-->
अनास्थेचा बळी

अनास्थेचा बळी

मंगळवार दि. 30 जानेवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
------------------------------------------------
अनास्थेचा बळी
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटील यांच्या मुलांनी इशारा दिल्यावर सरकार खडबडून जागे झाले व त्यांनी अखेर धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्‍वासन दिले. जमिनीचे फेरमूल्यांकन करुन पंचनाम्यानुसार जो मोबदला येईल तो व्याजासह 30 दिवसात देऊ, असं सरकारच्यावतीने म्हटले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे पत्र धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र यांना दिले. धर्मा पाटील यांच्या मुलाने हॉस्पिटलच्या आवारातच आंदोलन सुरु केले होते. सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शेतकरी एकवटले आहेत. धर्मा पाटलांच्या गावातील शेतकर्‍यांना रास्ता रोको करुन सरकारचा निषेध सुरु केला.
धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणार्‍या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्याने वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणार्‍या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात 600आंब्याची झाड लागवड केली होती. त्यांच्या शेतात विहीरदेखील आहे. सरकारने या औष्णीक वीज प्रकल्पासाठी 529 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. आपल्या संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गेली अनेक दिवस मंत्रालयात चकरा मारल्या पण तरीही योग्य  दाद मिळत नसल्याने हतबल धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातल्या या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने व शासकीय यंत्रणा फक्त टोलवाटोलवी करीत असल्याचे त्यांना सातत्याने जाणवले होते. शेवटी नाईलाजास्तव त्यानी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार घेत असलेल्या धर्मा पाटील यांना धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वगळता कुणीही भेटण्यासाठी गेलेले नाही, किंवा त्यांची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडें होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ चार लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसर्‍या शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यात आला होतो. आपल्यावरच हा अन्याय का, असा सवाल करीत योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत होते. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागे झालेे. विखरण येथील 199 हेक्टर जमिनीचे सात दिवसात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारविरोधात वातावरण तापले आहे. त्यामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. धर्मा पाटील यांच्या तुलनेत इतर शेतकर्‍यांना जास्त मोबदला कसा मिळाला? त्याची चौकशी होईल. धर्मा पाटील यांच्या कुटुंबाचे कुठलेही नुकसान होणार नाही. धर्मा पाटील यांच्या जमिनीसंबंधीचा अहवाल लवकरच मिळेल. जमीन संपादनात चूक असेल तर व्याजासह अधिक मोबदला देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्याचवेळी औष्णिक प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीसाठी 10 लाख रुपये प्रतिहेक्टर मोबदला देण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर सरकारला आलेले शहाणपण आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे होणार्‍या औष्णिक वीज प्रकल्पासाठी  जमिन संपादन करताना अन्याय झाला असे धर्मा पाटील यांचे म्हणणे होते. पाच एकर जमिनीसाठी फक्त चार लाखाचा मोबदला देण्यात येणार होता. त्यामुळे धर्मा पाटील त्रस्त झाले होते. त्यांनी आपल्यावर होणार्‍या अन्यायाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर गेल्या सोमवारी त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली, त्यानंतर हे सुस्त सरकार खडबडून जागे झाले. परंतु सरकारला जाग आणण्यासाठी धर्मा पाटील यांना आपला जीव गमवावा लागला, ही सर्वात दुर्दैवी बाब म्हटली पाहिजे. धर्मा पाटील यांचा जीव हा सरकारी अनास्थेमुळे गेला आहे. त्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर सरकार कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवेल का, असा सवाल आहे. 
---------------------------------------------------------------------------

0 Response to "अनास्थेचा बळी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel