-->
बाबा-बुवांचे अच्छे दिन...

बाबा-बुवांचे अच्छे दिन...

रविवार दि. 08 एप्रिल 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
बाबा-बुवांचे अच्छे दिन...
-----------------------------------------
एन्ट्रो- नेहरुंचा वैज्ञानिक दृष्टीकोन आपण आता विसरत आहोत. नर्मदेच्या समितीत वैज्ञानिकांना आपण बाजूला सारुन त्याजागी बाबाबुवांना आणले तेव्हाच आपण बजबजपुरीला निमंत्रण देत आहोत हे नक्की झाले. भविष्यात आपण कुठे जाणार आहोत हे आत्ता काहीच सांगू शकत नाही. सध्याच्या तरुण पिढीला अ‍ॅपल वापरायला आवडतो, पण त्यांना त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन नको आहे, हे मोठे दुदैव आहे. 
---------------------------------------------
मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने कम्प्युटर बाबा, भय्युजी महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज आणि योगेंद्र महंत या बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. नर्मदा संवर्धनासाठी मध्य प्रदेश सरकारने जी समिती तयार केली आहे, त्या समितीत यांना समाविष्ट केल्याने हा दर्जा त्यांना दिल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या बाबा-बुवांच्या लोकप्रियतेचा नर्मदा संवर्धनासाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो, असा सरकारचा दावा आहे. परंतु केवळ लोकप्रियता व जनता एखाद्याच्या मागे असणे हाच जर निकष ठेवला तर हिंदी चित्रपटातील अभिनेते व अभिनेत्री हे बाबांबुवापेक्षा जास्त लोकप्रिय असतील. मात्र सरकारने बाबाबुवांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याने यामागे निश्‍चितच राजकारण आहे. एक तर मध्यप्रदेशमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. गेली 15 वर्षे सलग सत्ता असल्याने भाजपाच्या विरोधात या राज्यात बरीच नाराजी आहे. त्यातच मापम घोटाळ्याने संपूर्ण राज्य घुसळून निघाले आहे. अशा वेळी आपला संभाव्य पारभव टाळण्यासाठी मध्यप्रदेशातील भाजपाच्या नेतृत्वाने आता आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाबाबुवांना राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. एकूणच सध्या आपल्याकडे सर्वधार्मसमभाव या संकल्पनेची थट्टा केली जात आहे, ते पाहता आपल्या संविधानानुसार आपण खरोखरीच जात आहोत का अशी शंका यावी. आता असे म्हटल्यावर हिंदुत्ववादी भाजपा म्हणेल की, कॉग्रेसने केले तर तुम्हाला चालते मग भाजपाने केले की त्यावर टीका होते. अलिकडेच हरियाणातील भाजप सरकारने तिथल्या विधानसभेत तरुण सागर या दिगंबर पंथीय जैन मुनींचे भाषण ठेवले होते. ते आपल्या दिगंबर अवतारातच विधानसभेत आले व त्यांनी हरियाणाच्या लोकप्रतिनीधींना जीवनातील अंतिम सत्यदर्शन आपल्या भाषणातून घडवले होते. धर्म आणि राजकारण याची अशा प्रकारे मोठी गल्लत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मध्यप्रदेश सरकारच्या नर्मदेच्या संवर्धनासाठी जी समिती स्थापन केली होती त्यात पूर्वी शास्त्रज्ञ व या विषयातील जाणकार होते. त्यात माशेलकरांसह अनेक नामवंतांचा समावेश होता. मात्र आता त्यांनी या समितीतून आपले राजीनामे दिले आहेत (कदाचित त्यांचे राजीनामे मागितले ही असतील किंवा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले असेल), अशा प्रकारे नर्मदेच्या विषयातील तज्ज्ञ लोक राजीनामे देतात त्याची चिंता सरकारला वाटत नाही व त्याऐवजी सरकार ज्यांचा या विषयाशी काडीचाही संबंध नाही ते बाबाबुवा या समितीत शिरतात हे सर्व गंभीर आहे. एकूणच बाबा-बुवांना सध्या भाजपाच्या राज्यात अच्छे दिन आले आहेत हेच खरे. यातील कम्प्युटर बाबा म्हणजे सिलीकॉन व्हॅलीमधला आय.टी. उद्योगातला तरुण सर्वस्वाचा त्याग करून भारतीयांना आध्यात्मिक ज्ञान देण्यास आला आहे, अशीशक्यता वाटू शकते. परंतु तसे काही नाही. नामदेवदास त्यागी हेे दिगंबर आखाड्याचे साधू साधूजनांमध्ये कम्प्युटर बाबा म्हणून ओळखले जातात. त्यांची कार्यशैली व हुशारी यामुळे 1998च्या दरम्यान जेव्हा कम्प्युटर तंत्रज्ञानाने देशाचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती, त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना हे नाव दिले आहे. बाबा लेटेस्ट अ‍ॅपल प्रो लॅपटॉप व हायस्पीड वायफायचा वापर तर करतात तसेच या बाबांकडे एक हेलीकॉप्टरही आहे. भैय्युजी महाराजांविषयी महाराष्ट्रातील जनतेलाही बरेच माहिती आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना यांचे बडे प्रस्थ मंत्रालयात होते. मात्र त्यांना सुदैवाने विलासरावांनी असा कोणताही वैधानिक दर्जा दिला नव्हता. खरे तर केवळ नर्मदाच नव्हे तर सरकारने अशा प्रकारे प्रत्येक मंत्रालयातील सल्लागार समितीत अशा प्रकारे बाबबुवांची नियुक्ती केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. आपल्यकडे राजकारणात धर्माचा राजकारणासाठी वापर करू नये हे तत्त्व 1950 साली जरी स्वीकारले असले तरी याची पायमल्ली सर्रास होताने दिसते. 1970 सालापर्यंत काँग्रेसची केंद्र व राज्यातील निर्विवाद सत्ता असताना धर्माचा राजकारणासाठी वापर हा मर्यादित होता. 1970 नंतर मात्र विरोधकांची राज्यात सरकारे येऊ लागली. यानंतर कॉग्रेसने खर्‍या अर्थाने राजकारणात धर्माचे राजकारण करण्यास सुरुवात केली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना झालेल्या प्रचंड मतदानामागे शिखविरोधी हिंदू एकतेचा भाग होताच. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॉग्रेसला मतदान करण्याचा छुपा आदेश काढला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला जनसंघ व नंतरचा भाजप यांनी हिंदू व्होट बँकेच्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरूच ठेवले होते. कॉग्रेसने मुस्लिमांची मते एका बाजूला घेण्याबरोबरच भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध करताना कायमच मवाळ हिंदुत्ववादी धोरण स्वीकारले गेले. अगदी आता राहूल गांधी आपणास जानवेधारी म्हणतात त्यामागेही मवाळ भूमिका आहेच. अर्थात कॉग्रेसने धर्म व राजकारण याची सर्वात जास्त सरमिरळ झाल्याचा कालखंड अनुभवला आहे. पंजाबमधील खलिस्तानी चळवळ व काश्मिरमधील नॅशनल कॉन्फरंसच्या विरोधातील भूमिकेमुळे देशभरात हिंदूंची मते काँग्रेसच्या पारड्यात पडतील हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा होरा खराही ठरला. राजीव गांधींनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघावर टीका करण्याचे कायम टाळले. कॉग्रेस हा नेहमीच अल्पसंख्याकांचे मतांसाठी लांगूनचालन करतो असे वातावरण निर्माण करण्यास भाजपा व त्यांचे संघातील सहकारी यशस्वी ठरले. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या काळात कॉग्रेसने आपल्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहाण्याचे शंभर टक्के काम केले नाही. यातूनच अविश्‍वासाच्या राजकारणातून भाजपाची विचारधार फोफावली आहे. यातूनच दुसर्‍या टप्प्यात मोदी युगाचा उदय झाला. गांधी-नेहरु-इंदिराजींच्या पूर्णपणे उलटे धोरण आखणार्‍या भाजपाची सत्ता जेव्हा आली त्याचवेळी नेहरु- आंबेडकर-फुले-शाहू यांच्या विचाराची अखेर होण्यास प्रारंभ झाला हे नक्की होते. आज भाजपाच्या पुढार्‍यांना नेहरु नकोत परंतु गांधी-आंबेडकर-फुले-शाहू हे हवेसे वाटतात. निदान जेवताना जसे लोणचे चव येण्यासाठी लागते तसेच हे नेते त्यांना लागतात. भाजपाने भगत सिंग यांच्यासारख्या प्रखर लेनीनवादी विचारांच्या क्रांतीकारकाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मी नास्तिक का झालो किंवा कॉम्रेड्सना पत्र आदी लिखणामुळे उघडा पडल्यावर आता त्यांचे साथी राजगुरू हे कसे संघाच्या शाखेत जायचे वगैरे अशा किशोरवयीन थापांच्या स्पर्धा सुरू केल्या आहेत. नेहरुंचा वैज्ञानिक दृष्टीकोन आपण आता विसरत आहोत. नर्मदेच्या समितीत वैज्ञानिकांना आपण बाजूला सारुन त्याजागी बाबाबुवांना आणले तेव्हाच आपण बजबजपुरीला निमंत्रण देत आहोत हे नक्की झाले. भविष्यात आपण कुठे जाणार आहोत हे आत्ता काहीच सांगू शकत नाही. सध्याच्या तरुण पिढीला अ‍ॅपल वापरायला आवडतो, पण त्यांना त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन नको आहे, हे मोठे दुदैव आहे.
------------------------------------------------------ 

0 Response to "बाबा-बुवांचे अच्छे दिन..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel