-->
भाजपाचा कुंभमेळा

भाजपाचा कुंभमेळा

सोमवार दि. 09 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपाचा कुंभमेळा
केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या 38व्या स्थापना दिनाचे निमित्त साधून मुंबईतील बी.के.सी.मध्ये भव्यअसा महामेळावा आयोजित केला होता. तसे पाहता 38 वा स्थापना दिन हे काही साजरे करण्याचे वर्षे नाही. 35 किंवा 40वा स्थापना दिवस असता व तो साजरा केला तर आपण समजू शकतो. त्यामुळे 38 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी उद्देश काही वेगळा होता हे उघडच आहे. यातील झालेली भाषणे पाहता, हा मेळावा म्हणजे पुढील वर्षी येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी वातावरण र्निमिती करणे तसेच वोरोधकांवर आसूड उगवणे हाच उद्देश होता, हे स्पष्ट झाले. केंद्रातील भाजपाच्या सत्तेला आता तब्बल चार वर्षे पूर्ण झाली आहेत व आता जनतेला ताळेबंद देण्याची वेल जवळ येऊन ठेपली आहे. अशा वेळी जनतेपुढे ताळेबंद मांडण्यासाठी हातात काहीच नाही, अशी स्थिती भाजपाची आहे. केवळ घोषणाबाजी व जाहीरात तंत्र या जिवावर जनतेला फार काळ उल्लू बनविता येत नाही. गेल्या वेळच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून मोदी नाणे चलनात आणले गेले. परंतु आता मोदी नाणे चालू शकणार नाही. नोटाबंदी, जी.एस.टी. यामुळे तर प्रत्येक विभागाचे कंबरडे मोडले आहे. उद्योगपतींपासून ते तळागाळातल्या शेतकरी, शेजमजुरांपर्यंतच सर्वांचीच पार निराशा झाली आहे. गेल्या वेळी निवडणुकीत सोबत असलेले साथीदार आता पाठ सोडू लागले आहेत. यातील पहिला नंबर तेलगु देसमने लावला आहे. शिवसेनेमध्ये सत्ता सोडण्याची हिंमत नसल्यामुळे ते अजून सत्ता उपभोगण्यासाठी सत्तेत आहेत. सरकारने गेल्या चार वर्षात काहीच केलेले नसल्यामुळे आता जनतेपुढे जाताना भाजपाच्या सहकारी पक्षांना काय उत्तर द्यायचे हा प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्यातच जर विरोधी पक्ष एकवटला तर आपले काही खरे नाही. त्यातच जर शरद पवारांसारखे नेतृत्व जर पंतप्रधानांच्या स्पर्धेत उतरले तर पवार जीवाची बाजी लावणार हे स्पष्टच आहे. यातून भाजपाला पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता कमीच वाटते. या सर्व राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलल्या भाजपाच्या कुंभमेळ्यावर त्याची गडद छाया दिसत होती. पक्षाचे अध्यक्ष शहा असोत किंवा मुख्यमंत्री फडणवीस असोत प्रत्येकाच्या भाषणात एक कृत्रीमता होती, मनातून व्यक्त होणारी भीती दिसत होती, त्याहून महत्वाचे म्हणजे भाषणात प्रत्येक जण उसने आवसान आणीत होता. अमित शहा यांचे भाषण तर त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. त्यांनी विरोधकांची कुत्र्या, मांजरांपासून ते सापापर्यंत केलेली तुलना हेच दाखविते. ज्यावेळी स्तताधार्‍यांची आसने ढिली होऊ लागतात त्यावेळी त्यंच्याकडून अशी भाषा जन्माला येते. हा विनोदाचा भाग नाही तर ते त्यांचे वैफल्य अशा प्रकारे तुलना करुन व्यक्त करीत असतात. आपल्या देशात सुदृढ लोकशाहीसाठी विरोधकही तेवढाच तुल्यबळ असणे गरजेचे आहे. कॉँग्रेसला देशातून संपविण्याची भाषा करणारे हे अमित शहा आता तर थेट त्यांना कुत्रा, मांजर संभवू लागणे हे लोकशाही संपविण्याचा भाग झाला, असेच म्हणता येईल. कारण जर तुम्हाला या देशात विरोधक नको आहे याचा अर्थच तुम्हाला हुकूमशाही पाहिजे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही हीच हुकूमशाही अभिप्रेत असावी. अशा प्रकारची भाषा करणे हा प्राणीमात्रांचाही अपमान ठरावा. आजवरच्या सत्ताधार्‍यांनी अशी टोकाची भूमीका घेऊन कधीच राजकारण केले नाही. अगदी अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असतानाही अशी भाषा वापरील गेली नव्हती. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली व लोकांच्या लोकशाही ह्क्कांवर तसेच विरोधकांची गळचेपी करुन त्यांच्या हक्क्वर गदा आणली ते जनतेला रुचले नाही, परिणामी जनतेने त्यांना सत्ताभ्रष्ट केले हा इतिहास आहे. आज भाजपाच्या नेत्यांच्या तोंडी जी भाषा आहे तो सत्तेचा माज आहे. राज्यीतील दोन क्रमांकाचे मंत्री उघडपणे भुजबळांच्या शेजारी दोन कोठड्या रिकाम्या आहेत अशी धमकी विरोधकांना देतात याच अर्थच स्पष्ट आहे की, भाजपाला व त्यांच्या मंत्र्यांना लोकशाही नको आहे व सत्तेचा माज आला आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, भाजपा आज देशातील 22 राज्यात सत्तेत आहे, आता देशव्यापी पक्ष झाला आहे व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला तुम्ही जर मोजत नाहीत तर त्यांची भीती तुम्हाला कशाला वाटते, असा प्रश्‍न पडतो. भाजपाचे वैचारिक विरोधक असलेल्या डाव्यांचे त्रिपुरासारख्या छोट्या राज्यातील सरकारही आता तुम्ही सपविले मग आता तुम्हाला विरोधकांची भीती का वाटते? ही भीती वाटते ती स्वाभावित आहे, भाजपाचा पाया हा केवळ जाहिरातबाजी हाच आहे व हा पाया आता ढासळू लागला आहे. जनतेला यावेळी आपण फसवू शकणार नाही व त्यात विरोधक एकत्र आले तर काय होऊ शकते हे त्यांनी बिहार, उत्तरप्रदेशातील व राजस्थानातील पोटनिवडणुकात त्यांनी पाहिले आहे. विरोधक जर एकत्र आले तर भाजपाचे कमळ कोमेजण्यास वेळ लागणार नाही हे अमित शहा बरोबर ओळखतात त्यामुळेच त्यांनी विरोधकांबद्दल महामेळाव्यात गरळ ओकले आहे. बरोबर 38 वर्षापूर्वी भाजपा स्थापन झाला त्यावेळी झालेल्या मेळाव्यात कडक हिंदुत्ववादी म्हणून ओळखले गेलेले लालकृष्ण अडवाणी, भाजपाचा मवाळ चेहरा म्हणून परिचित असलेले अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे म्हणजे वैचारिक लढाईची नांदी असे. आता अमित शहा यांचे भाषण पाहता भाजपाकडे सत्ता आली पण 38 वर्षांनी वैचारिक अधोगती किती झाली याचे दर्शन घडविते. भाजपाने सत्ता व संपत्तीच्या जीवावर मोठी गर्दी जमवून आपला कुंभमेळा यशस्वी केला असला तरी यात जमलेली मंडळी ही सोशल मिडियाप्रमाणे आभासी होती, हे विसरता कामा नये.
---------------------------------------------------

0 Response to "भाजपाचा कुंभमेळा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel