहरुंचा विचार आत्मसात केलेल्या नेत्यांमधले गणले जातात. तयंचे आजचे भाषण हे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या नेहरुंच्या पुस्तकाचे सार होते. मुखर्जी भारताच्या इतिहासाबद्दल बोलले. त्यांच्या भाषणात पाच हजार वर्षांचा संदर्भ आला. भारतीय राष्ट्रवादाबद्दल तर त्यांनी नेहरूंच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. रविद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींचाही उल्लेख केला. संघ स्वयंसेवकांनी ज्या गांधी आणि नेहरूंचा आयुष्यभर द्वेष केला (आजही करतात) त्यांच्यासमोर या दोघांचा आधार घेत प्रणबदा बोलल्यामुळे स्वयंसेवक निश्‍चितच अस्वस्थ व बावचळलेही असावेत. लोकशाही ही संवादावर उभी असते. प्रत्येक विचारांच्या लोकांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संघ आपल्याला आवडो न आवडो, भारतातल्या एका वर्गाला ती आपली संघटना आपलीशी वाटतेे. अशा स्थितीत संघांचे विचार एैकून घेण्यात काहीच चुकीचे नाही. त्यांचा मुकाबला हा वैचारिक पातळीवर झाला पाहिजे. हुरियत, बोडो स्वतंत्रतावाद्यांशी आपण बोलतो, नक्षलवाद्यांना चर्चेचे आमंत्रण देतो तसे संघाशीही आपण बोलले पाहिजे. सध्या भाजपा सत्तेत आल्यामुळे संघाचे महत्व वाढले आहे. परंतु सध्या अनेक हत्यांच्या घटनांमध्ये हिंदुत्ववादी व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या संघाशी संबंधीत कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. तर अनेकदा पुरावे ढिले करुन संघाशी संबंधीतांना खटल्यातून सुटल्याचेही आपल्याला दिसते. यातून कोणताही गुन्हा केला तरी आपले कोणी वाकडे करु शकत नाही अशीच भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंबंधी बोलताना प्रणबदांनी भारतात हिंसा वाढीला लागली आहे आणि ती परस्पर अविश्‍वास आणि अज्ञान यातून येतो आहे, असे केलेले विधान महत्वाचे ठरते. यावेळी संघाने आपली प्रथा बाजुला सारुन प्रणबदांना शेवटी बोलण्याची संधी दिली. त्यापूर्वी सरसंघचालक भागवत यांनी केलेले संघाविषयाची भाषण हे थोडे व्यापक वाटले. संघाने आपली व्याप्ती वाढविण्यासाठी, केवळ हिंदुत्वाची भूमिका न घेता संपूर्ण समाजाचा विचार करण्यास सुरुवात केली तर नसावी अशीही शंका यातून येते. त्याचबरोबर हेगडेवार हे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे सांगितले, खरे तर हे सांगण्याची संघाला आवश्यकता का वाटते, असा प्रश्‍न पडतो. एकभाषा, एक धर्म म्हणजे राष्ट्रवाद नव्हे. एक राष्ट्रध्वज, भारतीय म्हणून असणारी ओळख आणि कोणाशीही शत्रुत्व नाही या तत्त्वांवर सात प्रमुख धर्मांचा समावेश असलेली 130 कोटी जनता वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर गुण्यागोविंदाने नांदते तोच खरा राष्ट्रवाद आहे, असे परखड मत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. प्रणबदांनी व्यक्त केलेले हे मत त्यांच्या वैचारिक परंपरेला धरुनच आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "प्रणबदांनी ठणकावले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel