-->
सुखकारक घटना

सुखकारक घटना

गुरुवार दि. 19 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सुखकारक घटना
सध्या बलात्कारापासून ते शेतकर्‍यांच्या आत्महत्येपर्यंत अनेक दुख:त घटना सातत्याने आपल्यावर सतत आदळत असताना यंदा पाऊस चांगला पडणार असा अहवाल हवामान खात्याने दिल्याने ही सुखकारक घटना म्हटली पाहिजे. सध्या उन्हाने सर्वांच्याच अंगाची लाही-लाही झाली असताना जनतेचे डोळे पावसाकडे लागले आहेत. यंदा तरी पाऊस चांगला असावा अशी प्रत्येक जण अपेक्षा करीत आहे. गेल्या वर्षी पाऊस समाधानकारक झाला होता, त्यानुसारच यंदा पाऊस समाधानकारक पडावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अजून पावसाला सुरु व्हायला, किमान दीड महिना आहे. हवामान खात्याने आपल्या पहिल्या अंदाजात तरी चांगली बातमी दिली आहे. सरासरीच्या 97 टक्के मान्सून होणार, असा अंदाज हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसेच देशावर यंदा दुष्काळाचे सावटही नसल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. केरळात पहिला पाऊस मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आल्यावर महाराष्ट्रात पावसाचे वेध हे खर्‍या अर्थाने जूनच्या दुसर्‍या आठवड्यात लागतात व प्रत्यक्षात जून अखेरीस मुसळधार पावसाला सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू पाऊस वेग गेऊ लागतो. या पावसाविषयीचा प्राथमिक अंदाज दरवर्षी एप्रिलमध्ये भारतीय हवामान खात्याकडून जाहीर होत असतो. पावसाबाबतचा हा प्राथमिक अंदाज दिलासादायक आहे.  पावसाचा हा अंदाज हवामान विभागाकडे असलेल्या गेल्या 50 वर्षांतील नोंदींच्या आधारे काढला जातो. त्यानुसार 89 सें.मी. पाऊस हा सरासरी म्हणून ग्राह्य धरला जातो. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सर्वसाधारणपणे सामान्य गणला जातो. त्यामुळेच यंदा हवामान विभागाने सांगितलेला 97 टक्के पावसाचा अंदाज म्हणजे देशभर चांगला पाऊस होणार असल्याचा संकेत आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही यंदा चांगल्या पावसाचे भाकित वर्तविले आहे. गेल्या वर्षी पावसाळा सुखकारक झाल्याने दुष्काळाच्या झळा तेवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवलेल्या नाहीत. दुष्काळी भाग म्हणून असलेल्या मराठवाडा विदर्भात मात्र चांगला पाऊस पडूनही दुष्काळाचे वातावरण आहेच. अर्थात त्याला आपल्या पाण्याचे गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. कोकणात आपल्याकडे एवढा पाऊस पडूनही ते पाणी समुद्रात वाहून गेल्यने तेथे ही काही भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. अर्थात यासाठी आपले पाणी नियोजन कारणीभूत ठरले आहे. असो. यंदा तरी पावसाळा सुखदायक ठरणारा आहे, त्यामुळे शेतकरी सुखावला असेल, यात काही शंका नाही. त्याअगोदर मात्र दोन वर्षे अल निओच्या प्रभावामुळे पावसावर अनेक मर्यादा आल्या होत्या. अर्थात, गेल्या वर्षी देखील सुरुवातीला अल निओचा प्रभाव असेल, असे बोलले जात होते. मात्र, नंतर हवामान खात्याने हा प्रभाव संपल्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी देखील पावसाच्या पहिल्या अंदाजात पाऊस वेळेत असेल व सरासरीएवढा असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पाऊस चांगला झाला. सरकारी हवामान खात्याचे अंदाज हल्ली बहुतांशी खरे ठरु लागले आहेत. परदेशात हवामान खात्याचे अंदाज सहसा चुकत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे यात त्यांनी फार संशोधन केले आहे. मात्र आपल्याकडे अजूनही या विषयात संशोधन होत नाही. आजही आपम बर्‍याच जुन्या तंत्रांच्या आधारे अंदाज वर्तवित असतो. आता सरकारने यात बदल करुन हवामान खात्यावर खर्च केला पाहिजे व त्यातील संशोधन अधिक मजबूत करावयास हवे. उन्हाळ्याच्या दिवसात यावेळी सरासरीपेक्षा जास्तच उष्मा होता. त्यामुळे मान्सून हा यावेळी वेळेपेक्षा लवकरच येईल, असा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षात उष्मा आपल्याकडे खूप वाढला आहे. याला हवामानात होणारे बदल व पर्यावरणाचा ढासळलेला समतोल ही कारण पर्यावरण क्षेत्रातले जाणकार लोक सांगतात. अर्थात हे खरे आहे किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही परंतु जगात हे सर्वत्रच घडत आहे. महाराष्ट्रात यंदा दरवर्षीप्रमाणे कोकणात चांगला पाऊस अपेक्षित आहे. सरासरीच्या 105 टक्के पाऊस कोकणात पडण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. कोकणात पावसाची नेहमीच चांगली दृष्टी असते. यंदादेखील ही कृपा राहील व कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहतील. पश्‍चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे भाकीत आहे. विदर्भ व मराठवाडा यंदा कोरडा राहणार नाही, ही चांगली बाब म्हटली पाहिजे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाल्यास दुष्काळी वातावरण पुढील वर्षी राहणार नाही. गेल्या वर्षीदेखील समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा तेवढा दुष्काळ जाणवला नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची झळ फारशी लागली नाही. यंदा पाऊस चांगला पडण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने आता कधी एकदा पाऊस सुरु होतो व उष्णता संपुष्टात येऊन समाधान व्यक्त होते, याकडे जनतेचे डोळे लागले आहेत. पुढचे वर्ष हे निवडणुकीचे आहे. त्यामुळे सरकारसाठी कसोटीचा काळ असणार आहे. त्यात चांगला पाऊस पडल्यास निवडणुकीच्या तप्त वातावरणात थोडासा गारवा निर्माण होऊ शकेल.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "सुखकारक घटना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel