-->
देर है... मगर अंधेर नही...

देर है... मगर अंधेर नही...

शुक्रवार दि. 06 एप्रिल 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
देर है... मगर अंधेर नही...
वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुप्रसिध्द अभिनेता सलमान खानला दोषी ठरवून पाच वर्षाची कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र या प्रकरणात सामिल असलेले त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना जोधपूर सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले त्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. गेली 20 वर्षे हा खटला सुरु होता व अखेर त्याच गुरुवारी निकाल लागला. आपल्याकडे सेलिब्रेटींसाठी वेगळे नियम असतात असे बोलले जाते. अनेकदा हे प्रत्यक्षात आपल्याला अनेक प्रकरणात दिसतेही. अगदी सलमानच्या मुंबईतील ट्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात आपल्याला ते स्पष्टपणे दिसलेही दिते. मात्र सलमान खानला आता काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा झाल्यामुळे देर है... मगर अंधेर नही... असेच आशादायी चित्र या निकालाच्या निमित्ताने आपल्यापुढे आले आहे. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणाचा हा खटला सलमान खानसह सहा जणांवर चालला, पण 20 वर्षांनंतरही एक असा आरोपी आहे ज्याला पोलीस पकडू शकले नाहीत. या प्रकरणात एकूण सात आरोपी होते. यामध्ये सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांच्याशिवाय ट्रॅव्हल एजंट दुष्यंत सिंह आणि दिनेश गावरे यांचेही नाव होते. हे ट्रॅव्हल एजंट त्यावेळी सलमानचे सहकारी होते. पण काळवीट शिकारीचे हे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर दिनेश गावरे फरार झाला. वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले. गावरेच्या गैरहजेरीत केवळ सहा जणांवरच हा खटला चालला. हम साथ साथ हैं या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला जोधपरला गेले होते. त्यावेळी त्यांनी काळवीटाची शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51 खाली आरोप दाखल करण्यात आला होता. त्यासाठी कमाल सहा वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. सलमानला आता पाच वर्षाची कैद झाल्याने लगेचच त्याला जामीन मिळू शकत नाही व त्यासाठी त्याला काही काळ जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रहावे लागेल. अर्थात यापूर्वीही त्याची रवानगी या कारागृहात झाली होती. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले. या खटल्यास दोषी ठरलेला हा एकमेव आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या या हायप्रोफाईल खटल्यात पुनमचंद बिश्णोई यांनी दिलेली साक्ष सलमानला दोषी ठरवण्यास पुरेशी ठरली. पुनमचंद हे लघुशंकेसाठी घराबाहेर गेले आणि सलमान काळवीटाची शिकार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले असता 1- 2 ऑक्टोबर 1998 च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. त्या रात्री नेमके काय झाले, याबाबत बिश्णोईंनी केलेला खुलासा महत्त्वाचा ठरला. त्यांच्या सांगण्यानुसार, मी लघुशंकेसाठी घराबाहेर गेलो. यादरम्यान मला गोळीबाराचा आवाज आला. मला जीपची हेडलाईट दिसली, त्यावेळी मला गोळीबाराचा आवाज आला, असे त्यांनी सांगितले. यानंतर मी शेजारी राहणार्‍या छोगारामला उठवले आणि आम्ही जीपच्या मागे गेलो, असे त्यांनी म्हटले होते. त्या जीपमध्ये सलमान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बसली होती, असे त्यांनी साक्षीत म्हटले होते. बाकीचे कलाकार सलमानला शिकार करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. सलमाननेही लगेचच बंदुकीने गोळी झाडत दोन काळवीटांची शिकार केली, अशी साक्ष बिश्णोईंनी दिली होती. बिष्शोई व समाजातील अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली असता सलमान व उर्वरित कलाकारांनी घाबरुन काळवीटांना तिथेच सोडून पळ काढला, त्यांनी दिलेली ही साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. पुनमचंद बिश्णोईंनी जीपचा नंबर लिहून घेतला आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली. स्रावत महत्वाचे म्हणजे सेलिब्रेटींच्या अनेक खटल्यात पुरावे नष्क केले जातात किंवा साक्षीदार फिरतात. परंतु बिष्शोई व छोगाराम यांनी आपली साक्ष ही शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यामुळेच सलमानला शिक्षा ठोठावली गेली. त्यादृष्टीने बिष्शोई यांच्या साक्षीला फार महत्व होते. फॉरेन्सिक चाचणीत सलमानच्या जीपमधील रक्ताचे नमुने काळवीटाचे असल्याचे स्पष्ट झाले. बिष्शोई समाजात काळवीटाला फार महत्त्व आहे. निसर्गाच्या रक्षण करणे हे पहिले कर्तव्य असल्याची या समाजाची विचारधारा आहे. यानुसार त्यांनी आपली साक्ष संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या खटल्यात कायम राखली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावयास हवेत. कारण सलमानसारख्या सेलिब्रेटींच्या कोणत्याही दबावास ते बळी पडले नाहीत. सलमानला शिक्षा झाल्याने अनेक निर्मात्यांचे धाबे दणाणले आहेत याचे कारण म्हणजे, सध्या सलमानकडे असलेल्या विविध चित्रपटांमध्ये सुमारे त्यांचे 500 कोटी रुपये अडकले आहेत. त्यांची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. मात्र या शिक्षेमुळे एक बरे झाले की, कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. पैसेवाल्यांसाठी किंवा सेलिब्रेटींसाठी काही वेगळा कायदा नाही किंवा त्यांचे अपराध माफ करता येणार नाहीत. त्याबद्दल बिष्शोई यांनी दिलेली साक्ष व न्यायालय यांचे विशेष आभार मानले पाहिजेत.
------------------------------------------------------------------

0 Response to "देर है... मगर अंधेर नही..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel