-->
पंतप्रधान की मार्केटिंग मॅनेजर?

पंतप्रधान की मार्केटिंग मॅनेजर?

मंगळवार दि. 05 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पंतप्रधान की मार्केटिंग मॅनेजर?
नरेंद्रभाई मोदी हे खरोखरीच आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत की, अंबांनी-अदानी या मोठ्या उद्योगसमूहाचे मार्केटिंग मॅनेजर आहेत? असा प्रश्‍न पडावा अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या चार वर्षात मोदींनी या दोन्ही समूहांवर एवढ्या सवलतींची बरसात केली आहे की, ते फक्त या दोन समूहांचाच विचार सातत्याने करतात की काय असा प्रश्‍न पडावा. विदेशात ज्या वेळी पंतप्रधान जातात तेथे दरवेळी अदानी किंवा अंबानी यांच्या फायद्याचा एखादा तरी निर्णय घेतला जातोच. याची अनेक उदाहरणे देता येतील. नुकत्याच झालेल्या मोदींच्या रशिया दौर्‍यात अंबानींच्या रिलायन्स उद्योगसमूहाने रशियन शस्त्रास्त्र कंपनीशी सहा अब्ज डॉलरचा सहकार्य करार केला. मोदींच्या फ्रान्स दौर्‍यात अनिल अंबांनी यांच्या कंपनीने डुसॉल्ट कंपनीशी सहकार्य करार केला. याच दौर्‍यात राफेलचे लढाऊ विमानाचा करार रद्द करण्यात आला होता. मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अदानींच्या तेथील कोळशाच्या खाणीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. नरेंद्रभाईंच्या बांगला देशाच्या दौर्‍यात अदानी, आर. पॉवर व पेट्रोनेट यांचा सहकार्य करार झाला. अमेरिकेच्या दौर्‍यात तर मोदींच्या साक्षीने रिलायन्स डिफेन्स या रिलायन्स समूहातील कंपनीने अमेरिकन नेव्हीशी युध्दनौका दुरुस्तीच्या करारावर सह्या केल्या होत्या. या करारामुळे रिलायन्स डिफेन्स या कंपनीला येत्या तीन ते पाच वर्षात सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल करता येईल. मोदींच्या इस्त्रायल दौर्‍यात तर अदानींच्या एका कंपनीने इस्त्राय्ली कंपनीशी सहकार्य करार केला होता. यातील सर्वच बाबी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या. मोदींच्या विदेशी दौर्‍यात झालेल्या अशा अनेक बाबी आता उघड होऊ लागल्या आहेत. यातील अनेक बाबी जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत कारण प्रसार माध्यमांनी याबाबत पध्दतशीररित्या मौन बाळगले आहे. वरील डील पाहता पंतप्रधानांचे विदेश दौरे हे देशाच्या हिताचे आहेत की, अदानी-अंबानींच्या उद्योगव्यवसायांची क्षितीजे विस्तारण्यासठी आहेत, असा प्रश्‍न पडावा. आपल्या देशातील उद्योजकांनी विदेशात जाऊन आपला उद्योग व्यवसाय करावा यात काही गैर नाही. उलट आपल्या देशातल्या कंपन्या आता बहुराष्ट्रीय होत आहेत ही बाब गौरवास्पदच म्हटली पाहिजे. परंतु विदेश दौर्‍यात फक्त अदानी-अंबानी याच समूहाचे हित का जपले जाते? दरवेळी या उद्योगांच्या विदेशी विस्तारासाठी पंतप्रधानांच्या विदेशी दौर्‍याची शिडीच का वापरली जाते? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. आजवर गेल्या 48 महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 64 देशांचे दौरे केले. यातून देशाला नेमका कोणता लाभ झाला? पंतप्रधानांनी या दौर्‍यातून किती विदेशी गुंतवणूक भारतात आली? कारण जर खरोखरीच विदेशी गुंतवणूक या दौर्‍यातून आली असेल तर त्याचा देशाला निश्‍चित लाभ झाला असता. त्यातून उद्योग उभे राहून रोजगार निर्मीती झाली असती. परंतु तसे काही झालेले दिसत नाही. केवळ गप्पाच होत आहेत. विदेशी गुंतवणूक ही उत्पादन क्षेत्रात येण्याऐवजी शेअर बाजारात सट्टा खेळण्यासाठी येत आहे. याचा सर्वसामान्य जनतेला काय फायदा? गौतम अदानी यांचे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे असलेले मित्रत्वाचे संबंध हे काही लपून राहिलेले नाहीत. त्यांच्या या मैत्रीमुळेच अदानी नावाचा लहान उद्योजक 1995 नंतर वाढत जाऊन आता त्यांच्या समूहाचा देशव्यापी डेरेदार वृक्ष झाला आहे. यामागे मोदींचाच आशिर्वाद आहे हे काही सत्य लपलेले नाही. गुजरातच्या दंगलीमागे असलेल्या अर्थकारणाचे सुत्रधार हे अदानीच होते हे ही उघडपणे बोलले जाते. त्यानंतर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचारासाठी निधी पुरविण्यातही अदानींचा मोठा वाटा होता. नरेंद्रभाईंना या प्रचारासाठी एक खास विमान अदानींनी तैनात ठेवले होते. एवढेच कशाला आपल्या पंतप्रधान महाशयांनी सर्व संकेत मोडून पंतप्रधान झाल्यावरसुध्दा अडाणींचेच विमान वापरले होते. खरे तर पंतप्रधानांसाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था आहे, असे असतानाही त्यांनी प्रदीर्घ काळ अदानींचेच विमान वापरले होते. अदानी यांनी वेळोवेळी केलेल्या या मदतीची परतफेड करण्यासाठीच मोदी यांनी अदानींना सढळहस्ते मदत केली आहे. आजवर जगभरात केवळ अदानी समूहासाठी मोदींनी आपल्या दौर्‍यात सुमारे 22 अब्ज डॉलरचे करार केले आहेत. ऑस्ट्रेलियात खाणी खरेदी करण्यापासून ते चीनमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत सर्वच पातळीवर अदानींना मदत करण्यात आली आहे. त्याशिवाय गुजरातमध्ये प्रकल्पांसाठी सर्वात स्वस्तात जागा अदानींने काबीज केल्या आहेत. मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्या आठच महिन्यात अदानींची मालमत्ता चार अब्ज डॉलरने वाढली होती. केवळ आ आकडेवारीवरुन आपली छाती दडपू शकते. सर्वसामान्य माणसे सरकारी पातळीवरुन चाललेल्या या घडामोडींचा विचारही करु शकत नाहीत. आज सरकार ठरावीक दोन समूहांना प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे देशातील 70 टक्के जनता एकवेळ जेवून आपला दिवस ढकलते. एवढे भयानक वास्तव आपल्याकडे आहे. काळा पैसा हुडगून काढणार व त्या पैशाचे वाटप करुन प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार यापासून देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मीती, स्वस्ताई अशी अनेक आश्‍वासने मोदी सरकारने जनतेला देऊन त्यांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे. प्रत्यक्षात आज मोदी हे अंबानी-अदानी या गुजरातमधील उद्योजकांचे मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम पहात आहेत असेच दिसते. हे वास्तव जनतेपर्यंत पोहचू नये यासाठी प्रसार माध्यमांना आपल्या खिशात टाकले आहे. परंतु वास्तव हे लपून राहात नाही, हे नरेंद्रभाई मोदी यांनी लक्षात ठेवावे.
-----------------------------------------------------------   

0 Response to "पंतप्रधान की मार्केटिंग मॅनेजर?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel