-->
सट्टेबाजांचा काळा दिवस

सट्टेबाजांचा काळा दिवस

गुरुवार दि. 08 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सट्टेबाजांचा काळा दिवस
जगभरातील शेअर बाजारांसाठी मंगळवारी दिवस काळा ठरला. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्कयांनी कोसळला तर ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तसेच दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसाच्या सरासरीखाली या तिनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारातही जोरदार पडझड झाली. सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले मात्र बाजार बंद होते वेळी त्यात लक्षणीय सुधारणा झाली. सोमवारी जागतिक भांडवलशाहीचा मुख्य अड्डा असलेल्या अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या धुळधाणीची छाया जगभरातल्या शेअर बाजारांवर पडली आहे. अमेरिकच्या डाऊ इंडस्ट्रियल या निर्देशांकाने 1600 अंकांची अभूतपूर्व घसरण अनुभवली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे. आपल्या देशात सेन्सेक्स व निफ्टी हे अनुक्रमे मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांचे निर्देशांक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर घसरायला सुरु झाले होते. त्यांची ही घसरण प्रामुख्याने अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे होती. आपल्याकडे अर्थव्यवस्था सुस्थितीत असून सध्याची ही घसरण हंगामी म्हटली पाहिजे. परंतु जागतिक पातळीवरील प्रमुख शेअर बाजारात अर्थव्यवस्थेतील नैराश्य आल्यामुळे तसेच भविष्य उज्वल नसल्यामुळे घसरण झाली होती व हे कारण अत्यंत धोकादायक ठरणारे आहे. आपल्याकडे मात्र नेमके उलटे वातावरण आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून आपल्याकडे शेअर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे. अर्थव्यवस्था सुदृढ आहे हे वास्तव आहे, मात्र आपल्याकडे नोटाबंदी व जी.एस.टी.मुळे अर्थव्यवस्थेची गती खुंटली आहे. अर्थात ही हंगामी स्थिती असली तरीही शेअर बाजारात तेजी ही सट्टेबाजांनी आणलेली आहे. त्यामुळे या सट्टेबाजांना आवर घालण्यासाठी सरकारने समभागांवरील दीर्घकालीन नफ्यावर कर लावल्यावर लगेचच हे सट्टेबाज नाराज झाले व त्यांनी तेजीला खीळ घालून मंदी खेचून आणली. यामुळे समभागात गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंडांनाही कर भरावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनाही आपल्याकडे समभागांवरील हा कर तब्बल 14 वर्षांनी पुन्हा आला आहे. त्यामुळे आपल्याकडे शेअर बाजारातील सट्टेबाज व गुंतवणूकदारांसाठी कर भरण्याची मानसिकता संपली होती. ती आता पुन्हा सुरु होण्यासाठी काही काळ लागेल. त्यानंतर आपल्याकडे शेअर बाजारात पुन्हा तेजी येऊ शकते. त्याची एक झलक बुधवारी दिसलीच. कारण बुधवारी बाजारातील मरगळ झटकली जाऊन बाजार पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने झेपावू लागल्याचे चित्र दिसले. अमेरिकेत मात्र वेगळे चित्र आहे. सरकारी कर्जरोख्यांमधून मिळणारे वाढीव उत्पन्न व महागाई वाढण्याची भीती या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. अमेरिकी शेअर बाजारातील स्टँडर्ड अँड पूर 4.1 टक्क्यांनी घसरला तर डाऊची घसरण 4.6 टक्क्यांची झाली. ऑगस्ट 2011 नंतरची ही सर्वाधिक मोठी घसरण होती. अमेरिकी कर्मचार्‍यांचे पगार वेगाने वाढत असून 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याजदरही वाढतील असा अंदाज असून परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत व अन्य यरोपीय शेअर बाजारातही पडझड बघायला मिळाली. जर्मनीचा डॅक्स हा निर्देशांक चार महिन्यांच्या नीचांकावर आहे. इंग्लंडमधला शेअर बाजारही कोसळला तसेच जपान व अन्य आशियाई देशांनीही शेअर्सचे घसरते भाव अनुभवले. त्यामुळे जगात शेअर बाजारात घसरण होत असताना आपल्याकडील शेअर बाजारावरही त्याचा परिणाम होणे स्वाभाविक होते. आपल्याकडे गेल्या वर्षात सरकारने जो महत्वाचा निर्णय घेतला त्यात अग्रभागी नोटाबंदी व जी.एस.टी.ची अंमलबजावणी हा होता. नोटबंदीनंतर 18 लाख करदाते वाढले, असा सरकारचा दावा आहे. परंतु यात तेवढे काही सत्य नाही. कारण आपल्याकडे पॅन कार्डची बँकिंग व्यवहारांसाठी सक्ती केल्यापासून करदाते वाढत चालेले आहेत. जीएसटीच्या परिघात आलेले एक कोटी उद्योग आणि त्यामुळे वाढलेला महसूल हा मात्र बदल महत्वपूर्ण आहे. पूर्वी ही संख्या फक्त 6.5 लाख एवढीच होती. देशाचा विकास दर आज जगात सर्वाधिक आहे, कारण अमेरिकेपासून विकसीत जगाचा विकास दर हा जेमतेम जास्तीत जास्त तीन टक्के आहे. आपल्या स्पर्धेत असलेल्या चीनचाही विकास दर आपल्यापेक्षा एक टक्क्याने कमी आहे. गेल्या दोन वर्षात आपल्याकडे म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक करणार्‍यांचीही संख्या वाढली आहे. म्युच्युअल फंडात गेल्या वर्षातील लोकांची गुंतवणूक जवळपास दुपट्टीने वाढली. त्याचे एक दुसरे कारण म्हणजे बँकांच्या मुदत ठेवींवरील कमी होत जाणारे व्याज. त्या तुलनेत म्युच्युअल फंडात जास्त लाभ मिळतो व तो ही करमुक्त असतो. त्यामुळे अनेकांनी बँकामधील ठेवी काढून फंडांमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे आता सरकारने समभागांवरील नफ्यावर कर लावला आहे. थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला याचा अर्थ परकीयांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्‍वास वाढला आणि अधिकाधिक भारतीय नागरिक शेअर बाजारात भाग घेऊ लागले. त्यामुळेच गेल्या वर्षभरात तब्बल 29 टक्के वाढ या गुंतवणूकदारांनी अनुभवली. पण फक्त शेअर बाजार वाढतो आहे, उद्योग-व्यवसाय वाढत नाहीत, शेतीचा विकास दर वाढत नाही, रोजगार संधी वाढत नाहीत. निर्यात वाढत नाही. हे अगदीच विसंगत चित्र तयार झालेे. त्यावर उपाय म्हणून सरकारने नवीन कर लावला. त्यामुळे सट्टेबाज व शेअर दलाल यांच्यासाठी काळा दिवस उजाडला. परंतु त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही.
------------------------------------------------------------------------

0 Response to "सट्टेबाजांचा काळा दिवस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel