-->
मोदीजी उत्तर द्या! / इफ्तारच्या निमित्ताने...

मोदीजी उत्तर द्या! / इफ्तारच्या निमित्ताने...

शुक्रवार दि. 15 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मोदीजी उत्तर द्या!
कॉग्रसेचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यात नरेंद्र मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राहूल गांधी यांनी प्रामुख्याने मोदी सरकारवर टीका करताना सरकार भांडवलदारांना कसे पाठीशी घालत आहे, व त्यामागची कारणे विषद केली. मोदींचे सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी करण्याऐवजी देशातील 15 उद्योगपतींना अडीज हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हेच उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्केटिंग करीत आहेत. राहूल गांधी यांनी केलेली ही टीका गंभीर असून नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले पाहिजे. यातून त्यांची साफ नियत कशी आहे हे समजू शकेल. कारण सत्तेत आल्यापासून नरेंद्रभाई यांनी प्रेसशी बोलणे तसेच विरोधकांच्या आरोपाला उत्तर देण्याचेही टाळले आहे. अर्थात हेच मोदी डॉ. मनमोहनसिंग गप्प बसतात म्हणून त्यांच्यावर टीका करीत होते. परंतु मुळातच डॉ. मनमोहनसिंग यांचा स्वभाव सातत्याने बडबड करणारा नाही. ते आवश्यक तेवढेच बोलतात असा अनुभव आहे, असो. राहूल गांधी यांनी आपल्या मुंबईसह महाराष्ट्रातील भेटीत आपली आक्रमकता दाखवून दिली आहे. गेल्या चार वर्षात गांधी यांच्या बोलण्यात आमुलाग्र बदल झालेला दिसतो. एक परिपक्व नेता म्हणून ते पुढे येऊ लागले आहेत. याचीच भीती भाजपाला सातत्याने वाटत होती. यासाठीच ते राहूल गांधी यांना पप्पू संबोधून त्यांची हेटाळणी करुन कसे खच्चीकरण करता येईल ते पाहत होते. परंतु अशा प्रकारे एखाद्या नेत्याची हेटाळमी करुन फार काळ सत्ता गाजविता येत नाही. शेवटी आता सत्ता राबवित असताना लोकांना प्रश्‍नांची उत्तरे द्यायला तुम्ही बांधील आहात हे भाजपाने लक्षात ठेेवले पाहिजे. चंद्रपूरच्या सभेत राहूल गांधी यांनी कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या निधनाच्या निमित्ताने कुटुंबियांचे सांत्वन त्यांनी केले. एक वर्षात मनरेगावर सरकार 35 हजार कोटी रुपये खर्च करते. तेवढेच पैसे निरव मोदी देशातून घेऊन पळाला आहे, त्यावर सरकारने काय केले असा त्यांनी केलेला सवाल ही योग्यच आहे. तेथे बोलताना त्यांनी मी खोटी आश्‍वासने देणारा राजकारणी नाही असे सांगतांना सांगितले की, मी तुम्हाला 15 लाख रुपये देणाचे आश्‍वासन देणार नाही, तुम्हाला योग्य न्याय मिळवून देईन असे सांगावयस आलो आहे, असे त्यांनी सांगताच श्रोतृवंदांने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. राहूल गांधी यांनी आता आपला डाव टाकला आहे, आता मोदींनी त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणे हे तयंचे काम आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांची नियत साफ नाही हेच स्पष्ट होईल.
इफ्तारच्या निमित्ताने...
कॉग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीत अध्यक्ष राहूल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने विरोधकांची एकजूट पहावयास मिळाली. या पार्टीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. यासाठी दोन कारणे होती, एक म्हणजे या पार्टीस कोण उपस्थित राहातो व दुसरे म्हणजे नुकतेच संघाच्या व्यासपीठावरुन जाऊन आलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी उपस्थित राहातात किंवा नाही. यासंबंधी अशीही चर्चा होती की, मुखर्जी यांना आमंत्रण देण्यात येणार नाही. परंतु या सर्वच अफवा ठरल्या. मुखर्जी या पार्टीस उपस्थित राहिल्याने अनेकांचे अंदाज चुकले. उलट राहूल व मुखर्जी हे अतिशय खुल्या मनाने बोलत असलेली छायाचित्रे प्रसिद्द झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन पंडीत नेहरुंची मते जोरदारपणे मांडल्याने अनेकांची हवा निघून गेली होती, तसेच याबाबतीत मुखर्जींवर टीका करणार्‍यांनाचाही आवाज बंद झाला होता. इफ्तार पार्टी हे एक विरोधकांना एकत्र करण्यासाठी कॉग्रेसकडे निमित्त होते. कॉग्रेसचा हा प्रयोग चांगलाच सफल झाला आहे. कारण काँग्रेसच्या गोटातील जवळजवळ सर्वच पक्षांनी यासाठी उपस्थित होते. मार्क्सवादी नेते सिताराम येचुरी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, शरद यादव, जनता दल युनायटेडचे दनिश अली, तृणमूलचे दिनेश तिवारी, राष्ट्रवादीचे डी.पी. त्रिपाठी त्याचबरोबर बसपा, राजद व झारखंड मुक्ती मोर्चा यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने इफ्तारच्या निमित्ताने विरोधकांची मांदीयाळी होती. अर्थात सर्वच पक्षांचे पहिल्या क्रमांकाचे नेते नसले तरी त्यांनी दुसर्‍या फळीतील नेते पाठवून आपण विरोधकांच्या एकजुटीत आहोत हे दाखवून दिले. केंद्रातील सरकारचे आता शेवटचे वर्ष राहिले असून केंद्रातून मोदी सरकारची हकालपट्टी करण्यासाठी कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली कंबर कसली जात आहे. आपण स्वबळावर ही निवडणूक जिंकू शकत नाही हे काँग्रेसने वास्तव मान्य केले असून सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कर्नाटकातील निवडणूक ही त्याचीच एक उत्तम प्रयोगशाळा झाली. आगामी काळात राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका या कॉग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. कारण त्यापाठोपाठ लगेचच लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने इफ्तारचे निमित्त करुन विरोधकांना एकत्र आणण्याचा कॉग्रेसचा प्रयोग यशस्वी झाला आहे, असे म्हणता येईल.
-----------------------------------------------------------

0 Response to "मोदीजी उत्तर द्या! / इफ्तारच्या निमित्ताने..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel