-->
महामार्गाचे रडगाणे /  इन्फोसिसचा रौप्यमहोत्सव

महामार्गाचे रडगाणे / इन्फोसिसचा रौप्यमहोत्सव

सोमवार दि. 18 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
महामार्गाचे रडगाणे
मुंबई-गोवा महामार्गाचे रडगाणे दरवर्षी प्रमाणे यंदाही तसेच सुरु आहे. यंदा किमान अर्धा रस्ता तरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे. यंदा देखील गणपतीसाठी जाणार्‍या चाकरमन्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागणार हे स्पष्ट आहे. यंदा तर पहिल्याच पावसात चौपदरीकरणाची माती रस्त्यावर आली आणि वाहनचालक रस्त्याचा शोध घेऊ लागला. यातून सर्वात मोठा धोका वाढणार्‍या अपघातांचा आहे. आता तरी नुसताच पहिलाच पाऊस पडला आहे. एकदा दर धो-धो पाऊस सुरु झाला तर त्या रस्त्याची काय हालत होईल याचे वर्णन करणे कठीण आहे. मुंबईपासून सुरु होणार्‍या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर येथे अजूनही काही ठिकाणी जमिनी ताब्यात घेण्यचे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे वडखळ पर्यंतचा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. काही भागात हे चौपदरीकरण झाले आहे, परंतु रस्ता पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात वाहानांच्या अपघातांचा धोका वाढला आहे. खरे तर जमिनी ताब्यात घेणे, त्यासंबंधी शेतकर्‍यांच्या ज्या तक्रारी असतील त्याचे तातडीने निवारण करमे हे सरकारी यंत्रणेचे काम आहे. त्यानंतरही कंत्राटदाराने कामास विलंब केला तर त्याला जबाबदार धरले पाहिजे. परंतु पहिल्या टप्प्यातील जमीनींचे हस्तांतरणच झालेले नसल्याने कंत्राटदार तरी काय करणार? मुंबई-गोवा महामार्ग वेळे व्हावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या लक्ष्यानुसार पुढील वर्षाच्या अखेरपर्ंयत हा रस्ता पूर्ण व्हावयास हवा. फक्त कशेडी घाटातील घाटाचे काम अपूर्ण राहिल. परंतु ज्या गतीने गडकरी प्रयत्न करीत आहेत, त्या गतीने सरकारी यंत्रणा काही हलत नाही असेच दिसते. सध्या ज्यावेळी पाऊस नसेल त्यावेळी जेवढे काम करणे शक्य आहे, निदान रस्त्याची माती बाजूला सारण्याची आवश्यकता आहे. आज ही अवस्था असेल तर गणेशोत्सवाच्या काळात काय स्थिती असेल? लाखो मुंबईकर कोकणवासीय बाप्पाच्या उत्सावासाठी उत्साहाने कोकणात येतात. त्यावेळीही अशीच स्थिती राहिली तर अपघात होण्याचीच शक्यता अधिक आहे. सध्यादेखील महामार्गाची जी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होत आहे. मुंबई सोडल्यावर पनवेल, पेण या भागातून वाहन चालविणार्‍यास त्रास सहन करावा लागत आहे. यंदाचा पावसाळा सुद्दा असाच जामार आहे. आता निदान पुढच्या वर्षी तरी पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होईल व चाकरमन्यांचा गणपतीच्या वेळी प्रवास सुखकारक होईल अशी अपेक्षा व्यक्त करुया.
इन्फोसिसचा रौप्यमहोत्सव
आय.टी. उद्योगातील नामवंत कंपनी इन्फोसिस लि.ने आपल्या शेअर बाजारातील नोंदणीचा रौप्यमहोत्सव नुकताच साजरा केला. इन्फोसिस ही कंपनी आपल्या देशातील एक महत्वाची कंपनी विविधदृष्टया आहे. त्यामुळे त्यांच्या रौप्यमहोत्सवाला विशेष महत्व आहे. आय.आय.टी.चे अभियंते नारायणमूर्ती व त्यांच्या सोबत सहा तंत्रज्ञांनी ही कंपनी स्थापन केली. त्यावेळी तर नारायणमूर्तींना दहा हजार रुपये जमा करण्यासाठी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. 90च्या काळातील आय.टी. उद्योगातील कंपनी म्हणजे एक नव्या पिढीतील कंपनीच होती. त्यावेळी नुकता कुठे हा उद्योग झेपावत होता. अनेकांना या उद्योगाच्या भविष्याच्या विस्ताराची कल्पनाही नव्हती. परंतु नारायणमूर्ती व त्यांचे सहकारी या कंपनीबाबत जबरदस्त आशावादी होते. ही कंपनी 25 वर्षापूर्वी शेअर बाजारात नोंद झाली त्यावेळी त्यांची उलाढाल होती 50 लाख रुपये व बंगोलरमधील तिच्या मुख्यालयात केवळ 250 कर्मचारी कामास होते. त्यावेळी कंपनीने भांडवलविक्री दर्शनीमूल्याने करुन केवळ 2.55 कोटी रुपये उभारले होते. यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज ही आय.टी. उद्योगातील एक बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी शेअर बाजारातील बाजारमूल्यामध्ये आघाडीच्या पाच कंपन्यात समाविष्ट आहे. देशातील कंपन्यांमध्ये एक अग्रगण्या कंपनी म्हणून तिचा परिचय आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तिने आज देशातील कॉर्पोरेट क्षेत्रात नवीन पायंडे पाडले. 90च्या दशकात ज्यांच्याकडे भांडवल आहे तेच उद्योजक होऊ शकतात, असे बोलले जाते. मात्र बुध्दीमत्तेच्या जोरावर पैसा कमवून दाखविण्याची किमया इन्फोसिसने करुन दाखविली. कर्मचार्‍यांना कंपनीचे समभाग देऊन त्यांना करोडपती करणारी देशातील हीच पहिली कंपनी ठरली आहे. त्यानंतर अनेक कंपन्यांनी त्याचे अनुकरण केले. या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापनासाठी कोणतीही खास सुविधा नसते. सर्वसामान्य कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्व सुविधा व्यवस्थापनाला मिळतात. देशात खर्‍या अर्थाने कॉर्पोरेट कल्चर आणणारी ही पहिली कंपनी आहे, त्यामुळे तिच्या यशाचा एक वेगळा अर्थ समजला जातो. शेअर बाजारात समभागधारकांना उदार हस्ते बोनस समभाग व लाभांश रुपाने लाभ देणारी कंपनी म्हणून ही ओळखली जाते. त्यामुळे समभागधाराकंच्या गळ्यातील ही नेहमीच ताईत ठरली आहे. ज्यांनी 25 वर्षापूर्वी या कंपनीचे समभाग खरेदी केले व आजपर्यंत ठेवले ते समभागधारक करोडो रुपयांचे धनी झाले आहेत. इन्फोसिसने गेल्या 25 वर्षात केलेली वाटचाल ही नेत्रदिपक ठरावी अशीच आहे.
--------------------------------------------------   

0 Response to "महामार्गाचे रडगाणे / इन्फोसिसचा रौप्यमहोत्सव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel