-->
राणेंचे वर्चस्व कायम!

राणेंचे वर्चस्व कायम!

सोमवार दि. 16 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राणेंचे वर्चस्व कायम!
तळकोकणातील आघाडीचे मध्यम आकारातील असलेले शहर कणकवलीवर कोणाचे वर्चस्व राहाणार या पडलेल्या प्रश्‍नाचे फत्तर आता सापडले आहे. कणकवलीकरांनी राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या बाजुने कौल दिल्याने राणेंची या शहरावरील पक्कड कायम राहिली आहे. भाजपासह सर्वच पक्ष राणेंच्या विरोधात असल्याने यावेळी राणेंची कसोटी होती. तसेच नुकतेच राणे हे भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्याने इकडे राणे यांची भूमिका कोणती असेल असाहा प्रश्‍न राजकीय वर्तुळात होता. मात्र नारायण राणेंनी स्वाभिमान पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला व स्वाभिमान पक्षाला बहुमत मिळाले. यावेळची कमकवलची निवडणूक ही मोठी गमतीशीर होती, असेच म्हमावे लागेल. कारण नारायण राणे भाजपाचे खासदार, परंतु त्यांनी भाजपाला मतदान करु नकात व स्वाभिमानला विजयी करा असे आवाहन केले होते. तर त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे कॉग्रेसचे आमदार मात्र त्यांनी कॉग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले नव्हते तर त्यांनी आपली सर्व ताकद स्वाभिमानच्या बाजुने लावली होती. राज्यात एकमेकांच्या विरोधात असणारे मात्र सत्तेत वाटेकरी असणारे शिवसेना-भाजपा कणकवलीत मात्र राणेंच्या विरोधात होते. तर स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आमदार नितेश राणे यांची  निवडणूक आखणी व शिवसेना-भाजपचे अंतर्गत शह-काटशह यामुळे कणकवलीवर नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले. ज्या शहराने संदेश पारकर यांना युवा नेतृत्व अशी राज्यात ओळख निर्माण करून दिली त्याच शहराने पंधरा वर्षानंतर त्यांना मोठा पराभव दाखवला. या निवडणूकीत शिवसेनेपेक्षाही भाजपच्या संघटनात्मक मनोधैर्यावर मोठा आघात झाला. कणकवली शहराने राणेंना अनेक राजकीय चढ-उतार दाखवले. 2003 मध्ये राणेंचे राजकीय करिअर शिखरावर होते, त्यावेळी झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार संदेश पारकर यांनी राणेंच्या पॅनलला पराभवाची चव चाखली. राणेंचे थेट प्रतिस्पर्धी अशी ओळख त्या निवडणूकीने पारकर यांना मिळाली. यानंतर राजकिय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पुढे पारकर राणेंचे नेतृत्व मानून काँग्रेसमध्ये आले. कालांतराने राणेंची साथ सोडून संदेश पारकरांनी भाजपची कास धरली. मावळत्या नगरपंचायत कार्यकारीणीत आपले सत्ताबळ सिध्द करून राणेंच्या समर्थकांना विरोधी बाकावर बसवले. आता लागलेला ताजा निकाल पारकर यांच्या राजकिय करिअरच्या दृष्टिने खूप मोठा धक्का मानावा लागेल. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षासाठी हा एकप्रकारचा चक्रव्यूह होता. विजय हाच यावरचा उपाय होता. अन्यथा राणेंना कणकवली राखता आली नाही असा संदेश राज्यस्तरावर जाण्याची शक्यता होती. संदेश पारकर यांचे शहरात असलेले गुडवील लक्षात घेऊन त्यांना नगराध्यक्ष पदासाठी आग्रह करण्यात आला. ऐनवेळी आलेली ही जबाबदारी त्यांनी स्विकारली. शिवसेनेशी युती असल्यामुळे निवडणूक सोपी असल्याचे चित्र वरवर दिसत होते. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला. मात्र प्रचारातील रंगत वाढत जाण्याबरोबरच युतीच्या वर्चस्वाचे स्वप्न हळूहळू वास्तवापासून दूर जावू लागले. याचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमानसाठी योग्य निवडणूक व्यूहरचना आखली व ती फळाला आली. शहरविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी मराठा चेहरा दिला. याबरोबरच इतर प्रस्तापित पक्षांनी नगराध्यक्ष पद खुले असूनही ओबीसी उमेदवारांना संधी दिल्याचा मुद्दा प्रचारात मांडला. शिवसेना-भाजपच्या तुलनेत स्वाभिमानकडे राणेंच्या रूपाने मराठा नेतृत्व आहे. यामुळे या आघाडीच्या प्रचाराचा परिणाम स्वाभिमानवर जास्त प्रमाणात होण्याची शक्यता होती. स्वाभिमानचे प्रमुख पदाधिकारी कणकवलीत उतरून प्रत्येक प्रभागाची जबाबदारी दिली गेली. त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा आणि रसद पुरवणारी फळी आमदार राणे यांनी उभी केली. त्यांच्या प्रचारात सुसुत्रता होती. या उलट शिवसेना-भाजपची स्थिती होती. भाजपच्या नेत्यांमध्ये फारसा सुसंवाद प्रचारादरम्यान दिसला नाही. पारकर नगराध्यक्षपदी निवडून आले असते तर 2003 प्रमाणे ते पुन्हा एकदा राजकिय हिरो ठरले असते. राणेंच्या पॅनलचा पराभव केल्याने भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाच्या ते नजरेत आले असते. आगामी विधानसभेची गणितेही आता आखली जात आहेत. यातही भाजपतर्फे पारकर यांनी दावा केला असता. प्रचारादरम्यान हा मुद्दा ही चर्चेला आला होता. शहरात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि माजी आमदार राजन तेली या भाजपमधील बड्या नेत्यांचा राजकीय प्रभाव आहे. मात्र हे दोन्ही नेते प्रचारात अपेक्षेइतके सक्रिय नव्हते. 2003 नंतरची पाच वर्षे वगळता स्वतः संदेश पारकर शहराच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. स्वाभिमानकडे असलेले बहूसंख्य उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते हे कधीकाळी संदेश पारकर यांचे साथीदार होते. त्यामुळे पारकर यांची ताकद काही प्रमाणात विभागली गेली. हा पराभव अवघ्या 37 मतांचा असला तरी संदेश पारकर यांच्या दृष्टिने मोठा आहे. भाजपमधील शह-काटशहाच्या राजकारणात या पराभवाने ते खूप मागे पडले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात 2009 च्या निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार व राणे समर्थक रवींद्र फाटक यांचा भाजपचे प्रमोद जठार यांनी अवघ्या 34 मतांनी पराभव केला होता. काँग्रेस आणि मित्र पक्षात झालेले अंतर्गत राजकारण, काही जातीय समीकरण यामुळे असा निकाल लागल्याचे त्यावेळी मानले जात होते. कणकवली शहरातील राजकिय गणिताचा त्याकाळात जठार यांना मोठा फायदा झाला होता. याच शहरात 2003 मध्ये नगरपंचायत लढतीत संदेश पारकर यांनी राणेंच्या पॅनलचा पराभव केला होता. त्याच कणकवलीत राणेंच्या स्वाभिमान पक्षाने भाजपच्या संदेश पारकर यांचा 37 मतांनी पराभव केला. भविष्यात आपल्या देशातील राजकारण किती खालच्या पातळीवर जाणार आहे, हेच या निवडणुकीतून दिसले.
-------------------------------------------------------------

0 Response to "राणेंचे वर्चस्व कायम!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel