-->
ऐतिहासिक घटना /  हिंदुत्ववाद्यांची हिट लिस्ट

ऐतिहासिक घटना / हिंदुत्ववाद्यांची हिट लिस्ट

शनिवार दि. 16 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
ऐतिहासिक घटना
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील सिंगापूर येथे झालेल्या शिखर परिषदेत या दोघा नेत्यांनी परस्परांशी हस्तांदोलन केले ही एक दशकातील एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी गेल्या 70 वर्षात कधीच परस्परांशी संबंध स्थापित केले नव्हते त्या देशांच्या प्रमुखांनी हस्तांदोलन करणे म्हणजे हे एक आश्‍चर्यच ठरावे. परंतु ही घटना सत्यात उतरली आहे. अमेरिका हा भांडवलशाही देश व उत्तर कोरिया हा कम्युनिस्ट देश. या दोघांची विचारसारणी भिन्न, ध्येय धोरणे भिन्न परंतु असे असले तरी जागतिक पातळीवर शांततेसाठी या नेत्यांनी एकत्र यावे ही सकारात्मक बाजू  ठरावी. या दोन्ही नेत्यांच्या परस्परांच्या चेहर्‍यावरील भाव अतिशय सकारात्मक असल्याचे जागतिक पातलीवर बोलले गेले. त्यामुळे भविष्यात या दोन देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील अशी आशा करता येईल. उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत, असा अमेरिकेचा दबाव हा कित्येक वर्षे सुरू होता. 2000 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिटंन यांनी आपली सर्व राजकीय शिष्टाई पणाला लावत उत्तर कोरियाला चर्चेस आणण्याचे प्रयत्न केले होते, पण त्यात त्यांना यश आले नाही.जर उत्तर कोरिया आपले ऐकत नसेल तर त्या देशावर लष्करी कारवाई करावी, असाही दबाव क्लिटंन यांच्यावर टाकला जात होता. पण क्लिटंन यांनी वाटाघाटीचा मार्ग पत्करला होता. त्यांच्यानंतर सत्तेवर आलेले रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश यांनी सहा देशांच्या मदतीने उत्तर कोरियाशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू केला असता उत्तर कोरियाने उद्दतपणे एक अणुचाचणी करुन बुश यांचे प्रयत्न उधळून लावले होते. ओबामा यांच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे जगात सहमतीचे, शांतता प्रस्थापित करणारे होते. त्यांनी इराण, क्युबा यांच्याशी जुळवून घेतले. पश्‍चिम आशियात तालिबान, अल-कायदा या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले. मात्र ओबामा उत्तर कोरियाला वेसण घालण्याबाबत फारसे आग्रही नव्हते. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत दोन्ही देशांमध्ये युद्धखोर भाषा सुरू झाली. परस्परांवर अण्वस्त्रे डागण्याच्या धमक्या सुरू झाल्या. यामुळे पुन्हा एकदा जग अस्थिरतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपते की काय असे वाटू लागले होते.त्यामुळे परिस्थिती चिघळली होती. मात्र एकाएकी उ. कोरिया नरम पडू लागला. उत्तर कोरिया त्यांची सर्व अण्वस्त्रे नष्ट करत असेल, शेजारी देश दक्षिण कोरिया, जपान यांच्याशी शांतता प्रस्थापित करत असेल तर या देशाशी अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण जग सबंध ठेवण्यास तयार होईल, असे स्पष्ट केल्याने वातावरण निवळत गेले. या बैठकीनंतर लगेचच उत्तर कोरिया अणवस्त्र मुक्त होईल असे नाही, निदान त्यादृष्टीने पावले पडू लागली आहेत. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने दक्षिण कोरियातले आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी कवायतीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घटना निश्‍चितच सकारात्मक म्हटले गेले पाहिजे.
हिंदुत्ववाद्यांची हिट लिस्ट
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित मारेकर्‍यांच्या हिटलिस्टवर दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्यासहीत आणखी काही नामवंतही होते. ही धक्कादायक माहिती तपास अधिकार्‍यांच्या हाती लागली आहे. गिरीश कर्नाड यांच्याबरोबरच साहित्यिक बी. टी. ललिता नाईक, निदुमामिदी मठाचे स्वामी वीरभद्र चन्नमल्ला, पुरोगामी विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांच्यावरसुद्धा त्या आरोपींचा निशाणा होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने पराशुराम वाघमारे, के. टी. नवीन ऊर्फ होटे मांजा, अमोल काळे, मनोहर येडवे, सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण, अमित देगवेकर या सहा जणांना अटक केलेली आहे. लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने एका विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या मारेकर्‍यांच्या हालचालीच्या कैद झाल्या होत्या. मारेकर्‍यांना दोनवेळा गौरी लंकेश यांच्या घराची रेकी देखील केली होती, असे सीसीटीव्हीत दिसले होते. दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 वाजता हल्लेखोरांनी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती त्यानंतर रात्री 8 वाजता लंकेश घरी आल्यावर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला होता. अशाच प्रकारच्या हत्या या पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या झाल्या आहेत. यांचे मारेकरी हे देखील हिंदुत्ववादीच आहेत, मात्र त्यांना पकडण्याची तत्परता दाखविण्यात आलेली नाही. अशा प्रकारे हिंदुत्ववाद्यांनी हिट लिस्ट तयार करणे व हत्या करणे हे हिंदुत्वाच्या कोणत्या संस्कृतीत बसते? पोलीस देखील या हत्यार्‍यांच्या बाबतीत हतबल ठरले आहेत, हे आणखी एक मोठे दुदैव म्हणायचे. एकूणच सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "ऐतिहासिक घटना / हिंदुत्ववाद्यांची हिट लिस्ट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel