-->
भाजपाला चपराक

भाजपाला चपराक

शुक्रवार दि. 16 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपाला चपराक
उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये गोरखपूर आणि फुलपूर या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांचा विजय झाला. गेली 22 वर्षे एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले हे दोन्ही पक्ष या पोटनिवणुकीसाठी एकत्र येऊन त्यांनी विजयश्री खेचून आणल्याने आता देशातील या सर्वात मोठ्या राज्यातील राजकीय समिकरणे झपाट्याने बदलणार आहेत. बिहारमध्येही आरारिया लोकसभा पोट निवडणूक लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या ताब्यात आली. बिहार व उत्तरप्रदेशातील या निवडणुकात विजयी ठरलेले हे पक्ष ओबीसी, दलित यांच्या राजकीय आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतात. भाजप किंवा काँग्रेस हेे दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष त्या समाजाच्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे या स्थानिक पक्षांकडे या मतदारसंघातील लोक आकर्षित झाले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सपा व बसपा या दोन्ही पक्षांची मते परस्परांना सफाईतरित्या हस्तांतरीत झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, जनतेला ही युती पाहिजे आहे. भाजपाच्या एका वर्षातील राजवटीला जनतेच्या अपेक्षाभंग झाला आहे, असाच यातून अर्थ निघतो. हे दोघे पक्ष एकत्र आल्याने गेल्या निवडणुकीत चमकदार कामगिरी करणार्‍या भाजपाला चांगलीच चपराक मिळाली आहे. उत्तर प्रदेशची पोटनिवडणूक ही देशातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. कारण येत्या वर्षात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. तसेच उत्तरप्रदेशातील सरकार स्थापन होऊन एक वर्ष नुकतेच पूर्ण होत आहे, अशा वेळी मतदारांनी एक प्रकारची नाराजी या सरकारवर व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपासाठी आगामी काळ कठीण जाण्याची चिन्हे दिसत आहेत. चंद्राबाबू नायडू यांची नाराजी अजून दूर करता आलेली नाही. गुजरातमधील विधानसभेत निसटते बहुमत मिळाले असले तरीही तेथे कॉग्रेसची ताकद वाढली आहे. त्यापाठोपाठ राजस्थानातील पोटनिवडणुकात कॉग्रेसला अच्छे दिन आले. मात्र त्रिपुरात मार्क्सवाद्यांचा पराभव करुन तेथे भाजपाचे सरकार स्थापन करण्याचा आनंद व्यक्त करण्यात येत आसताना या आनंदावर विरजण घालणारे हे या दोन राज्यातील निकाल आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर येेथून सलग पाच वेळा लोकसभेमध्ये निवडून आले होते. तर फुलपूर मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य निवडून आले होते. 2014 मध्ये उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि 2017 च्या विधानसभेत निवडणुकीमध्ये 403 पैकी तब्बल 311 जागा जिंकल्या. त्यामुळे या दोन जागा जिंकणे आपल्यासाठी फारसे अवघड नाही, असेच भाजपला वाटत होते. भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये 39.67 टक्के तर सपाला 22.35 टक्के आणि बसपाला 19.88 टक्के एवढी मतं मिळाली होती. सपा-बसपाची एकत्र मते जास्त असली तरीही भाजपला योगी आदित्यनाथ यांच्या करिष्म्यावर पूर्ण भरवसा होता. विकासाच्या नावाखाली पसरविण्यात येत असलेल्या दलित-मुस्लिम विरोधामुळे ओबीसींमधील यादवेतर जाती व दलितांमधील जाटवेतर जाती या हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र येतील व संघ परिवाराच्या उच्च जात वर्गाच्या राजकारणाला मूक पाठिंबा देतील, असा त्यांचा ठाम विश्‍वास होता. परंतु या विश्‍वासाला आता तडा गेली आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष हे खरेतर शूद्रातीशूद्रांचे प्रतिनिधित्व करणारे दोन पक्षच एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. या पोट निवडणुकीत नैसर्गिक मित्र एकत्र आल्यावर बहुजन समाज एकवटला व जय श्रीरामच्या घोषणा व जानव्याचा फास दोघांनाही फटका बसला. गेल्या 22 वर्षात हे दोन्ही पक्ष नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी परस्परांपासून दुरावले होते. आता मात्र त्यांनी आगामी राजकारणाची चाहूल या विजयातून दाखविली आहे. कारण विजय मिळाल्यावर काही फूटांवर असलेल्या मायावतींच्या घरी अखिलेश यादव गेले. गेली दोन दशके परस्पर नेत्यांतील ही पहिलीच भेट आहे. त्यावरुन आता उत्तरप्रदेशातील राजकारण आता वेगळे वळण घेणार हे नक्की झाले आहे. कॉग्रेसचा विचार करता त्यांनी ही निवडणूक स्वतंत्र्यपणे लढविली होती. त्यात त्यांना अजिबात यश आले नाही. उत्तरप्रदेशातील कॉग्रेसचा घटलेला जनाधार अजून काही त्यांना सापडत नाही. एकेकाळी दलित, मुस्लिम, ब्राह्मण, ठाकूर या जाती कॉग्रेसच्या मागे होत्या. परंतु गेल्या 25 वर्षात या लोकांनी कॉग्रेसीच साथ सोडल्यापासून कॉग्रेस खिळखिळी झाली आहे. आता हे निकाल पाहता, उत्तरप्रदेशात सेक्युलर पक्षांच्या सोबतीने कॉग्रेसला त्यांच्या मागे फरफटत जावे लागणार आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याचे त्यांनी स्वप्नही पाहू नये. काँग्रेस व भाजपा हे दोन पक्ष कदापी नैसर्गिक मित्र होऊ शकत नाहीत, त्याचबरोबर 2017 साली सपा व काँग्रेस या अनैसर्गिक आघाडीला लोकांनी पसंत केले नाही. त्यामुळे कॉग्रेसला बसपा व सपाच्या जोडीने पुढे जावे लागेल. बिहारमध्ये नितीश कुमार मोदींबरोबर गेले आणि लालूंना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले तरी पोटनिवडणुकीमध्ये लालूंच्याच पक्षाला मतदारांना निवडून दिले आहे. त्याचबरोबर नितीशकुमार यांच्या भाजपा किंवा लालू प्रसाद यादव यांना सत्तेच्या राजकारणात वापरुन घेण्याच्या धोरणालाही जोरदार इशाराच दिला आहे. त्यामुळे आता एकतर भाजपाबरोबर रहायचे किंवा लालूंबरोबर जायचे याचा पक्का निर्णय नितीशकुमार यांना करावा लागणार आहे. भाजपच्या प्रचार यंत्रणेला बळी पडून ओबीसी भाजपकडे आकर्षित झाला असला तरी मोदी-योगी यांच्या राज्यकारभाराबाबत देशातील सर्वात मोठ्या राज्यातील मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे व त्याला पर्याय म्हणून ते सपा-बसपा आघाडीकडे प्रचंड मोठ्या आशेने पाहात आहेत हे सिद्ध झाले आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "भाजपाला चपराक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel