-->
...आता सीमेवर   संघ स्वयंसेवक!

...आता सीमेवर संघ स्वयंसेवक!

बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
...आता सीमेवर 
संघ स्वयंसेवक!
जम्मु-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. सोमवारी श्रीनगर येथील कॅम्पमध्ये एके-47 रायफल घेऊन दहशतवाद्यांनी घोसखोरीचा प्रयत्न केला. सुंजवां आर्मी कॅम्पवर 52 तासांपासून ऑपरेशन सुरु आहे. शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या हल्लयात 5 जवान शहीद झाले आहेत, तर एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. श्रीनगरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्येही 2 दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह घुसखोरीचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या येथे लष्कराची शोध मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गेल्या महिन्याभरात पाकिस्तान सीमेवरुन घुसखोरी करुन हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. भारतीय सैन्याला हे घुसखोरी करणारे दहशतवादी जुमानत नाहीत, असे काहीसे चित्र दिसते. परंतु जवान आपल्या जीवाची बाजी लावून हे हल्ले परतवत आहेत. आतापर्यंत 5 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एन.आय.ए.) पाच जणांची टीम जम्मूमध्ये पोहोचली असून लष्कराला मिळालेले दहशतवाद्यांचे पुरावे ते तपासणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी जम्मू येथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यामुळे सध्याची परिस्थीती ही चिंताजनक आहे, हे नक्की. छप्पन इंचाची निवडणुकीपूर्वी फुगवून दाखविली जाणारी छाती आता थंड पडली आहे. एकूणच ही गंभीर परिस्थिती सरकार कशा प्रकारे हाताळणार याविषयी कोणी बोलत नाही. कदाचित लष्करी गुप्ततेचे कारण दाखवून याबाबत मौन पाळले जात असावे. परंतु यापूर्वीच्या सरकारला देखील अशाच मर्यादा होत्या, हे आता भाजपाच्या लक्षात आले असावे. विरोधात असताना कितीही मोठ्या गप्पा मारुन लोकांच्या भावनेला हात घालून सत्ता मिळविता आली तरी सत्तेत आल्यावर सीमेवरुल ही घुसखोरी रोकण्यासाठी युद्द करणे हाच एकमेव पर्याय नसतो. निदान त्या पर्यायाची एवढी घाई करता येत नाही, हे भाजपाला आता पटले असावे. सीमेवर ही धामधूम असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचा हा प्रश्‍न एका चुटकीसरशी सोडविला आहे. लष्कराला एक जवान तयार करण्यासाठी 6ते7 महिने लागतात. संघ अवघ्या तीन दिवसांमध्ये सैनिक तयार करु शकतोे. एवढी आमची क्षमता आहे. देशाला गरज पडली आणि युद्धाची स्थिती निर्माण झाली व संविधानाने परवानगी दिली तर स्वंयसेवक या मोर्चावरही लढण्यास तयार आहे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत. भागवत ज्या विश्‍वासने बोलले आहेत ते पाहता, देशाला आता सैन्याची गरज नसून संघाचे स्वयंसेवक सीमेवर जाऊन हे मोर्चे सांभाळू शकतात. अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे, सध्या सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून लढणार्‍या विरांचा व गोळ्या झेललेल्या सैनिकांचा अपमानच ठरावा. संघाचे स्वयंसेवक जर लाठी-काठी घेऊन सीमेवर लढणार असतील, तर चांगलेच आहे. कारण त्यामुळे सरकारचे करोडो रुपये वाचणार आहेत. स्वयंसेवकांना सैनिकांएवढा पगारही देण्याची गरज नाही. त्यांना जगण्यापूरते मानधन दिले तरी पुरु शकते. यातून सरकारच्या सध्या जो मोठा आर्थिक भार आहे, तो कमी होऊ शकतो. कदाचित भागवतसाहेब हे बोलणार हे लक्षात घेऊनच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात लष्करासाठी कमी निधींची तरतूद केली असावी. संघाने असे करावेच कारण त्यामुळे सरकारकडे अब्जावधी रुपये वाचणार आहेत व त्यामुळे हा वाचलेला पैसा विकास कामांकडे वळविता येईल. काही जुजबी बदल आपल्यला करावे लागतील. उदाहरणार्थ लष्करप्रमुख हे पद रससंघचालकांना घ्यावे लागेल व सैनिकांचा गणवेश बदलून खाकी फूलपँट व पाढरी शर्ट करावा लागेल. सरकारला हे गणवेश पुरविण्यासाठी खर्चही करावे लागणार नाहीत, कारण हे गणवेश प्रत्येक स्वयंसेवकाकडे आहेतच. सध्या सरकारने रेल्वे पूल उभारणीची कामेही लष्कराला द्यायला सुरुवात केली आहेच. त्याकामी सुध्दा स्वयंसेवक आपले गणवेश धारण करुन देशाच्या भल्यासाठी पूल उभारण्यास सज्ज होतील. खरोखर ही कल्पना यापूर्वीच्या कॉग्रेसच्या मूर्ख सरकारना सुचली नाही. ती जर सुचली असती तर कितीतरी सैनिकांचे प्राण वाचले असते. युद्ध हे शत्रूला नामोहरम करण्यासाठी लढले जाते. लष्करासारखे प्रशिक्षण असलेली इतक्या मोठ्या कार्यकर्त्यांची फौज जर एखाद्या संघटनेपाशी वा नेत्यापाशी असेल, तर या देशातील लोकशाही पद्धतीलाच त्याने धोका संभवू शकतो. कारण लष्कराचे काम हे या देशातील सीमा सुरक्षित ठेवणे असते. त्यामुळे लष्कर हे एका अर्थाने या देशातील लोकशाहीचे संरक्षक कवच आहे. या देशातील लष्कर हे राजकारणरहित राहिल्यामुळेच या देशातील लोकशाही सत्तर वर्षे बिनदिक्कत टिकू शकली. जर या देशातील लष्कर हे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित झाले असते तर देशातील लोकशाहीचे नक्की काय झाले असते या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला आपल्या शेजारच्या पाकिस्तान नामक राष्ट्राच्या अवस्थेकडे पाहून तात्काळ मिळू शकते. परंतु संघ ही संघटना बिनराजकीय असल्याचा दावा केला जातो, त्यामुळे काहीच चिंता करायचे कारण नाही. त्यामुळे आता संघाच्या सीमेवर लढणार्‍या स्वयंसेवकांची नोंदणी आदेश आल्यवर सुरु करायला हरकत नाही. सध्याच्या सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्या जोरावर त्यांनी पुढील शंभर वर्षे कोणाचीही सत्ता आली तरी सीमेवर सैनिक हे स्वयंसेवकच असतील असाही घटनाबदल करुन घ्यावा. कारण जर कदाचित विरोधकांची सत्ता आल्यास स्वयंसेवकांना सीमेवरील देशसेवा सोडून घरी परवावे लागेल... तसे होऊ नये व देशरक्षण व्हावे ही यामागची इच्छा.
-----------------------------------------------------------------

0 Response to "...आता सीमेवर संघ स्वयंसेवक!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel