-->
भाजपासाठी धोक्याची घंटा

भाजपासाठी धोक्याची घंटा

सोमवार दि. 04 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपासाठी धोक्याची घंटा
नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांवरून राजकारणाची पुढली वाटचाल निश्‍चित करणे अवघड असले तरी नरेंद्र मोदी यांचा करिष्मा किंवा त्यांच्या नावावर उठणारी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे, असे आपण शंभर टक्के म्हणू शकतो. चार वर्षापूर्वी नरेंद्र मोदी नावाचे एक वादळ देशात उठले होते. परंतु या वादळाने लोकांचा विश्‍वास आता गमावला आहे. मोदी भक्त अशी संकल्पना मोठ्या दिमाखाने मिरविणारी एक देशात टोळीच होती. या टोळीला मोदींविषयी जसे वैयक्तीक आकर्षण होते तसेच देशात काही तरी नवे घडेल असे ठाम वाटत होते. मात्र आता या टोळीला सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांला तोंड देताना नाकी नऊ आले आहेत. मोदींनी विकासासाठी जनतेकडे कौल मागितला होता. मात्र सत्तेवर येताच त्यांनी विकासाला एक कोपर्‍यात टाकले आणि आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. गेल्या चार वर्षात वाढलेली महागाई, बेकार्‍यांच्या ताफ्यात वाढलेली संख्या, काळ्यापैसा कढण्याचे फसलेले आश्‍वासन या सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार फेल गेले आहे. विकासापेक्षा स्थानिक पातळीवरील जाती-धर्म-पंथ यांच्या अस्मिता या विषयांवर सरकारने जास्त लक्ष पुरविलेले दिसते आहे. उत्तर प्रदेशात ही बाब अधिक स्पष्टपणे समोर आली आहे. पोटनिवडणुकांतून दिसलेली दुसरी बाब म्हणजे भाजप मुख्यमंत्र्यांचा प्रभावही कमी होत चालला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच पराभव झाला. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांनी निदान पालघरमध्ये तरी भाजपची लाज राखली. आदित्यनाथ यांचे अपयश बोचरे आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:चा मतदारसंघ राखता आला नाही. उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही निसटला आणि आता पुन्हा सणसणीत पराभव झाला. कर्नाटकाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधक एकत्र आले तर भाजपा सरकारचा निभाव लागणे कठीण आहे, हे सिद्द झाले. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना, बहुजन विकास आघाडी, कॉग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची मते विभागली गेली नसती तर भाजपाचा पराभव नक्की होता. परंतु विरोधकांची मोटी अजून तेवढी प्रभावीपणे उभी राहात नाही. भाजपासाठी बिहारमध्ये पराभव झाल्यावर उत्तरप्रदेश ही त्यांच्यासाठी हिंदुत्वाची मोठी प्रयोगशाळा होती. तेथे विधानसभेत विजय मिळाल्यावर वर्षाच्या आत पोट निवडणुकीत लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी आदित्यनाथांचा पराभव झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी आदित्यनाथांचे नाव जाहीर झाले तेव्हा तो मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले गेले होते. पण योगींच्या वर्षभराच्या कारभारावर उत्तर प्रदेशाची जनता खुश नाही. त्यातही गंभीर बाब म्हणजे आदित्यनाथ यांनी हिंदू-मुस्लिम मतदारांमध्ये ध्रुवीकरण केल्याचा आरोप वारंवार होत आहे. हे ध्रुवीकरण फसले. मुस्लिम मतदार भाजपपासून दुरावले आहेत. ही मानसिकता पोटनिवडणुकांपुरती मर्यादित राहणार नाही. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवरही पडेल. समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्ष यांची आघाडी संपूर्ण उत्तर प्रदेशात होऊ शकणार नाही, त्यात अनेक अडथळे येतील व त्याचा फायदा भाजपला होईल, अशी गाजरे खाल्ली जात आहेत. दोन्ही पक्षांचे स्वार्थ लक्षात घेता पक्की आघाडी होणे कठीण आहे हे खरे. पण उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांचे पूर्ण ध्रुवीकरण झाले तर त्याचा जोरदार फटका भाजपला बसेल. ही परिस्थिती बदलण्याइतका वेळही आता भाजपकडे नाही. परंतु आता मायावती व समाजवादी पार्टी पुन्हा एकत्र येणार आहेत, हे कर्नाटकाच्या शपथविधींच्या वेळी दिसले. पालघर निवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक रणनीतीचा विजय आहे. शिवसेना देखील दुपट्टी गेम खेळत आहे. एकीकडे भाजपाच्या बरोबरीने सत्तेचा मलिदा खात आहे मात्र बाहेर जनतेच्या समोर विरोधात असल्यासारखी वावरत आहे. त्यामुळे शिवसेनेला फार न दुखावता मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सेनेला तिची जागा दाखवून दिली. पराभवानंतर शिवसेनेने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले व आयुक्तांचीही निवडणूक घ्यावी, अशी हास्यास्पद मागणी केली आहे. फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली तरी उमेदवार आयात करावा लागला. म्हणजे हा विजय निर्भेळ नाही. भंडारा-गोंदियामध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव झाला. भाजपच्या बड्या नेत्यांची धडपड तेथे कामी आली नाही. कामगार, शेतकरी भाजपपासून दूर गेले आहेत आणि मोदी-फडणवीस यांच्या घोषणांवर शेेतकरी आता विश्‍वास ठेवत नाहीत. येथे काँग्रेसने माघार घेऊन राष्ट्रवादीसाठी मतदारसंघ सोडला, त्याचबरोबर कॉग्रेसची मते हस्तांतरीत झाली हा मोठा फायदा होता. उत्तर प्रदेशाप्रमाणेच एकास एक लढत झाली व भाजपचा पराभव झाला. पालघरमध्येही विरोधी पक्षांनी एकच उमेदवार दिला असता तर भाजपचा पराभव निश्‍चित होता. पालघरमध्ये भाजपाला उमेदवार कॉग्रेसकडून आयात करून विजय मिळवावा लागला व गोंदियामध्ये भाजपने आपलाच उमेदवार गमावला व त्याबरोबर जागाही गमावली. महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशापेक्षा फार वेगळे चित्र नाही. 2014च्या निवडणुकीत अन्य पक्षांकडील बरीच मते मोदींनी भाजपकडे खेचली होती. त्यामुळेच लाट आली होती. मते खेचण्याची ही प्रक्रिया आता थांबलेली आहे. लोक मोदींना कंटाळले, असे इतक्यात म्हणता येत नसले तरी नव्याने भाजपकडे आलेल्या मतदारांमध्ये उदासीनता आहे. जो तरुण मोठ्या अपेक्षा ठेऊन भाजपाकडे वळला होता, तो निराशेच्या गर्तेत ढकलला गेला आहे. भाजपने लोकसभेतील दोन व विधानसभेतील एक जागा गमावली. अन्य नऊ जागांवर विजय मिळवता आला नाही. बिहार वगळता अन्य ठिकाणी काँग्रेससह प्रत्येक पक्षाने आपली जागा राखली. भाजपला नवे मतदार मिळत नसल्याचे हा निकाल सांगतो. लोकसभेच्या रणांगणाच्या अगोदर वर्षापूवीची ही स्थिती आहे. भाजपासाठी धोक्याची घंटा सुरु झाली आहे, हे नक्की.
------------------------------------------------

0 Response to "भाजपासाठी धोक्याची घंटा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel