-->
त्रिशूळ तुटले!

त्रिशूळ तुटले!

बुधवार दि. 18 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
त्रिशूळ तुटले!
विश्‍व हिंदू परिषद (विहिंप) चे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना अखेर त्यांनी जी संघटना वाढविली त्यातून बाहेर पडावे लागले आहे. अर्थातच त्यांच्या मनाविरुध्द हे झाले आहे. शनिवारी विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत तोगडिया गटाच्या राघव रेड्डी यांना विष्णु सदाशिव कोकजे यांनी पराभवाची धूळ चारली आहे. कोकजे विहिंपचे नवे कार्यकारी अध्यक्ष झाल्याने प्रवीण तोगडिया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. या निकालानंतर तोगडीया यांनी मी विहिंपमध्ये होतो, आता नाही अशी घोषणा त्यांनी केली. विहिंपच्या 52 वर्षांच्या इतिहासात प्रथमच निवडणूक झाली. प्रवीण तोगडिया यांनी गेल्या काही दिवसापासून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. सोबतच ते राम मंदिर, काश्मिरी हिंदू, रोजगार आणि शेतकर्‍यांचे मुद्दे यावरून मोदी सरकारवर सातत्याने टीकेचा हल्ला करीत होते. त्यामुळे नरेंद्र मोदी व संघ परिवार तोगडियांच्या भूमिकेवर नाराज होता. त्यामुळे संघ परिवाराने तोगडियांची उचलबांगडी करण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, तोगडिया याला सातत्याने विरोध करत होते. अखेर आज विहिंपच्या 52 वर्षांच्या इतिहासात कार्यकारी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली व त्यात तोगडिया गटाचे राघव रेड्डी यांचा कोकजे यांनी पराभव केला. संपूर्ण संघ परिवार व मोदी विरोधात गेल्याने तोगडियांचे राज खालसा झाल्याचे मानले जात आहे. कोकजे या 79 वय असेल्या जेष्ठ नेत्याच्या ताब्यात ही संघटना आता देण्यात आली आहे. या वयात कोकजे ही संघटना कशी चालविणार असा प्रश्‍न अनेकांना पडेलही. परंतु संघाला हेच दाखवून द्यायचे होते की, तोगडीया नकोत, त्यांच्या एवजी कोणीही नियुक्त केला जाऊ शकतो. तोगडियांना मोदीविरोध नडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवीण तोगडिया यांनी विहिंपला रामराम केला असून आगामी काळात ते विश्‍व हिंदू परिषदेसारखी पर्यायी संघटना सुरु करणार व संघाच्या या कृत्याला आव्हान देणार हे आता स्पष्ट झाले आहे. यात तोगडीया कितपत यशस्वी होतील ही शंकाच आहे. कारण विश्‍व हिंदू परिषद त्यांनी वाढविली असली तरीही त्याला संघाचा पाठिंबा असल्याने त्यांना बळ लाभले होते. आता त्यांच्या त्रिशूळाला संघाचे बळ लाबणार नाही त्यामुळे ते तुटलेले आहे. आणि हे तुटलेले त्रिशूळ घेऊन तोगडिया फारसे यशस्वी होतील असे दिसत नाही. गेल्या गुजरात निवडणुकीत तोगडिया यांचे नरेंद्र मोदी व भाजपा सरकारशी संबंध एवढे ताणले गेले होते की, त्यांनी काँग्रेसच्या बाजूने आपली ताकद लावली होती, याची उघड चर्चा होती. आता तर त्यांची वस्त्रेच काढून घेतल्यामुळे आगामी काळात ते मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. याचे संकेत त्यांनी ताज्या मुलाखतीत दिले आहेत. मोदी सरकारने जर राम मंदिराचा प्रश्‍न सोडविला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात उतरू. जो जनतेच्या व हिंदूच्या मनातील काम पूर्ण करेल त्याच्यासाठी आम्ही काम करू. भाजपवर हल्लाबोल करताना तोगडिया म्हणाले की, भाजपने बहुमत मिळविल्यानंतर अयोध्यात राम मंदिर बनविण्यासाठी कायदा बनविण्याच्या आपल्या 1989 च्या पालमपूर प्रस्तावावर पलटी मारली आहे. नरेंद्र मोदी व प्रविण तोगडीया हे वयाने एकाच पिढीत असलेले संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते होते. तोगडीया हे पटेल समाजाचे व व्यवसायाने डॉक्टर. आपल्या चांगल्या चाललेल्या डॉक्टरी व्यवसायावर पाणी सोडून ते संघाच्या तालमीत वाढलेले असल्यामुळे समाजकारण करण्यासाठी त्यांनी आपल्या व्य्वसायावर पाणी सोडले. सुरुवातीपासून मोदी व तोगडीया यांचे सुत्र चांगलेच जमले होते. हे दोघे नेते हिंदुत्वाचा वसा घेऊन कार्यरत होते. त्यातील मोदींची राजकीय इर्षा जबरदस्त होती त्यामुळे ते राजकारणात सक्रिय झाले तर जागतिक पातळीवर हिंदुंचे संघटन करण्यासाठी तोगडीयांनी आपले आयुष्य वेचले. या दोघांची गुजरातमध्ये जबरदस्त गट्टी होती, सुरुवातीच्या काळात दोघेही एकाच स्कूटरने प्रवास करीत, असे त्या काळचे गुजरातमधील नेते सांगतात. गुजरातच्या गोध्रा दंगलीनंतर मात्र या दोघांचा दोस्ताना कमी होत गेला. याचे महत्वाचे कारण म्हणजे हे दोघेही नेते सुरुवातीला कडवे हिंदुत्ववादी असले तरीही मोदींना सत्ताकारण करताना आपली भूमिका मवाळ करणे गरजेचे होते. नंतर ज्यावेळी मोदींना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले त्यावेळी त्यांना आपण सर्वसमावेशक असल्याचे दाखवावे लागत होते. याचा परिणाम असा झाला की तोगडिया व मोदींमध्ये दिवास उभी राहत गेली. तोगडिया हे दिवसेंदिंवस जास्तच आक्रमक होऊ लागले होते. त्यांनी तर हिंदू डॉक्टरांनी मुस्लिम रोग्याला तपासू नये एवढी टोकाची भूमिका घेतली होती. त्याचबरोबर हिंदुच्या रक्षणासाठी अनेक सेवा सुरु केल्या होत्या. त्यातून त्यांना अनेक थरातून पाठिंबा मिळाला होता. यातून तोगडीया आक्रमक होत गेले. संघाचे तयंना त्यावेळी पूर्ण पाठिंबा होता. मात्र तोगडिया की मोदी असा विचार करणे भाग पडले त्यावेळी संघाने मोदींच्या पारड्यात माप टाकणे सध्याच्या स्थितीत योग्यच होते. आता संघाने तोगडियंवर फूल्ली मारली आहे. त्यामुळे तोगडीयांची वाटचाल ही एकला चलो रे अशीच असेल. एका कडव्या हिंदुत्ववाद्याची आता संघाची कवचकुंडले काढल्यावर कशी वाटचाल होते ते पहावे लागेल. केडर बेस संघटनेत अशा प्रकारे संघटनेने फूल्ली मारल्यावर काय होते याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. रशियातील कम्युनिस्टांनी स्टालीनवर अशीच फूल्ली मारली होती तर संघाने यापूर्वी बलराज मधोक यांच्यावर अशीच फुल्ली मारली होती. आता तोगडीया यांच्या हातातील त्रिशूळ तुटले आहे, बघायचे पुढे काय होते ते...
----------------------------------------------------------------

0 Response to "त्रिशूळ तुटले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel